
पुणे पोलिसांची मोठी कारवाई ; महाराष्ट्र शासनाच्या नावाने गांजा तस्करी करणारे केले जेरबंद
पुणे – पुणे पोलिसांच्या गुन्हे शाखेच्या अंमली पदार्थ विरोधी पथक -2 ने मोठी कारवाई करुन आंध्रप्रदेशातून विक्रीसाठी आणलेला एक कोटी चार लाख रुपयांचा 520 किलो गांजा जप्त करून एका महिलेसह तिघांना अटक केली आहे. ही कारवाई (शनिवार दि.2) रोजी पुणे नगर रोडवरील अमरसेल इंडिया कंपनीच्या समोर करण्यात आली आहे.
संदीप बालाजी सोनटक्के (वय 29 रा. मुपो. दहिवली, पाली फाटा, खोपोली, ता. खालापुर, जि. रायगड), निर्मलाकोटेश्वरी मुर्ती जुन्नुरी (वय-36 रा.चिलाकरलुपेठ, जि.गंटुर, राज्य आंध्रप्रदेश- महेश तुळशीराम परीट (वय-29 रा. तुपगाव पोस्ट चौक, ता. खालापूर, जि. रायगड) असे अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे आहेत. त्यांच्यावर लोणीकंद पोलीस ठाण्यात पोलीस अंमलदार योगेश मांढरे यांनी दिलेल्या फिर्यादीवरून एन.डी.पी.एस ॲक्ट नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.


या बाबत अधिक माहिती अशी की, अंमली पदार्थ विरोधी पथक दोनचे पोलीस अधिकारी व कर्मचारी लोणीकंद पोलीस ठाण्याच्या हद्दीत पेट्रोलींग करत होते. त्यावेळी पोलीस अंमलदार योगेश मांढरे यांना माहिती मिळाळी की, एका पांढऱ्या रंगाची सेलेरिओ कार (एमएच 46 बीव्ही 4560) आणि स्कॉर्पिओ (एमएच 48 झेड 8881) या वाहनांना महाराष्ट्र शासनाची पाटी लावुन आंध्रप्रदेशातून मोठ्या प्रमाणात गांजा विक्रिसाठी आणला जात असल्याची माहिती मिळाली. त्या वर पोलिसांनी पुणे नगर रोडवरील अमरसेल इंडिया कंपनीसमोर स्कॉर्पिओ गाडी आडवली. या गाडीवर लोकसेवक नसताना आरोपींनी लोकसेवक असल्याचे भासवण्यासाठी गाडीवर महाराष्ट्र शासन अशी पाटी लावली होती. पोलिसांनी गाडीतील संदीप सोनटक्के व महिलेला ताब्यात घेतले. तर सेलेरिओ गाडीमधील महेश परीट याला ताब्यात घेऊन गाड्यांची तपासणी केली. पोलिसांनी तिघांकडून 1 कोटी 19 लाख 82 हजार 200 रुपयांचा ऐवज जप्त केला. यामध्ये 1 कोटी 4 लाख 11 हजार रुपये किंमतीचा 520 किलो 550 ग्रॅम वजनाचा गांजा, 9 लाख रुपये किंमतीची स्कॉर्पिओ, 6 लाख रुपये किमतीची सेलीरीओ कार, 71 हजार रुपये किमतीचे चार मोबाईल व 200 रुपयांचा बोर्ड असा ऐवज जप्त केला आहे.

अशा प्रकारे सदरची कारवाई ही पोलीस आयुक्त रितेश कुमार, पोलीस सह आयुक्त संदीप कर्णिक, अपर पोलीस आयुक्त गुन्हे रामनाथ पोकळे, पोलीस उपायुक्त गुन्हे अमोल झेंडे, सहायक पोलीस आयुक्त गुन्हे-2 सतीश गोवेकर यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक सुनील थोपटे, पोलीस उपनिरीक्षक शुभांगी नरके, पोलीस अंमलदार योगेश मांढरे, शिवाजी घुले, संतोष देशपांडे, युवराज कांबळे, संदीप जाधव, मयुर सुर्यवंशी, मनोज साळुंके, विशाल शिंदे, सचिन माळवे आणि विशाल दळवी यांच्या पथकाने केली आहे.



