
अमरावती ग्रामीण पोलिसांचे ‘ऑपरेशन कवच’: हाय बीम व चकचकाट दिव्यांचा वापर करणाऱ्या ४९३ वाहनांवर कारवाई!
अमरावती: रात्रीच्या वेळी वाहनांच्या तीव्र दिव्यांमुळे (High Beam व Dazzling Light) होणारे रस्ते अपघात टाळण्यासाठी आणि नागरिकांचा प्रवास सुरक्षित करण्यासाठी अमरावती ग्रामीण पोलीस दलाने ‘ऑपरेशन कवच’ अंतर्गत विशेष मोहीम राबवून दणकेबाज कारवाई केली आहे.
अमरावती ग्रामीणचे पोलीस अधीक्षक यांच्या आदेशानुसार, १४ ऑगस्ट २०२४ रोजी संपूर्ण जिल्ह्यात ही विशेष मोहीम राबवण्यात आली. या मोहिमेत जिल्हा वाहतूक शाखा, अमरावती ग्रामीण आणि जिल्ह्यातील सर्व ३१ पोलीस ठाण्यांनी एकाच वेळी सहभाग घेतला.

कारवाईचा तपशील:
-
एकूण कारवाई: ३१ पोलीस ठाण्यांच्या हद्दीत नियमबाह्य हाय बीम, डॅझलिंग लाईट आणि LED स्ट्रीप लाईट लावून धावणाऱ्या ४९३ वाहनांवर दंडात्मक कारवाई करण्यात आली.
-
दंड वसुली: या कारवाईअंतर्गत वाहनचालकांकडून एकूण २,१७,५००/- रुपयांचा दंड वसूल करण्यात आला आहे.

अपघातांचा धोका टाळण्यासाठी आवाहन:
अमरावती ग्रामीण पोलिसांनी स्पष्ट केले आहे की, रात्रीच्या वेळी वाहनांना हाय बीम किंवा अतिचमकणारे Dazzling Lights / LED Strip Lights लावल्याने समोरून येणाऱ्या वाहनचालकांचे डोळे दिपतात. यामुळे चालकाचा ताबा सुटून भीषण अपघात होण्याची शक्यता असते व सामान्य नागरिकांना मोठा त्रास होतो.
त्यामुळे वाहनचालकांनी रात्री वाहन चालवताना गरजेनुसार ‘Low Beam’ चा वापर करावा आणि अनधिकृत हाय बीम, डॅझलिंग लाईट किंवा एलईडी स्ट्रीप लाईट काढून टाकाव्यात, असे आवाहन पोलिसांनी केले आहे.

वाहतूक नियमांचे पालन करण्याचे ११ महत्त्वाचे नियम:
जिल्हा वाहतूक शाखेतर्फे अपघात टाळण्यासाठी सर्व वाहनचालकांना खालील नियमांचे काटेकोर पालन करण्याचे आवाहन करण्यात आले आहे:
-
हेल्मेटचा वापर: दुचाकी चालवताना चालक व मागे बसणाऱ्या व्यक्तीने हेल्मेटचा वापर करावा.

-
कागदपत्रे जवळ बाळगणे: वाहन चालवताना वैध ड्रायव्हिंग लायसन्स, आर.सी. बुक, इन्शुरन्स इत्यादी कागदपत्रे सोबत ठेवावीत.
-
मद्यप्राशन व निष्काळजीपणा: दारू पिऊन किंवा भरधाव व निष्काळजीपणे वाहन चालवू नये.
-
मोबाईलचा वापर टाळा: वाहन चालवताना मोबाईल फोनचा वापर करू नये.
-
रॉंग साईड ड्रायव्हिंग: रस्त्यावर चुकीच्या बाजूने (Wrong Side) वाहन चालवू नये.
-
नो-पारकिंग क्षेत्र: नो-पारकिंग क्षेत्रात किंवा रस्त्यात वाहतुकीस अडथळा निर्माण होईल अशा पद्धतीने वाहन उभे करू नये.
-
मालवाहू वाहनांचा वापर: मालवाहू वाहनांमधून प्रवाशांची वाहतूक करू नये.
-
ओव्हरलोड प्रवाशी वाहतूक: प्रवासी वाहतूक करणाऱ्या वाहनांमध्ये क्षमतेपेक्षा जास्त प्रवासी बसवू नयेत.
-
वाहनात बेकायदेशीर बदल: आपल्या वाहनांमध्ये कंपनीच्या नियमाबाहेर कोणताही बेकायदेशीर बदल करू नये.
-
सीट बेल्टचा वापर: चारचाकी वाहनातील सर्व प्रवाशांनी सीट बेल्टचा वापर करावा.
“ऑपरेशन कवच – सुरक्षित रस्ते, सुरक्षित प्रवास, सुरक्षित जीवन”
अमरावती ग्रामीण पोलिसांकडून अपघात प्रतिबंध, वाहतूक शिस्त आणि नागरिकांच्या सुरक्षेसाठी अशा प्रकारची विशेष कारवाई सातत्याने सुरूच राहील, असे पोलीस प्रशासनाने स्पष्ट केले आहे.




