
बिझीलँड परिसरात ६३ हजारांच्या अवैध परदेशी दारूसह गोव्यातील एकाला अटक
अमरावती:
नांदगाव पेठ पोलीस ठाण्याच्या हद्दीतील बिझीलँड परिसरात अवैध परदेशी दारूची वाहतूक व विक्री करणाऱ्या एका आरोपीला पोलिसांनी रंगेहाथ पकडले. या कारवाईत पोलिसांनी ६३ हजार रुपये किमतीचा दारूचा साठा जप्त केला असून, मूळचा गोव्यातील रहिवासी असलेल्या आरोपीला ताब्यात घेण्यात आले आहे.

गस्तीदरम्यान मिळाली गुप्त बातमी
३ सप्टेंबर २०२६ रोजी नांदगाव पेठ पोलिसांचे पथक ठाण्याच्या हद्दीत गस्त घालत असताना आणि अभिलेखावरील गुन्हेगारांची पाहणी करत असताना, एका खबर्याकडून खात्रीशीर बातमी मिळाली. बिझीलँड रोडच्या बाजूला एक इसम पिशव्यांमध्ये बेकायदेशीरपणे परदेशी दारू ठेवून तिच्या विक्रीसाठी उभा असल्याची माहिती पथकाला मिळाली. माहितीच्या आधारे पोलिसांनी त्वरित घटनास्थळी धाव घेऊन बिझीलँड रोडवर संशयितरीत्या उभ्या असलेल्या आरोपीला ताब्यात घेतले.

६३ हजारांचा मुद्देमाल जप्त
आरोपीच्या ताब्यातील पिशव्यांची झडती घेतली असता पोलिसांना खालील मुद्देमाल आढळून आला:

-
रॉयल स्टॅग (२ लीटर क्षमता): २५ नग (किंमत ₹४५,०००)
-
रॉयल चॅलेंज (२ लीटर क्षमता): १० नग (किंमत ₹१८,०००)

एकूण ६३ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला असून, आरोपीविरुद्ध नांदगाव पेठ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
आरोपीची माहिती:
-
नाव: नरेश कुमार पारसमन चोपडा (वय ४३ वर्षे)
-
पत्ता: नोरणा हॅरिटेज बिल्डिंग, डोंगरवाडा, जि. साउथ गोवा
पोलीस पथकाची कारवाई
ही कारवाई अमरावती शहराचे पोलीस आयुक्त राकेश ओला, पोलीस उपायुक्त (परिमंडळ ०१) यशवंत सोळंके आणि सहायक पोलीस आयुक्त नयन आलुरकर यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडली. senior पोलीस निरीक्षक पुनीत कुलट यांच्या नेतृत्वात पोलीस उपनिरीक्षक गणेश राऊत, ओमप्रकाश देशमुख, दिनेश माणुसमारे, पोलीस अंमलदार सतीश देशमुख, वैभव तिखिले, राजीव खान, शोएबुद्दीन सैयद, निलेश साविकार, प्रफुल खोब्रागडे आणि चालक वैभव धुरंधर यांच्या पथकाने हा यशस्वी छापा टाकला.




