राष्ट्रीय तपास यंत्रणेची महाराष्ट्रात मोठी कारवाई; दहशतवाद्यांचा घातपाताचा मोठा कट..
राष्ट्रीय तपास यंत्रणेची महाराष्ट्रात मोठी कारवाई; दहशतवाद्यांचा घातपाताचा मोठा कट..
नवी दिल्ली – आयसीस (ISIS) या दहशतावादी संघटनेशी संबंध असल्याचा संशय आणि दहशतवादी कट प्रकरणी राष्ट्रीय तपास संत्रणेने (एनआयए) महाराष्ट्र आणि कर्नाटक मध्ये तब्बल ४० हून अधिक ठिकाणी छापे टाकले आहेत. यात भिवंडी पडघ्यातून १५ जणांना ताब्यात घेण्यात आलं आहे. एनआयएने आज पहाटेपासून ही कारवाई सुरू केली असून भिवंडी शहरातील चार जणांची चौकशी सुरू आहे. पकडण्यात आलेल्या या संशयित दहशतवाद्यांकडून पॅलेस्टाईनचा झेंडा, धारधार शस्त्रे, तलवारी, हार्ड डिस्क आणि मोबाईल जप्त करण्यात आले आहेत. ISIS ही जगातील सर्वात भयानक दहशतवादी संघटना म्हणून ओळखली जाते. या संघटनेचा घातपाताचा मोठा कट NIA ने उधळून लावला आहे.
आज सकाळी (दि.९ डिसेंबर) रोजी महाराष्ट्र आणि कर्नाटकमधील ४४ ठिकाणी छापेमारी करण्यात आली आहे. एएनआय या वृत्तसंस्थेने दिलेल्या माहितीनुसार कर्नाटमध्ये १, तर महाराष्ट्रात ४३ ठिकाणी कारवाई करण्यात आली आहे. यामध्ये पुणे १, ठाणे ग्रामीण ३१, ठाणे शहर १ आणि भाईंदरमधील एका ठिकाणाचा समावेश आहे. राज्य दहशतवाद विरोधी पथक आणि एनआयए यांनी संयुक्तपणे केलेली कारवाई अतिशय मोठी असून या कारवाईतील आणखी माहिती थोड्या वेळातच समोर येण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.
एका इंग्रजी वर्तमानपत्राने एनआयएच्या सूत्रांच्या माहितीनुसार सांगितले की, आंतरराष्ट्रीय दहशतवादी जाळे आणि इसिसच्या हस्तकांशी संबंधाचा कट यानिमित्ताने उघड होणार आहे. भारतात इसिसच्या अतिरेकी विचारसरणीचा प्रचार करण्यासाठी गुंतलेल्या एका मास्टरमाईंडचा या जाळ्यात समावेश होता. भारतीय भूमीत दहशतवादी हल्ला करण्याचा कट या नेटवर्कने रचला होता, असेही सांगितले आहे.
ठाण्यातील पडघा येथे सर्वात मोठी कारवाई झाल्याचे समोर आले आहे. एका वृत्तवाहिनीने या संपूर्ण कारवाईत सध्या १५ जण ताब्यात घेण्यात आलेले असल्याची माहिती दिली आहे. त्यांची चौकशी करून त्यांना अटक होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. पुण्यातील कोंढवा परिसरातही काही दिवसांपूर्वी अशीच कारवाई करण्यात आली होती. महाराष्ट्रात सतत अशा प्रकारच्या कारवाया केल्या जात आहेत.