
राजुरा पोलिसांची मोठी कारवाई: १७ ट्रक टायर चोरणाऱ्या आंतरराज्यीय टोळीचा पर्दाफाश

चंद्रपूर पोलिसांची धडक कारवाई: १७ ट्रक टायर चोरणारी आंतरराज्यीय टोळी जेरबंद!
राजुरा:

छत्तीसगडमधील रायपूर येथून कोलफाइन्स माल घेऊन निघालेल्या दोन ट्रक्सच्या पाठीवरील चक्क १७ टायर डिस्कसह लांबविणाऱ्या आंतरराज्यीय चोरट्यांच्या टोळीचा राजुरा पोलिसांनी अवघ्या काही दिवसांतच पर्दाफाश केला आहे. या प्रकरणी मध्य प्रदेशातील दोघा संशयित आरोपींना अटक करण्यात आली असून, त्यांच्याकडून गुन्ह्यात वापरलेली बोलेरो पिकअप गाडी व चोरीचा असा एकूण १० लाखांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे.

अशी घडली घटना:

एसव्हीए ट्रान्सपोर्टिंग कंपनीचे दोन ट्रक (क्र. सीजी २२ एक ७९८२ आणि सीजी २२ एक ९२००) माल खाली करून लॉयडस मेटल राजुरा रेल्वे साईडिंग येथे नवीन माल भरण्यासाठी निघाले होते. मात्र, ९ ऑक्टोबर २०२६ रोजी रात्री ११ वाजता दोन्ही चालकांचे मोबाईल अचानक बंद झाले. कंपनीने जीपीएस लोकेशन तपासले असता गाड्या रेल्वे साईडिंगवरच असल्याचे दिसले. प्रत्यक्ष पाहणी केली असता दोन्ही ट्रक तिथेच उभे होते, परंतु त्यांच्यावरील डिस्कसह एकूण १७ टायर चोरट्यांनी काढून नेल्याचे निष्पन्न झाले. याप्रकरणी फिर्यादी राकेशकुमार देवीलाल रांगडाले यांच्या तक्रारीवरून राजुरा पोलीस ठाण्यात भारतीय न्याय संहितेच्या कलम ३०३ (२), ३ (५) अन्वये गुन्हा नोंदविण्यात आला.
पोलिसांची तांत्रिक कारवाई आणि अटक:

गुन्ह्याचे गांभीर्य लक्षात घेऊन पोलीस निरीक्षक नितीन चिंचोळकर यांच्या मार्गदर्शनाखाली डी.बी. पथक व सायबर सेलने तांत्रिक तपासाची चक्रे वेगाने हालवली. मिळालेल्या गोपनीय व सायबर माहितीच्या आधारे पोलिसांनी मध्य प्रदेशातील शहडोल गाठून खालील आरोपींना बेड्या ठोकल्या:
१. रामलाल गिरधारी यादव (वय २७, रा. चकौडिया, जि. शहडोल, म.प्र.)

२. अजय श्रीकाशी पेटल (वय ३०, रा. ब्यौहारी, जि. शहडोल, म.प्र.)
जप्त करण्यात आलेला मुद्देमाल:
तपासादरम्यान पोलिसांनी आरोपींकडून २ लाख ५० हजार रुपये किमतीचे १७ ट्रक टायर (डिस्कसह) आणि ७ लाख ५० हजार रुपये किमतीची गुन्ह्यात वापरलेली बोलेरो पिकअप गाडी (क्र. MP 18 GA 5867) असा एकूण १०,००,००० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे.
पोलीस पथकाचे यश:
सदर यशस्वी कामगिरी पोलीस अधीक्षक आयुष नोपानी, अपर पोलीस अधीक्षक ईश्वर कातकडे आणि सहाय्यक पोलीस अधीक्षक कुमार सुशांत यांच्या मार्गदर्शनाखाली; पोलीस निरीक्षक नितीन चिंचोळकर, सायबर सेलचे सपोनि झाडोकर, राजुरा गुन्हे शोध पथकाचे सपोनि लक्ष्मण लोकरे, पोउपनि सुनील धांडे, सफौ किशोर तुमराम, तसेच अंमलदार विक्की निर्वाण, अनुप डांगे, शफीक शेख, मिलिंद जांभुळे, रमेश बस्सी, आकाश पिपरे आणि राजीव दुबे यांनी पार पाडली.




