परभणी पोलिस अधिक्षकांनी घेतली जिल्ह्यातील टॅाप १० गुन्हेगारांची शाळा,कायद्यात राहाल तर फायद्यात राहाल…
परभणी पोलिस अधिक्षकांची ‘टॉप टेन’ गुन्हेगारांना तंबी; कायद्यात राहाल तरच फायद्यात राहाल…
परभणी (प्रतिनिधी) – वाढत्या गुन्हेगारीला चाप बसवण्यासाठी परभणी पोलिस आता चांगलेच ॲक्शन मोडमध्ये आले आहेत. पोलिसांनी जिल्हयातील टॉप टेन गुन्हेगारांची शाळा घेऊन त्यांना तंबी दिली. सोशल मीडियाचा वापर करत दहशत पसरवू नका. आगामी निवडणुकीच्या तोंडावर तुमच्यामुळे कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होणार नाही याची काळजी घ्या, आगामी निवडणुकांमुळे कायदा सुव्यवस्था सुरळीत राहण्यासाठी पोलिस अधीक्षक रविंद्रसिंह संतोषसिंह परदेशी यांनी योग्य ती खबरदारी म्हणून आधीच अट्टल गुन्हेगारांना बोलावून त्यांची चांगलीच हजेरी घेतली. या गुन्हेगारांची चांगली धुलाई करत या पुढे कुठे आढळून आल्यास याद राखा कायद्यात राहाल तरच फायद्यात राहाल असा सज्जड इशारा देत अट्टल गुन्हेगारांना चांगलाच हात दाखवला.
परभणी जिल्हा पोलिस अधीक्षक रविंद्रसिंह संतोषसिंह परदेशी यांनी सर्व ठाणेदारांना त्यांच्या ठाणे प्रभागात गंभीर स्वरूपाचे गुन्हे करून दहशत माजवणारे गुन्हेगारांची झाडाझडती घेतली. या मध्ये गंभीर गुन्हे दाखल असलेल्यांना समक्ष बोलावून त्यांना सुधारण्याबद्दल तंबी देण्यात आली, सोबतच त्यांचे समूपदेशन देखील केले.
आगामी निवडणुकांच्या पार्श्वभुमीवर तसेच येणाऱ्या सन-उत्सवांच्या अनुषंगाने सर्व सक्रीय गुन्हेगारांचा लेखाजोखा अद्यावत करण्यात आलेला असून त्यांच्यावर परभणी जिल्हा पोलिस दलाची करडी नजर राहणार आहे. असे सुद्धा पोलिस अधीक्षक रविंद्रसिंह संतोषसिंह परदेशी यांनी सांगितले आहे.