
तुमसर येथे मोक्काचा आरोपी व रेती तस्कर यांची अज्ञाताने केली गोळ्या घालुन हत्या…
तुमसर(भंडारा) — सवीस्तर व्रुत्त असे की मोक्का’ लागलेल्या एका सराईत गुन्हेगारावर दिवसाढवळ्या गोळ्या झाडून त्याचा खून करण्यात आला. ही थरारक घटना भंडारा जिल्ह्याच्या तुमसर तालुक्यातील गोबरवाही रेल्वे फाटकाजवळ आज २५ रोजी सायंकाळच्या सुमारास घडली. नईम सिराज शेख खान, असे खून झालेल्या गुन्नाहेगाराचे नाव आहे. दुचाकीवर आलेल्या चार अज्ञात आरोपींनी बंदुकीतून सिराजवर गोळ्या झाडल्या. हत्येनंतर मुख्य आरोपी फरार असून, तीन संशयितांना ताब्यात घेण्यात आले आहे. दरम्यान, हा खून वर्चस्वाच्या जुन्या वैमनस्यातून झाला असल्याचे बोलले जात आहे. बॅटरी व्यावसायिक आणि नंतर वाळू तस्करांचा
म्होरक्या झालेला मोक्काचा आरोपी असलेल्याचा त्याच्या विरोधी टोळीने आज ‘गेम’ केला. सायंकाळच्या सुमारास गोबरवाही रेल्वे फाटक बंद झाल्यामुळे वाहने तेथे थांबली होती. त्यामध्ये मृतक नईम खान व त्याचा एक साथीदार त्याच्या MH-36 Z0241 या चारचाकी वाहनामध्ये बसला होता. दरम्यान, पाठीमागून सिनेस्टाइल दुचाकीने आलेल्या चार अज्ञात आरोपींनी अचानक गोळीबार सुरू केला. या गोळीबारात नईम खान व त्याचा एक साथीदार, असे दोघे गंभीर जखमी झाले. जखमींना तातडीने रुग्णालयात दाखल केले असता नईम खान याला डॉक्टरांनी मृत घोषित केले, तर गाडीत बसलेला एक जण गंभीर जखमी असून, त्याच्यावर उपचार सुरू आहेत. घटनेची माहिती मिळताच जिल्हा पोलिस अधिक्षक लोहित मतांनी यांनी घटनास्थळावर दाखल झाले
व जलदगतीने यंत्रणा कामाला लाऊन ०३ संशयित आरोपींना अटक केली आहे. परंतु मुख्य आरोपीचा शोध सुरू आहे. भंडारा जिल्ह्यातील तुमसर तालुका गँगवारसाठी कुप्रसिद्ध आहे. या अगोदरही तुमसरात बरेचदा बंदुकीतून गोळीबार करून आणि धारदार शस्त्राने हत्या झालेल्या आहेत. यात पुन्हा एका हत्याकांडाची भर आज पडली. आजच्या या थरारानंतर परिसरात भीतीचे वातावरण आहे.


