
अकोल्यात ‘ऑपरेशन प्रहार’ अंतर्गत मोठी कारवाई; ५० लाखांचा अवैध गुटखा कारखाना उद्ध्वस्त, दोघे गजाआड
अकोल्यात ‘ऑपरेशन प्रहार’ अंतर्गत मोठी कारवाई: ५० लाख ७२ हजार रुपयांचा प्रतिबंधित गुटखा आणि यंत्रसामग्री जप्त, दोघांना अटक
अकोला: अकोला पोलीस दलाच्या स्थानिक गुन्हे शाखेने ‘ऑपरेशन प्रहार’ अंतर्गत अवैध गुटखा निर्मिती कारखान्यावर छापा टाकून तब्बल ५० लाख ७२ हजार ९६४ रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. या कारवाईत गुटखा बनवण्याच्या अत्याधुनिक मशिनरीसह मोठ्या प्रमाणावर प्रतिबंधित गुटखा आणि कच्चा माल जप्त करण्यात आला असून, दोन आरोपींना ताब्यात घेण्यात आले आहे.

गोपनीय माहितीवरून कारवाई अकोल्याचे पोलीस अधीक्षक अर्षित चांदक यांना १६ जुलै २०२६ रोजी गोपनीय माहिती मिळाली की, एम.आय.डी.सी. अकोला परिसरातील जुने खेतान नगर येथील रहिवासी अभिषेक गजानन राई यांच्या मालकीच्या गोदामात गौरव शर्मा हा बेकायदेशीरपणे यंत्रसामुग्रीच्या सहाय्याने प्रतिबंधित गुटखा तयार करून त्याची विक्री करत आहे. या माहितीच्या आधारे पोलीस अधीक्षकांनी स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक श्री. नितीन लेहरकर यांना कारवाईचे आदेश दिले. त्यानुसार पोलीस पथकाने अन्न व औषध प्रशासन विभागाच्या अधिकाऱ्यांसह एम.आय.डी.सी. फेज-२ येथील संबंधित गोदामावर अचानक छापा टाकला.
दोन आरोपींना अटक छाप्यादरम्यान गोदामात दोन इसम संशयास्पद रित्या आढळले. पोलिसांनी त्यांना ताब्यात घेऊन चौकशी केली असता त्यांनी आपली नावे खालीलप्रमाणे सांगितली:

१. अशोक केदारनाथ शर्मा (वय ६० वर्षे, रा. बलोदे ले आऊट, अकोला)
२. अजय लक्ष्मण जुंजाळकर (वय २४ वर्षे, रा. शिवाजी महाराज चौक, गायगाव, अकोला)

५० लाखांपेक्षा जास्त किमतीचा मुद्देमाल जप्त या कारखान्यातून प्रतिबंधित गुटख्याचे विविध ब्रँड्स बनवले जात असल्याचे स्पष्ट झाले. कारवाई दरम्यान पोलिसांनी गुटखा तयार करण्यासाठी वापरण्यात येणारा कच्चा माल, वेगवेगळ्या कंपन्यांचे कृत्रिम फ्लेव्हर्स, पॅकेजिंग मटेरिअल आणि गुटखा बनवण्याची अत्याधुनिक यंत्रसामग्री जप्त केली.
जप्त केलेल्या साहित्याचा तपशील:

-
सुपारी ग्राइंडर मशीन – अंदाजे किंमत ८,५०,०००/- रुपये
-
केमिकल्स मिक्सर मशीन – अंदाजे किंमत ५,००,०००/- रुपये
-
गुटखा पॅकिंग सिलींग मशीन (छोटी) – अंदाजे किंमत ९,००,०००/- रुपये
-
गुटखा पॅकिंग सिलींग मशीन (मोठी) – अंदाजे किंमत ७,००,०००/- रुपये
-
गुटखा ट्रे डायर मशीन (मोठी) – अंदाजे किंमत ६,५०,०००/- रुपये
-
सीलिंग मशिनरी व एअर कॉम्प्रेसर मशीन – अंदाजे किंमत १,२०,०००/- रुपये
-
गुटखा पाऊच प्रिंटिंग मशीन – अंदाजे किंमत ४५,०००/- रुपये
-
कृत्रिम फ्लेव्हर्स (१५२ लिटर) – किंमत १,५२,०००/- रुपये
-
ग्लिसरीन (५४० लिटर) – किंमत १,६२,०००/- रुपये
-
मॅग्नेशियम कार्बोनेट – किंमत ३,८२,०००/- रुपये
-
गुटखा बनविण्याची कच्ची सुपारी, कत्था, मॅनथॉल, तंबाखू – एकूण किंमत ४,१२,०००/- रुपये
-
वाह तंबाखू, विमल पान मसाला व इतर तंबाखूजन्य साहित्य – एकूण किंमत २,७२,९६४/- रुपये
या सर्व मुद्देमालाची एकूण किंमत ५०,७२,९६४ रुपये आहे. पुढील कायदेशीर कारवाई अन्न व औषध प्रशासन विभाग, अकोला यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू आहे.
कारवाई करणारे पथक
ही धडक कारवाई पोलीस अधीक्षक अर्षित चांदक आणि अपर पोलीस अधीक्षक बी. चंद्रकांत रेड्डी यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक नितीन लेहरकर, सपोनि निलेश देशमुख, सपोनि गोपाल जाधव, पोउपनि माजीद पठाण, पोउपनि अनिल चव्हाण आणि अंमलदार शेख हसन, अब्दुल माजीद, महेंद्र मलीये, रवी खंडारे, किशोर सोनोने, भास्कर धोत्रे, उमेश पराये, खुशाल नेमाडे यांच्या पथकाने केली. तसेच एमआयडीसी पोलीस स्टेशनचे सपोनि विजय जाधव, पोलीस अंमलदार विजय अंभारे, सतिष प्रधान, सुनिल टाकसाळे आणि अन्न व औषध प्रशासनाचे सहाय्यक आयुक्त देवानंद वीर, अन्न सुरक्षा अधिकारी रविंद्र सोळंके, गजानन गोरे व किशोर बोरचाटे यांनी या कारवाईत महत्त्वाची भूमिका बजावली.




