हिंगणघाटमध्ये संघटित गुन्हेगारीवर पोलिसांचा मोठा प्रहार; 4 महिन्यांत 4 मोक्का कारवाया, 13 आरोपी अटकेत

महाराष्ट्रातील महत्वाच्या क्राईम संबंधी बातम्यांसाठी आम्हाला जॅाईन करा
Instagram Follow

हिंगणघाट शहरातील गुन्हेगारांना मोठा धक्का; 4 महिन्यांत 4 मोक्का कारवाया, 13 आरोपी जेरबंद

10 वर्षानंतर पोलीस स्टेशन हिंगणघाट हद्दीत मकोका ची कारवाई, पोलिस अधीक्षक  सुशीलकुमार नायक SDPO. हिंगणघाट यांच्या प्रयत्नांना यश



वर्धा जिल्ह्यातील हिंगणघाट शहरात संघटित गुन्हेगारीविरोधात पोलिसांनी मोठी आणि कठोर कारवाई करत अवघ्या चार महिन्यांत महाराष्ट्र संघटित गुन्हेगारी नियंत्रण अधिनियम (मोक्का) अंतर्गत चार प्रकरणांमध्ये कारवाई केली आहे. या कारवाईत एकूण 13 आरोपींना अटक करण्यात आली असून संघटित गुन्हेगारी करणाऱ्या टोळ्यांवर पोलिसांनी मोठा आघात केला आहे. ही संपूर्ण कारवाई अपर पोलिस अधीक्षक  सदाशिव वाघमारे, उपविभागीय पोलिस अधिकारी  प्रमोद ननवरेकर, उपविभागीय पोलिस अधिकारी सुशील कुमार नायक, स्थानिक गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक  विनोद चौधरी तसेच हिंगणघाट शहर पोलिस स्टेशनच्या अधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडली.

पोलिस अधीक्षक  सौरभ कुमार अग्रवाल यांच्या निर्देशानुसार हिंगणघाट परिसरात वाढत्या संघटित गुन्हेगारीवर नियंत्रण मिळवण्यासाठी विशेष मोहीम राबविण्यात आली. या मोहिमेअंतर्गत खंडणी वसुली, जबरी चोरी, दारूची अवैध वाहतूक, गंभीर दुखापत, दंगल, घरफोडी, चोरी, जुगार अड्डे चालविणे तसेच दहशत निर्माण करून आर्थिक फायदा मिळविणाऱ्या टोळ्यांविरोधात कारवाई करण्यात आली.



या कारवाईत कुख्यात टोळीप्रमुख पियुष उर्फ मस्तान राजू मुरुळे (वय 27, रा. संत गाडगेबाबा वॉर्ड, हिंगणघाट) याच्यासह त्याचे साथीदार निखिल रामनवार, जय चुटे, कार्तिक हमद, पंकज सावळणे आणि रितिक उर्फ फकोडा खांडे यांच्याविरोधात मोक्का अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला. पियुष मुरुळे हा 2019 पासून गुन्हेगारी क्षेत्रात सक्रिय असून त्याच्यावर यापूर्वी 12 गुन्हे दाखल असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे.

याशिवाय इतर तीन संघटित गुन्हेगारी टोळ्यांविरोधातही मोक्का अंतर्गत कारवाई करण्यात आली. या टोळ्यांमधील आरोपींवर खूनाचा प्रयत्न, खंडणी, दरोडा, गंभीर मारहाण आणि इतर गंभीर गुन्ह्यांचे आरोप आहेत. आरोपींचा गुन्हेगारी इतिहास तपासून त्यांच्याविरोधात मोक्का कायद्यांतर्गत कारवाई करण्यात आली असून सर्व आरोपींना न्यायालयीन प्रक्रियेनंतर कारागृहात रवानगी करण्यात आले आहे.



वर्धा जिल्ह्यात संघटित गुन्हेगारीला आळा घालण्यासाठी पोलिस प्रशासनाने कठोर भूमिका घेतली असून अशा प्रकारच्या गुन्ह्यांमध्ये सहभागी असलेल्या कोणालाही सोडले जाणार नाही, असा इशारा पोलिस अधीक्षक  सौरभ कुमार अग्रवाल यांनी दिला आहे.









WP2Social Auto Publish Powered By : XYZScripts.com
error: Content is protected !!