हिंगणघाट पोलिसांचा मोठा छापा; ईलक्ट्रानिक कॉइन जुगार अड्ड्यावर कारवाई, ५ लाखांचा मुद्देमाल जप्त

महाराष्ट्रातील महत्वाच्या क्राईम संबंधी बातम्यांसाठी आम्हाला जॅाईन करा
Instagram Follow

हिंगणघाटमध्ये पोलिसांचा मोठा छापा; ईलक्ट्रानिक कॉइन मशीनवर जुगार खेळणाऱ्या अड्ड्याचा पर्दाफाश, ५ लाख १४ हजारांचा मुद्देमाल जप्त

हिंगणघाट (वर्धा):

हिंगणघाट येथील सरकारी दवाखाना चौकात सुरू असलेल्या एका हायटेक जुगार अड्ड्यावर हिंगणघाट पोलिसांनी धडक कारवाई केली आहे. एका दुकानात इलेक्ट्रॉनिक कॉइन मशीनच्या माध्यमातून पैशांची हारजित लावून बेकायदेशीर जुगार खेळणाऱ्या टोळीचा पोलिसांनी पर्दाफाश केला. या जुगार छाप्यामध्ये इलेक्ट्रॉनिक कॉइन मशीन आणि रोख रक्कमेसह तब्बल ५ लाख १४ हजार ११० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला असून, आरोपींवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.



अशी झाली कारवाई:

मिळालेल्या माहितीनुसार, हिंगणघाट पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक अनिल राऊत व गुन्हे प्रगटीकरण पथकाचे अंमलदार हे पोलीस स्टेशन हिंगणघाट परिसरात अवैध धंद्यांवर कारवाई करण्यासाठी पेट्रोलिंग करत होते. दरम्यान, हिंगणघाट येथील सरकारी दवाखाना चौकात असलेल्या एका पत्र्याच्या शटरच्या दुकानात काही व्यक्ती इलेक्ट्रॉनिक कॉइन मशीनचा  वापर करून पैशांवर हारजितचा जुगार खेळत आणि खेळवत असल्याची खात्रीशीर माहिती गोपनीय बातमीदाराकडून पोलिसांना मिळाली.



मिळालेल्या माहितीचे गांभीर्य लक्षात घेऊन पोलीस निरीक्षक अनिल राऊत यांनी तात्काळ या संदर्भात उपविभागीय पोलीस अधिकारी सुशीलकुमार नायक यांना माहिती दिली. त्यांच्या आदेशानुसार पोलिसांनी पंचांसमक्ष सरकारी दवाखाना चौकातील त्या पत्र्याच्या शटर असलेल्या दोन दुकानांवर एकाच वेळी छापा (रेड) टाकला.

५ लाखांपेक्षा जास्त मुद्देमाल जप्त:



पोलिसांनी दुकानाची पंचांसमक्ष कायदेशीर झडती घेतली असता, तिथे चावीचा वापर करून मशीनवर नमूद असलेल्या नंबरवर पैसे लावून लोकांकडून हारजितचा जुगार खेळवून घेतला जात असल्याचे निष्पन्न झाले. पोलिसांनी घटनास्थळावरून जुगाराच्या इलेक्ट्रॉनिक कॉइन मशिन्स आणि रोख रक्कम असा एकूण ५,१४,११०/- रुपयांचा मुद्देमाल जप्ती पंचनामा करून जप्त केला. या प्रकरणी संबंधित आरोपींविरुद्ध जुगार कायदा (Gambling Act) अन्वये गुन्हा नोंदवून पुढील कारवाई सुरू करण्यात आली आहे.

या पथकाने केली कारवाई:



सदर धडक कामगिरी वर्ध्याचे पोलीस अधीक्षक सौरभकुमार अग्रवाल, अप्पर पोलीस अधीक्षक सदाशीव वाघमारे, उपविभागीय पोलीस अधिकारी सुशीलकुमार नायक व पोलीस निरीक्षक अनिल राऊत यांच्या प्रत्यक्ष मार्गदर्शनात पार पडली.

या कारवाईत सहाय्यक पोलीस निरीक्षक  पद्माकर मुंडे, डि.बी. पथकाचे पोलीस हवालदार प्रशांत ठोंबरे, पोहव किशोर कडू, पोलीस नाईक राजेश शेंडे, पोलीस शिपाई आशिष नेवारे, मंगेश वाघमारे आणि रोहित साठे यांनी महत्त्वाची भूमिका बजावली. या धडक कारवाईमुळे हिंगणघाट परिसरातील अवैध धंदे चालवणाऱ्यांमध्ये मोठी खळबळ उडाली आहे.







WP2Social Auto Publish Powered By : XYZScripts.com
error: Content is protected !!