वाहतूक नियमांचे उल्लंघन; तीन महिन्यात पावणे तीन कोटी दंड वसूल
वाहतूक नियमांचे उल्लंघन; तीन महिन्यात पावणे तीन कोटी दंड वसूल
पिंपरी : वाहतुकीच्या नियमांचे उल्लंघन करणाऱ्या वाहन
चालकांवर पिंपरी-चिंचवड वाहतूक शाखेने दंडात्मक कारवाई करत कारवाईचा बडगा उगारला आहे. एक ते ३० नोव्हेंबर या अवघ्या महिन्या भराच्या कालावधीत ३२ हजार ७७५ बेशिस्त वाहन चालकांवर कारवाई करत २ कोटी ७२ लाख ९१ हजार ७०० रुपयांचा दंड वसूल केला आहे.
पिंपरी-चिंचवड शहराचा विकास आणि वाढ वेगाने होत आहे. त्यामुळे लोकसंख्येबरोबरच वाहनांची संख्या वाढत आहे. वाढलेल्या वाहनांच्या संख्येमुळे वाहतुकीशी निगडीत होणाऱ्या अपराधांची संख्या देखील वाढू लागली आहे. वाहतुकीला शिस्त लागण्यासाठी तसेच अपघात रोखण्यासाठी पिंपरी-चिंचवड वाहतूक शाखेने कारवाईची मोहीम हाती घेतली आहे. वाहतुकीच्या नियमांचे उल्लंघन करणाऱ्या वाहन चालकांवर वाहतूक पोलिसांकडून दंडात्मक कारवाई केली जात आहे.
नोव्हेंबर महिन्यात वाहतूक पोलिसांनी मोठ्या प्रमाणात कारवाई करत २ कोटी ७२ लाख ९१ हजार ७०० रुपयांचा दंड वसूल केला आहे. तसेच विरुद्ध दिशेने वाहन चालवणाऱ्या ६०७ वाहन चालकांवर थेट खटले दाखल केले आहेत. तसेच जड अवजड वाहनांना प्रवेश बंदी केलेल्या मार्गावर प्रवेश करणाऱ्या सहा हजार ३७२ जड अवजड वाहनांवर कारवाई करण्यात आली आहे. अशा प्रकारे महिन्याभरात ३२ हजार ७७५ वाहन चालकांवर कारवाई केली आहे.