
अमरावतीत २.७५ लाखांच्या प्रतिबंधित ई-सिगारेटसह आरोपी जेरबंद; गुन्हे शाखेची धडक कारवाई
अमरावतीत मोठ्या प्रमाणात इलेक्ट्रॉनिक सिगारेटचा साठा जप्त; गुन्हे शाखेची धडक कारवाई
अमरावती: शहरात बेकायदेशीरपणे इलेक्ट्रॉनिक सिगारेटची (ई-सिगारेट) विक्री आणि साठवणूक करणाऱ्यांवर कडक कारवाई करण्याचे आदेश पोलीस आयुक्तांनी दिले होते. या आदेशानुसार, अमरावती शहर गुन्हे शाखेने २६ जून २०२६ रोजी एका फ्लॅटवर छापा टाकून लाखो रुपयांचा प्रतिबंधित इलेक्ट्रॉनिक सिगारेटचा साठा जप्त केला आहे.ही यशस्वी कारवाई पोलीस आयुक्त राकेश ओला, पोलीस उपायुक्त यशवंत सोळंके, श्याम घुगे, रमेश धुमाळ आणि सपोआ शिवाजी बचाटे यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली आहे.
गुप्त माहितीच्या आधारे छापा
गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक अतुल वर आणि त्यांच्या पथकाला गोपनीय माहिती मिळाली होती की, केडिया नगर येथील ‘गजानन टॉवर अपार्टमेंट’मधील फ्लॅट नंबर ५०१ मध्ये एक इसम सरकारने प्रतिबंधित केलेल्या इलेक्ट्रॉनिक सिगारेटची विक्री करण्यासाठी बेकायदेशीर साठा करून राहतो आहे. या माहितीच्या आधारे पोलिसांनी तात्काळ तिथे छापा टाकला.

आरोपी आणि जप्त केलेला मुद्देमाल
-
आरोपीचे नाव: आशिष बाबुराव कडू (वय ४० वर्षे, रा. केडिया नगर, अमरावती; मूळ गाव: जवळापूर, ता. अचलपूर, जि. अमरावती).
-
जप्त केलेला मुद्देमाल: फ्लॅटमधील स्टोअर रूमची झडती घेतली असता, एका पुठ्ठ्याच्या बॉक्समध्ये ‘SELFBAR RAYA S1’ कंपनीचे रिचार्ज करण्यायोग्य (Rechargeable Disposable – 15000 Puffs) वेगवेगळ्या फ्लेवरच्या एकूण ५५ इलेक्ट्रॉनिक सिगारेट सापडल्या.

-
मुद्देमालाची किंमत: जप्त करण्यात आलेल्या या ई-सिगारेटची अंदाजे किंमत २,७५,०००/- रुपये आहे.
गुन्हा दाखल
पोलिसांनी सर्व मुद्देमाल जप्त करून आरोपी आशिष कडू याला ताब्यात घेतले आहे. याप्रकरणी पोलीस स्टेशन राजापेठ येथे आरोपीविरुद्ध कलम २७५ बी.एन.एस. (BNS) सह ‘प्रोव्हिबिशन ऑफ इलेक्ट्रॉनिक सिगारेट ॲक्ट २०१९’ (कलम ३, ४, ५, ७) अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

कारवाई करणारे पथक:
गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक अतुल वर, दिनेश दहातोंडे, सपोनि महेश इंगोले, मनीष वाकोडे, दशरथ आडे, पोउपनि गजानन सोनुने आणि गुन्हे शाखेच्या अंमलदारांनी केली आहे.





