
गजानन तौर हत्या प्रकरणातील आणखी एकास अम्रुतसर येथुन घेतले ताब्यात….
बहुचर्चित गजानन तौर हत्या प्रकरणातील आरोपीला जालना पोलिसांनी केली अटक…
जालना (प्रतिनिधी) – मंठा चौफुली येथे गजानन तौर याचा भरदिवसा काही जणांनी पूर्वनियोजन करून संगनमताने मिळून खून केला होता. या प्रकरणातील आरोपी विलास पवार याला पोलिस ठाणे तालुका जालना आणि स्थानिक गुन्हे शाखेच्या अधिकाऱ्यांनी मिळालेल्या गोपनीय माहितीवरून कौशल्यपूर्ण तपास करून शिताफीने अटक केली आहे. सदर गुन्ह्यात आरोपीतांनी संघटीतपणे एकत्र येऊन सदरचा गुन्हा केल्याचे तपासात निष्पन्न झाल्याने गुन्हयामध्ये कलम 3 (1) (i) (ii), 3 (2), 3 (4) महाराष्ट्र संघटीत गुन्हेगारी नियंत्रण अधिनियम सन 1999 (मोक्का) लावण्यात आला आहे.


या बाबत अधिक माहिती अशी की, जालना शहरातील मंठा चौफुली येथे (दि.11 डिसेंबर) रोजी दुपारी 02.00 वा.सु. गावठी पिस्तुल ने फायर व चाकुने वार करुन गजानन मच्छींद्रनाथ तौर याचा भरदिवसा खुन केला होता. या प्रकरणात पोलिस ठाणे तालुका जालना येथे गुन्हा नोंद करण्यात आला होता. सदर गुन्हयाचे तपासामध्ये यातील आरोपीतांनी संघटीतपणे एकत्र येवुन सदरचा गुन्हा केल्याचे तपासात निष्पन्न झाल्याने गुन्हयामध्ये कलम 3 (1) (i) (ii), 3 (2), 3 (4) महाराष्ट्र संघटीत गुन्हेगारी नियंत्रण अधिनियम सन 1999 (मोक्का) लावण्यात आले असुन मोक्काचे कलम लावल्यानंतर गुन्हयाचा पुढील तपास उपविभागीय पोलिस अधिकारी जालना अनंत कुलकर्णी हे करीत आहेत. सदर गुन्हयाचे तपासामध्ये गजानन मच्छींद्रनाथ तौर याचे मारेकरी पाच आरोपी पैकी तीन आरोपी 1) भागवत विष्णु डोंगरे 2) लक्ष्मण किसन गोरे 3) रोहीत नरेंद्र ताटीपामुलवार यांना अटक करुन तपास करण्यात आला आहे.

या गुन्हयातील फरार व कुख्यातगुंड विलास देवीदास पवार याचा शोध घेणेकामी पोलीस ठाणे तालुका जालना व स्थानिक गुन्हे शाखा येथील पोलिस अधिकारी व अंमलदार यांचे विशेष तपास पथक तयार करण्यात आले होते. आरोपी विलास हा बिदर (कर्नाटक) येथे असल्याची बातमी विशेष पथकास मिळाले नंतर त्यांनी बिदर (कर्नाटक) येथे जावुन माहीती काढली असता, आरोपी तेथुन पसार झाला. त्यानंतर या आरोपीचा शोध विशेष पथकाने कर्नाटक, राजस्थान व पंजाब या राज्यात घेतला. आरोपी अमृतसर (पंजाब) येथे असल्याची माहीती मिळाल्याने हे विशेष पथक अमृतसरला पोहोचले तेथे सतत 3 दिवस शोध घेतला असता तो अमृतसर येथे मिळुन आला नाही. पुन्हा गोपनीय यंत्रणा कार्यान्वीत करुन माहीती घेतली असता तो बीदरला गेल्याची माहीती मिळाली. विशेष पथक पुन्हा बिदरला पोहोचले बिदर येथे शोध घेतला असता अरोपी तेथुनही पसार झाला होता. आरोपी ज्या लोकांच्या संपर्कात होता त्यांची गोपनीय माहीती काढुन तो संपर्कात असलेल्या काही लोकांची माहीती मिळाली त्या लोकांकडे सखोल तपास केला असता, आरोपी पुन्हा अमृतसरलाच असल्याची खात्रीलायक माहीती मिळाली या पोलिस पथकाने पुन्हा अमृतसरला रवाना होवुन शोध घेतला असता, सुमारे 4/5 दिवसांच्या अथक परीश्रमानंतर आरोपीस अमृतसर येथुन ताब्यात घेण्यास पोलीसांना यश मिळाले. आरोपी हा आपले नाव व ओळख लपवुन व नाव बदलुन तसेच बदललेल्या नावाची ओळखपत्रे बनवुन विविध राज्यात वास्तव्य करत होता त्यामुळे त्यास अटक करण्यामध्ये अडचणी येत होत्या.

आरोपी बाबत गोपनीय माहीती प्राप्त करणे, त्यांचे पृथ्थःकरण करणे, कर्नाटक, पंजाब या राज्यातील वरीष्ठ अधिकाऱ्यांशी समन्वय राखुन योग्य मदत त्या ठिकाणी मिळवुन देण्याचे काम पोलिस अधीक्षक अजय कुमार बंसल, अपर पोलिस अधीक्षक आयुष नोपाणी व तपास अधिकारी अनंत कुलकर्णी यांनी केले. सतत 20 दिवस जालना-बिदर-अमृतसर-बिदर-अमृतसर-जालना असा सुमारे 9600 कि. मी. चा प्रवास करुन आरोपीच्या मागावर असलेल्या विशेष पथकातील के.ए. वनवे पोलिस उप-निरीक्षक तालुका जालना, विलास आटोळे, सॅम्युअल कांबळे, सचिन चौधरी, लक्ष्मण शिंदे, चंद्रकांत माळी यांनी चिकाटीने प्रयत्नांची पराकाष्ठा करुन आरोपीस अटक केले आहे या मोहीमे दरम्यान तांत्रीक सहाय्य पोलिस अंमलदार सागर बावीस्कर, जावेद शेख, हारुन पठाण, रामेश्वर कुऱ्हाडे यांनी पुरवले.
सदरची कारवाई ही पोलिस अधीक्षक अजय कुमार बंसल, अपर पोलिस अधीक्षक आयुष नोपाणी, उपविभागीय पोलिस अधिकारी अनंत कुलकर्णी यांचे मार्गदर्शनाखाली रामेश्वर खनाळ पोलिस निरीक्षक स्थागुशा जालना, एस.आर. उनवणे पोलिस निरीक्षक तालुका जालना व विशेष पथकातील अधिकारी व कर्मचाऱ्यांनी केले. तसेच पोलिस अधीक्षक जालना अजय कुमार बंसल व अपर पोलिस अधीक्षक जालना आयुष नोपाणी यांनी पदभार घेतल्यापासुन जालना जिल्हयातील कुख्यात व सराईत गुन्हेगारांविरुध्द कठोर धोरण अवलंबिले असुन संघटीत गुन्हेगारी व कुख्यात गुंडांविरुध्द कठोर कायदेशीर कारवाईची मोहीम हाती घेतली आहे.


