गडचिरोली पोलिसांची मोठी कारवाई; 15.65 लाखांचा अवैध दारूसाठा व स्विफ्ट कार जप्त, पाच आरोपी अटकेत

महाराष्ट्रातील महत्वाच्या क्राईम संबंधी बातम्यांसाठी आम्हाला जॅाईन करा
Instagram Follow

गडचिरोली | प्रतिनिधी | 12 जून 2026

दारूबंदी असलेल्या गडचिरोली जिल्ह्यात अवैधरित्या देशी-विदेशी दारूची वाहतूक व साठवणूक करणाऱ्यांविरोधात पोलिसांनी मोठी कारवाई करत तब्बल 15 लाख 65 हजार 180 रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. या कारवाईत मोठ्या प्रमाणात देशी-विदेशी मद्य, हातभट्टी मोहा दारू तसेच वाहतुकीसाठी वापरण्यात आलेली स्विफ्ट कार जप्त करण्यात आली असून पाच आरोपींना अटक करण्यात आली आहे.



पोलीस अधीक्षक एम. रमेश यांच्या निर्देशानुसार जिल्ह्यात अवैध दारू व्यवसायाविरोधात विशेष मोहीम राबविण्यात येत आहे. त्याच अनुषंगाने 10 जून 2026 रोजी आरमोरी पोलिसांनी गोपनीय माहितीच्या आधारे सापळा रचून ही धडक कारवाई केली.

गोपनीय माहितीच्या आधारे छापा

सहायक पोलीस अधीक्षक अनिकेत हिरडे यांना मिळालेल्या गोपनीय माहितीनुसार, आरमोरी येथील सुनिल रामचंद्र जिभकाटे हा आपल्या साथीदारांच्या मदतीने बाहेरील जिल्ह्यांतून अवैधरित्या देशी-विदेशी दारू आणून आरमोरी येथील बीएसएनएल टॉवरजवळ असलेल्या गोदामात साठवून ठेवत असल्याची माहिती मिळाली होती.



माहितीची खातरजमा करण्यासाठी पोलिसांनी गोदाम परिसरात पाहणी केली असता काही जण एमएच-34 एएम-8969 क्रमांकाच्या स्विफ्ट कारमधून दारूचे बॉक्स उतरवून गोदामात ठेवताना आढळले. पोलिसांची चाहूल लागताच काही जण घटनास्थळावरून पसार झाले. मात्र गोदामात उपस्थित असलेल्या एका व्यक्तीला पोलिसांनी ताब्यात घेतले.

चौकशीत त्याने आपले नाव सुनिल रामचंद्र जिभकाटे (वय 40), रा. शेगाव टोली, आरमोरी असे सांगितले.



गोदाम आणि वाहनातून मोठ्या प्रमाणात मद्य जप्त

पोलिसांनी पंचांसमक्ष गोदाम व वाहनाची झडती घेतली असता विविध कंपन्यांची देशी-विदेशी दारू, बिअर आणि हातभट्टी मोहा दारूचा मोठा साठा आढळून आला.

जप्त करण्यात आलेल्या मुद्देमालामध्ये –



  • रॉयल स्टॅग डिलक्स व्हिस्कीच्या शेकडो बाटल्या
  • टायगर ब्रँड संत्री देशी दारूच्या हजारो प्लास्टिक बाटल्या
  • रॉकेट देशी दारूचे बॉक्स
  • रॉयल चॅलेंज, किंगफिशर आणि लंडन पिल्सनर बिअरचे शेकडो टिन
  • 60 लिटर हातभट्टी मोहा दारू
  • दारू वाहतुकीसाठी वापरण्यात आलेली स्विफ्ट कार

असा एकूण 15,65,180 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.

पाच आरोपींविरुद्ध गुन्हा दाखल

या प्रकरणी आरमोरी पोलीस ठाण्यात महाराष्ट्र दारूबंदी कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आला असून खालील आरोपींना अटक करण्यात आली आहे –

  1. सुनिल रामचंद्र जिभकाटे, रा. शेगाव टोली, आरमोरी
  2. अजय दादाजी राऊत, रा. अंतरजी, ता. आरमोरी
  3. राहुल राऊत, rा. रामाळा, ता. आरमोरी
  4. अजय राऊत, रा. रामाळा, ता. आरमोरी
  5. सुभाष तुलावी, रा. दंवडी, ता. धानोरा

सर्व आरोपींना न्यायालयात हजर करण्यात आले असता न्यायालयाने त्यांना एक दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे.

वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनाखाली कारवाई

ही कारवाई पोलीस अधीक्षक एम. रमेश, अपर पोलीस अधीक्षक कार्तिक मधीरा, गोकुल राज जी., अपर पोलीस अधीक्षक (अहेरी) हर्षवर्धन बी.जे. तसेच सहायक पोलीस अधीक्षक अनिकेत हिरडे यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडली.

कारवाईत आरमोरी पोलीस ठाण्याचे प्रभारी अधिकारी पोलीस निरीक्षक कैलास गवते, पोलीस उपनिरीक्षक संतोष कडाळे, नरेश सहारे तसेच पोलीस पथकातील इतर कर्मचाऱ्यांनी सहभाग घेतला.

अवैध दारू व्यवसायाविरोधातील मोहीम सुरूच

गडचिरोली पोलिसांनी जिल्ह्यातील अवैध दारू विक्री, साठवणूक आणि वाहतूक करणाऱ्यांविरोधात पुढील काळातही अशाच प्रकारच्या कठोर कारवाया सुरू राहतील, असा इशारा दिला आहे. दारूबंदी कायद्याचे उल्लंघन करणाऱ्यांवर कोणतीही दया दाखवली जाणार नसल्याचे पोलिसांनी स्पष्ट केले आहे.







WP2Social Auto Publish Powered By : XYZScripts.com
error: Content is protected !!