
प्रोजेक्ट हॉक : CCTV व डिजिटल मॅपिंगद्वारे गुन्हेगारांवर भंडारा पोलिसांची करडी नजर
भंडारा पोलिसांचा ‘प्रोजेक्ट हॉक’ उपक्रम; CCTV व डिजिटल मॅपिंगच्या मदतीने गुन्हेगारांवर ठेवणार करडी नजर
भंडारा जिल्हा पोलीस विभागाने रेकॉर्डवरील गुन्हेगारांवर प्रभावी नियंत्रण ठेवण्यासाठी आणि गुन्हे प्रतिबंधासाठी ‘प्रोजेक्ट हॉक’ (Project Hawk) हा अभिनव उपक्रम सुरू केला आहे. या प्रकल्पाची संकल्पना व अंमलबजावणी सहाय्यक पोलीस अधीक्षक (उपविभाग तुमसर) यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली असून, जिल्हा पोलीस अधीक्षकांनी 15 जून 2026 रोजी झालेल्या गुन्हे आढावा बैठकीत या उपक्रमाचे कौतुक केले.

या प्रकल्पाचा मुख्य उद्देश जिल्ह्यातील CCTV कॅमेरे आणि रेकॉर्डवरील गुन्हेगारांचे डिजिटल मॅपिंग करून गुन्हेगारांचा जलद शोध घेणे तसेच गुन्हे रोखण्यासाठी पोलीस यंत्रणेला अधिक सक्षम बनवणे हा आहे.
‘प्रोजेक्ट हॉक’चे दोन प्रमुख भाग आहेत. पहिल्या भागात जिल्ह्यातील CCTV कॅमेऱ्यांचे मॅपिंग करण्यात आले असून, दुसऱ्या भागात रेकॉर्डवरील गुन्हेगारांचे डिजिटल मॅपिंग करण्यात आले आहे. या उपक्रमांतर्गत भंडारा जिल्ह्यातील एकूण 2,923 CCTV कॅमेरे तसेच 1,916 रेकॉर्डवरील गुन्हेगारांचे त्यांच्या वास्तव्याच्या ठिकाणानुसार डिजिटल नकाशावर मॅपिंग करण्यात आले आहे.

या प्रकल्पामध्ये विविध फिल्टर्स आणि डिजिटल साधनांचा वापर करण्यात आला असून, त्यामुळे पोलीस गस्तीदरम्यान संशयित व रेकॉर्डवरील गुन्हेगारांवर अधिक प्रभावीपणे लक्ष ठेवू शकणार आहेत. तसेच त्यांच्या हालचालींचे निरीक्षण करून आवश्यक ती तपासणी तात्काळ करता येणार आहे.
पोलीस विभागाच्या मते, ‘प्रोजेक्ट हॉक’मुळे जिल्ह्यातील रेकॉर्डवरील गुन्हेगारांचा शोध घेणे अधिक सुलभ होणार असून, गुन्हे प्रतिबंध आणि कायदा-सुव्यवस्था राखण्यात या उपक्रमाची मोठी मदत होणार आहे. हा प्रकल्प भंडारा पोलिसांच्या तंत्रज्ञानाधारित पोलिसिंगच्या दिशेने टाकलेले एक महत्त्वपूर्ण पाऊल मानले जात आहे.






