
कांदा बियाणे चोरणारी आंतरजिल्हा टोळी गजाआड; स्थागुशाची धडक कारवाई
पोलीस अधीक्षक श्री. निलेश तांबे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस पथकाची मोठी कारवाई
बुलढाणा जिल्ह्याचे माहिती अधिकार प्राप्त मा. पोलीस अधीक्षक श्री. निलेश तांबे त्यांच्या आदेशानुसार आणि मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेच्या (LCB) पथकाने ही धडक कारवाई केली आहे. देऊळगाव राजा पोलीस ठाण्याच्या हद्दीतून कांदा बियाणे चोरणाऱ्या एका आंतरजिल्हा टोळीचा पर्दाफाश करण्यात स्थानिक गुन्हे शाखेला (स्थागुशा) यश आले आहे. या कारवाईत पोलिसांनी ३ आरोपींना अटक केली असून, त्यांच्याकडून कांदा बियाणे, २ मोटारसायकली आणि ३ मोबाईल असा एकूण ५,२१,५०० रुपये किमतीचा १००% मुद्देमाल हस्तगत केला आहे.

नेमकी घटना
भाजीमंडी, देऊळगाव राजा येथील रहिवासी श्री. मोहम्मद अझहर मोहम्मद कलंदर (वय ३६ वर्षे) यांनी २ जून २०२६ रोजी देऊळगाव राजा पोलीस स्टेशनमध्ये तक्रार नोंदवली होती. तक्रारीनुसार, २४ मे २०२६ च्या रात्री ११:३८ ते २५ मे २०२६ च्या पहाटे ०४:०० वाजेच्या दरम्यान, पिंपळनेर (सिंदखेड राजा रोड) येथील ‘जूब्बूजी मायोमास ब्रिक्रेट इंडस्ट्री कंपनी’च्या आवारातून अज्ञात चोरांनी अथर्व सीड्स कंपनीचे १४ बॅग कांदा बियाणे (वजन ६ क्विंटल ६५ किलो, किंमत ४,६५,५०० रुपये) चोरून नेले होते. हे बियाणे तिथे प्रोसेसिंगसाठी आणले गेले होते.

या तक्रारीवरून देऊळगाव राजा पोलीस ठाण्यात अप.क्र. २५९/२०२६, कलम ३३४(१), ३०५, ६२ भारतीय न्याय संहिता (BNS) प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला होता.
पोलिसांचा तपास आणि आरोपींना अटक
गुन्ह्याचे गांभीर्य ओळखून बुलढाण्याचे पोलीस अधीक्षक श्री. निलेश तांबे यांनी स्थानिक गुन्हे शाखेला समांतर तपास करून आरोपींना शोधण्याचे व मुद्देमाल हस्तगत करण्याचे आदेश दिले होते. त्यानुसार स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक श्री. आशिष रोही यांनी तपासासाठी एक स्वतंत्र पथक तयार केले.

१३ जून २०२६ रोजी गुन्हे शाखेला गुप्त बातमीदाराकडून माहिती मिळाली की, या चोरीत जालना व अहिल्यानगर (अहमदनगर) येथील चोरांचा हात आहे. या माहितीच्या आधारे पथकाने जालना, छत्रपती संभाजीनगर आणि अहिल्यानगर जिल्ह्यात धाडसी छापे टाकून पुढील ३ आरोपींना शिताफीने अटक केली:
१. अंकुश तेजराव खंदारे (वय ४० वर्षे, रा. सातेगाव, ता. जाफ्राबाद, जि. जालना)

२. विनोद विठ्ठल काळे (वय २९ वर्षे, रा. लोणगाव, ता. भोकरदन, जि. जालना)
३. भानूदास उर्फ राहुल बाबुराव गायकवाड (वय ३२ वर्षे, मूळ रा. देऊळगाव राजा, सध्या रा. भारस्करवाडी, शेवगाव, जि. अहिल्यानगर)
अटक करण्यात आलेल्या आरोपींनी या चोरीची कबुली दिली आहे.
जप्त करण्यात आलेला मुद्देमाल
पोलिसांनी आरोपींच्या ताब्यातून चोरीला गेलेला संपूर्ण मुद्देमाल जप्त केला आहे, ज्यामध्ये खालील वस्तूंचा समावेश आहे:
-
कांदा बियाणे (बीजवई): ५ क्विंटल ३६ किलो
-
युनिकॉर्न मोटार सायकल: १ नग (किंमत ७०,००० रुपये)
-
शाईन मोटार सायकल: १ नग (किंमत ४०,००० रुपये)
-
मोबाईल फोन: ३ नग (किंमत ३०,००० रुपये)
-
एकूण जप्त माल: ५,२१,५०० रुपये
अटक केलेल्या आरोपींना पुढील कायदेशीर कारवाईसाठी देऊळगाव राजा पोलिसांच्या स्वाधीन करण्यात आले असून, या प्रकरणाचा पुढील तपास देऊळगाव राजा पोलीस करत आहेत.
तपास पथक
ही यशस्वी कामगिरी बुलढाण्याचे पोलीस अधीक्षक श्री. निलेश तांबे, खामगावचे अप्पर पोलीस अधीक्षक श्री. श्रेणिक लोढा आणि बुलढाण्याचे अप्पर पोलीस अधीक्षक श्री. अमोल गायकवाड यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडली.
या कारवाईत स्थानिक गुन्हे शाखेचे पोनि. श्री. आशिष रोही, पोउपनि. प्रताप बाजड, पोहेकॉ. शरद गिरी, गजानन दराडे, जगदेव टेकाळे, युवराज राठोड, पोकॉ. मनोज खरडे तसेच तांत्रिक विश्लेषण विभागाचे पोहेकॉ. राजू आडवे यांच्या पथकाने मोलाची भूमिका बजावली.




