
नवीन कामठी पोलिसांची कामगिरी: वाहन चोरी करणाऱ्या आरोपीस अटक

कामठी (नागपूर):
नवीन कामठी पोलीस ठाण्याच्या हद्दीत झालेल्या एका दुचाकी चोरीच्या गुन्ह्याचा उलगडा करण्यात पोलिसांना यश आले आहे. तांत्रिक तपास आणि मिळालेल्या गुप्त माहितीच्या आधारे पोलिसांनी एका विधिसंघर्षग्रस्त (अल्पवयीन) बालकास ताब्यात घेतले असून त्याच्याकडून ९० हजार रुपये किमतीची पल्सर दुचाकी जप्त करण्यात आली आहे.

नेमकी घटना काय?
मिळालेल्या माहितीनुसार, रविदास नगर (कामठी) येथील रहिवासी फिर्यादी रोहित कांचन जैस्वाल (वय ३० वर्षे) यांनी आपली बजाज पल्सर दुचाकी (क्र. UP 63 BD 5128) १० ऑक्टोबर २०२६ रोजी रात्री ११:०० वाजताच्या सुमारास राहत्या घरासमोर लॉक करून पार्क केली होती. मात्र, ११ ऑक्टोबरच्या सकाळी ८:०० वाजेदरम्यान ती गाडी जागेवर दिसून आली नाही. अज्ञात चोरट्याने दुचाकी लांबवल्याचे लक्षात येताच जैस्वाल यांनी नवीन कामठी पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. पोलिसांनी या प्रकरणी अज्ञात आरोपीविरुद्ध कलम ३०३(२) भा.न्या.सं. अन्वये गुन्हा नोंदवून तपास सुरू केला.

तपास अन् गुन्ह्याची कबुली
गुन्ह्याचा गांभीर्याने तपास करत असताना नवीन कामठी पोलिसांनी तांत्रिक माहितीच्या आधारे एका संशयित अल्पवयीन बालकाला ताब्यात घेतले. पोलिसी खाक्या दाखवताच त्याने चोरीच्या गुन्ह्याची कबुली दिली. सदर वाहनचोरीचा गुन्हा त्याने त्याचा साथीदार मन अशोक चवरे (वय २१ वर्षे, रा. अमर नगर, एमआयडीसी, नागपूर) याच्यासह संगनमताने केल्याचे चौकशीत निष्पन्न झाले.

पोलिसांनी विधिसंघर्षग्रस्त बालकाच्या ताब्यातून ९०,००० रुपये किमतीची चोरी केलेली बजाज पल्सर दुचाकी जप्त केली आहे. सध्या मुख्य फरार आरोपी मन चवरे याचा शोध सुरू असून पुढील तपास पोलीस करत आहेत.
या पथकाने केली कारवाई
ही कामगिरी पोलीस उप आयुक्त (परि. क्र. ६)रमेश धुमाळ व सहायक पोलीस आयुक्त (कामठी विभाग)अंकुश खेडकर यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडली. कारवाईत वरिष्ठ पोलीस निरीक्षक महेश आंधळे, पोलीस उपनिरीक्षक अक्षय झगडे, पोलीस हवालदार दीपक चोले, पोलीस अंमलदार नसीम अंसारी, नितेश नवघडे, आकाश टेककाम आणि विलास चिंचुलकर यांचा सहभाग होता.






