
१२ लाखांची मिनी बस चोरी प्रकरण: अमरावतीत ३ आरोपींना अटक; १ महिला फरार

अमरावती:
गाडगेनगर पोलीस ठाण्याच्या हद्दीतील सहकार नगर परिसरातून चोरीला गेलेली १२ लाख रुपये किमतीची मिनी बस शोधून काढण्यात डी.बी. पथकाला यश आले आहे. याप्रकरणी पोलिसांनी तीन आरोपींना ताब्यात घेतले असून चोरी झालेली ३५ सिटर मिनी बस जप्त केली आहे.


नक्की काय घडले?
फिर्यादी नितीन राजेंद्र खंडार (वय ४०, रा. सारंग नगर, रहाटगाव) यांची ३५ सिटर मिनी बस (क्र. MH 27/A-9880, किंमत रु. १२,०००,००/-) त्यांचे ड्रायव्हर प्रविण ठाकरे चालवितात. १९ ऑक्टोबर २०२६ रोजी दुपारी ड्रायव्हरने ही बस त्यांचे मित्र सुधिर निखरे (रा. सहकार नगर, अमरावती) यांच्या घराजवळ उभी केली होती.

२० ऑक्टोबर रोजी पहाटे ३:३० वाजेच्या सुमारास ड्रायव्हर प्रविण ठाकरे यांनी फोन करून बस जागेवर नसल्याचे सांगितले. परिसरात शोध घेऊनही बस मिळून न आल्याने अज्ञात चोराविरुद्ध गाडगेनगर पोलीस ठाण्यात अपराध क्र. १११७/२६, कलम ३०५(ब) भा.न्या.सं. अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला.

सीसीटीव्ही आणि गुप्त माहितीवरून कारवाई
गुन्ह्याचे गांभीर्य ओळखून डी.बी. पथकाने परिसरातील CCTV फुटेज ची पाहणी केली. त्यात लाल रंगाची मिनी बस चांदूर बाजारच्या दिशेने जात असल्याचे दिसून आले. त्यानंतर मिळालेल्या गुप्त माहितीच्या आधारे पोलिसांच्या पथकाने गोविंद प्रभु मंगल कार्यालयाजवळ (टोम्पे नगर, चांदूर बाजार) छापा टाकला.
तिथे आडोशात उभी केलेली मिनी बस जप्त करून आरोपी तेजस साहेबराव बाहेकर (वय २७, रा. संभाजी नगर, चांदूर बाजार) याला ताब्यात घेण्यात आले.

अर्धवट व्यवहारातून चोरी
पोलिसांनी केलेल्या सखोल चौकशीत, आरोपींनी पूर्वीच्या जुन्या अर्धवट व्यवहाराच्या कारणावरून ही मिनी बस चोरल्याचे निष्पन्न झाले. या गुन्ह्यात तेजस बाहेकर याच्यासोबत साहेबराव लक्ष्मणराव बाहेकर (वय ५८) आणि एका महिलेचा समावेश असल्याचे समोर आले आहे.
पोलीस पथक व मार्गदर्शन:
सदर कारवाई अमरावती पोलीस आयुक्त राकेश ओला, पोलीस उपायुक्त परि-१ यशवंत सोळंके, आणि सहायक पोलीस आयुक्त निलेश ब्राह्मणे यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडली.

-
नेतृत्व: वरिष्ठ पोलीस निरीक्षक गोरक्षनाथ जाधव, पो.नि. (क्राईम) प्रमोद पाचकवडे आणि डी.बी. प्रमुख सपोनि संदीप हिवाळे.
-
तपास पथक: पोहवा भारत वानखडे, पोना राजेश गुरेले, पोशि मतिन शेख, सुशांत प्रधान, धनराज कुमरे, महेश शर्मा आणि चालक पोहवा विनोद दांडगे.
सध्या या प्रकरणाचा पुढील तपास व.पो.नि. गोरक्षनाथ जाधव यांच्या मार्गदर्शनात पोहवा भारत वानखडे करत आहेत.




