
कर्तव्यात कसूर केल्याने तीन पोलिसांचे निलंबन
कर्तव्यात कसूर केल्याने तीन पोलिसांचे निलंबन
कोल्हापूर – वरिष्ठ अधिकाऱ्यांनी दिलेल्या आदेशाचे उल्लंघन करणे आणि कर्तव्यात कसूर केल्याबद्दल पोलिस अधीक्षक महेंद्र पंडित यांनी स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेतील तीन पोलिसांना निलंबित केले आहे. अवैद्य धंदे करणाऱ्यांसोबत हितसबंध, कर्तव्यात कसुर आणि वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या आदेशाला फाट्यावर बसवून काम करणाऱ्या स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेच्या तिघांवर ही कारवाई करण्यात आली आहे.


पोलिस अधीक्षक महेंद्र पंडित यांनी मंगळवारी कारवाई केली असून या मुळे जिल्ह्यातील पोलिस दलात खळबळ उडाली आहे. सहायक फौजदार संभाजी कृष्णात भोसले, हवालदार पांडुरंग तुकाराम पाटील, कॉन्स्टेबल संदीप ज्ञानदेव गायकवाड, अशी कारवाई झालेल्या पोलिसांची नावे आहेत. दरम्यान, जिल्ह्यातील आणि शहरातील आणखी काहीजण जिल्हा पोलिस प्रमुखांच्या रडारवर असल्याची माहिती आहे.

गेल्या काही वर्षांपासून स्थानिक गुन्हे आणि अन्वेषण शाखा ही चर्चेत आली होती. लाच घेण्यापासून ते गुन्हेगारांना अभय देण्यापर्यंत कारणामे सुरू असल्याची माहिती जिल्हा पोलिस अधीक्षकांना मिळाली होती. त्यानंतर झालेल्या चौकशीत अनेकांचे अवैध धंद्याशी लागेबंधे असल्याचे स्पष्ट झाले होते.



