
तब्बल 50 वर्षापासून विदर्भ-मराठवाड्यात घरफोड्या करणारा गजाआड…
तब्बल 50 वर्षापासून विदर्भ-मराठवाड्यात घरफोड्या करणारा गजाआड…
हिंगोली (प्रतिनिधी) – हिंगोली जिल्हा पोलिस अधीक्षक जी.श्रीधर यांनी हिंगोली जिल्हयात होणारे मालाविरुध्दचे गुन्हे उघड करण्याबाबत पो.नि. विकास पाटील, स्थानिक गुन्हे शाखा, हिंगोली यांना वेळोवेळी सुचना देऊन मार्गदर्शन करीत असतात. त्या अनुषंगाने हिंगोली शहरात (दि.02जानेवारी) रोजीचे मध्यरात्री अजयनगर, हिंगोली येथे चोरी झाल्या संदर्भाने पो.स्टे. हिंगोली शहर येथे गुन्हा दाखल होता. सदर गुन्हयाचा तात्काळ छडा लावण्यासंदर्भाने स्था.गु.शा.चे स.पो.नि.शिवसांब घेवारे यांना सुचना दिल्या होत्या. त्या अनुषंगाने स्था.गु.शा. पथकामार्फत सदर गुन्हयाचा समांतर तपास चालु होता. या मध्ये पोलिसांनी मागील 50 वर्षापासून विदर्भ मराठवाड्यात घरफोड्या करणाऱ्या अट्टल घरफोड्याला मिळालेल्या गोपनीय माहितीवरून कौशल्यपूर्ण तपासाच्या आधारावर शिताफीने अटक केली आहे. या अट्टल घरफोड्याला आता पर्यंत 7 वेळा घरफोडीमध्ये कोर्टाने शिक्षा सुनावली आहे.



या बाबत अधिक माहिती अशी की, (दि.21मे) रोजी स्था.गु.शा. चे पोलिस पथक पो.स्टे. हिंगोली शहर हद्दीत पेट्रोलींग करीत आरोपीची माहीती घेत असताना गोपनिय बातमीदारामार्फत माहिती मिळाली की, इसम नामे हरिदास कुंडलीक भगत, (वय 60 वर्ष), रा.मडगाव, ता.बार्शी टाकळी, जि.अकोला याने (दि. 02जानेवारी) रोजीचे मध्यरात्री अजयनगर, हिंगोली येथे चोरी केली आहे व तो पुन्हा चोरी करण्यासाठी रेल्वे स्टेशन परिसर, हिंगोली येथे आल्याचे खात्रीशिर माहीती मिळाल्याने पलिस पथकाने सदरील आरोपीस ताब्यात घेवुन, विश्वासात घेवुन आरोपीची गुन्हयासंदर्भाने विचारपुस केली असता त्याने सदरचा गुन्हा केल्याची कबुली दिली व त्यांचेकडुन गुन्हयात चोरलेले नगदी व गुन्हयात वापरलेले साहित्य लोखंडी चाकु, लोखंडी रॉड, स्कू ड्राईव्हर, बॅटरी, गुलेर असा मुद्देमाल तपासकामी जप्त करून, गुन्हा उघड करण्यात आला आहे. सदर गुन्हेगार हा मागील 50 वर्षापासुन पुर्ण विदर्भ व मराठवाडयात अनेक ठिकाणी घरफोड्या केल्याचे चौकशीत निष्पन्न झाले असुन, जवळपास 25 घरफोडयाचे रेकॉर्ड उपलब्ध झाले आहेत. तसेच सदर आरोपीस न्यायालयाने आता पर्यंत 07 घरफोड्यामध्ये दोषी ठरवुन कारावासाची शिक्षा सुनावली आहे. आरोपी कारावास भोगुन सुटल्यानंतर पुन्हा घरफोड्या करण्याचे सवयीचा आहे.

अशा प्रकारे सदरची कार्यवाही ही पोलिस अधीक्षक जी.श्रीधर, अपर पोलिस अधीक्षक श्रीमती अर्चना पाटील, पो.नि. विकास पाटील, स्था.गु.शा. यांचे मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे स.पो.नि. शिवसांब घेवारे, पोलीस अंमलदार नितीन गोरे, आकाश टापरे, आजम प्यारेवाले, नरेंद्र साळवे, हरिभाऊ गुंजकर, प्रशांत वाघमारे, स्था.गु.शा. पथक, हिंगोली यांनी केली आहे.




