
हिंगणघाट पोलिसांची मोठी कामगिरी: रूबा चौकात मोबाईल दुकान फोडणारे दोन अट्टल चोरटे जेरबंद; १.८० लाखांचा मुद्देमाल हस्तगत!
हिंगणघाट (जि. वर्धा):
हिंगणघाट शहरातील रूबा चौक परिसरात असलेल्या ‘बालाजी मोबाईल शॉपी’चे शटर तोडून मोबाईल व इलेक्ट्रॉनिक्स साहित्याची चोरी करणाऱ्या दोन अट्टल आरोपींना हिंगणघाट पोलिसांनी काही तासांतच अटक केली आहे. पोलिसांनी आरोपींकडून चोरी गेलेला १ लाख ५० हजार ६०० रुपयांचा मुद्देमाल आणि गुन्ह्यात वापरलेली ३० हजार रुपयांची मोटारसायकल असा एकूण १ लाख ८० हजार ६०० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे.

संत तुकडोजी वार्ड, हिंगणघाट येथील रहिवासी ऋषीकेश बालाजी वासेकर यांची रूबा चौकात ‘बालाजी मोबाईल शॉपी’ आहे. दिनांक २७ जुलै २०२६ च्या रात्री ९:०० वाजेपासून ते २८ जुलै २०२६ च्या सकाळी ९:०० वाजेदरम्यान अज्ञात चोरट्यांनी दुकानाच्या बंद शटरचे कुलूप तोडून आत प्रवेश केला. चोरट्यांनी दुकानातून विविध कंपन्यांचे १३ की-पॅड मोबाईल, १० अँड्रॉइड मोबाईल, ३६ इअरबड्स (ब्लूटूथ), लहान-मोठे ७ ब्लूटूथ स्पीकर, १ होम थिएटर, १ पॉवर बँक आणि हीटर मशीन असे एकूण १,५०,६०० रुपयांचे साहित्य लंपास केले होते.
याप्रकरणी ऋषीकेश वासेकर यांच्या तक्रारीवरून हिंगणघाट पोलीस ठाण्यात अप.क्र. १२१५/२६, कलम ३०५(अ), ३३१(३), ३३१(४) बी.एन.एस. (BNS) अन्वये गुन्हा नोंदवण्यात आला

CCTV आणि गुप्त माहितीवरून लागला सुगावा
गुन्हा दाखल होताच हिंगणघाट पोलीस ठाण्याचे ठाणेदार अनिल राऊत यांच्या आदेशान्वये गुन्हे प्रगटीकरण पथकाने तपासाची चक्रे वेगाने फिरवली. पोलीस पथकाने घटनास्थळावरील व परिसरातील सी.सी.टी.व्ही. (CCTV) फुटेजचे सूक्ष्म निरीक्षण केले. तसेच गुप्त बातमीदाराकडून मिळालेल्या माहितीच्या आधारे पोलिसांनी दोन संशयितांना ताब्यात घेतले.
कडक चौकशी अंती त्यांनी गुन्ह्याची कबुली दिली.

अटक करण्यात आलेले आरोपी:
-
यश विठ्ठल ठाकरे (वय २१ वर्षे, रा. संत तुकडोजी वार्ड, हिंगणघाट)
-
लोकेश मेघराज तांदुळकर (वय २६ वर्षे, रा. संत ज्ञानेश्वर वार्ड, हिंगणघाट)

विशेष बाब: अटक करण्यात आलेला आरोपी क्र. १ यश ठाकरे हा अट्टल गुन्हेगार असून त्याला यापूर्वी मे महिन्यातही घरफोडीच्या गुन्ह्यात हिंगणघाट गुन्हे प्रगटीकरण पथकाने अटक केली होती.
जप्त केलेला मुद्देमाल:
-
चोरीचे मोबाईल व इलेक्ट्रॉनिक्स साहित्य: किंमत ₹१,५०,६००/-
-
गुन्ह्यात वापरलेली मोटारसायकल: किंमत ₹३०,०००/-
-
एकूण जप्त मुद्देमाल: ₹१,८०,६००/-
तपास पथक
सदरची कामगिरी वर्धा जिल्हा पोलीस अधीक्षक सौरभ कुमार अग्रवाल, अपर पोलीस अधीक्षक सदाशिव वाघमारे व उपविभागीय पोलीस अधिकारी सुशीलकुमार नायक यांच्या मार्गदर्शनाखाली, हिंगणघाटचे ठाणेदार अनिल राऊत यांच्या आदेशावरून व प्रत्यक्ष मार्गदर्शनात गुन्हे प्रगटीकरण पथकाचे:
-
पो.हवा. नरेंद्र डहाके
-
पो.ना. नरेंद्र आरेकर, निलेशसिंग सूर्यवंशी
-
पो.शि. सागर सांगोले, प्रमोद जाधव
यांनी यशस्वीरीत्या पार पाडली. या गुन्ह्याचा पुढील तपास हिंगणघाट पोलीस करत आहेत.




