
उमरेडमध्ये हॉटेलमध्ये विसरलेली ९ लाखांची दागिन्यांची बॅग चोरी; उमरेड पोलिसांची अवघ्या ३ तासांत धडक कारवाई, आरोपी जेरबंद.

उमरेड:
नागपूर-गडचिरोली मार्गावर प्रवास करणाऱ्या एका महिला प्रवाशाची सोन्याच्या दागिन्यांनी भरलेली हँडबॅग हॉटेलमध्येच विसरली. याच गोष्टीचा गैरफायदा घेत ती बॅग लांबवणाऱ्या चोराला उमरेड पोलिसांनी अवघ्या ३ तासांच्या आत अटक केली असून, ९ लाख ६५ हजार रुपयांचा संपूर्ण मुद्देमाल सुरक्षित हस्तगत केला आहे.


नेमकी घटना काय?

गडचिरोलीमधील लक्ष्मीनगर भागात राहणाऱ्या सौ. वैशाली पळशीलवार या आपल्या पतीसह २२ ऑक्टोबर २०२६ रोजी गडचिरोलीहून नागपूरकडे जात होत्या. यादरम्यान दुपारी साडेअकरा ते बारा वाजण्याच्या सुमारास त्या उमरेड येथील वाय-पॉइंट परिसразील ‘हरीओम व्हेजिटेरियन हॉटेल’मध्ये जेवण्यासाठी थांबल्या होत्या. जेवण आटोपल्यानंतर त्या सोन्याच्या दागिन्यांची हँडबॅग हॉटेलमध्येच टेबलवर विसरून पुढे निघून गेल्या. काही अंतरावर गेल्यानंतर बॅग विसरल्याचे लक्षात येताच त्यांनी तातडीने हॉटेलमध्ये परत जाऊन शोध घेतला, परंतु तोपर्यंत हँडबॅग गायब झाली होती.

त्या बॅगेमध्ये सोन्याचे मंगळसूत्र, सोन्याच्या दोन बांगड्या आणि एक सोन्याचा लक्ष्मीहार असा एकूण ९ लाख २० हजार रुपये किमतीचा ऐवज होता. या प्रकरणी पीडित महिलेने तात्काळ उमरेड पोलीस स्टेशनमध्ये येऊन चोरीची तक्रार नोंदवली.
आरोपी गजाआड, मुद्देमाल जप्त:

पोलिसांनी तातडीने सापळा रचून सखाराम पांडुरंग जिल्लारे (वय ४७ वर्षे, रा. वॉर्ड क्र. ०२, उदासा) या आरोपीला ताब्यात घेतले. त्याच्याकडून चोरी केलेली हँडबॅग, गुन्ह्यात वापरलेली दुचाकी आणि सोन्याचे दागिने असा एकूण ९ लाख ६५ हजार २०० रुपयांचा मुद्देमाल पंचांसमक्ष जप्त करण्यात आला.
पोलिसांची तडकाफडकी कारवाई व सीसीटीव्हीची मदत:

घटनेचे गांभीर्य लक्षात घेत नागपूर ग्रामीणचे वरिष्ठ पोलीस अधीक्षक हर्ष ए. पोद्दार, अपर पोलीस अधीक्षक अनिल म्हस्के आणि उपविभागीय पोलीस अधिकारी मयंक माधव यांच्या मार्गदर्शनाखाली, उमरेड पोलीस स्टेशनचे प्रभारी अधिकारी तथा पोलीस निरीक्षक धनाजी जळक यांनी तात्काळ तपासाची चक्रे हलवली.
पोलिसांनी तातडीने घटनास्थळी धाव घेत हॉटेलमधील सीसीटीव्ही फुटेजची कसून पाहणी केली. यामध्ये फिर्यादी महिला निघून गेल्यानंतर एका इसमाने ती हँडबॅग उचलून चोरी केल्याचे स्पष्ट झाले. त्यानंतर पोलिसांनी गोपनीय बातमीदारांच्या व तांत्रिक तपासाच्या आधारे आरोपीचा शोध घेतला असता, तो उदासा येथील रहिवासी असल्याचे समोर आले.
अतिशय वेगाने आणि अचूक तपास करत अवघ्या ३ तासांच्या आत हा गुन्हा उघडकीस आणल्याबद्दल उमरेड पोलिसांच्या या कामगिरीचे सर्वत्र कौतुक होत आहे.



