
पुणे: गणेशोत्सवात भाविकांचे दागिने चोणाऱ्या उत्तर प्रदेशातील आंतरराज्यीय टोळीचा पर्दाफाश; १३ गुन्हे उघडकीस, २१ लाखांचा मुद्देमाल जप्त

पुणे पोलिसांची मोठी कारवाई: गणेशोत्सवात भाविकांचे दागिने चोरणाऱ्या उत्तर प्रदेशातील आंतरराष्ट्रीय टोळीचा पर्दाफाश, २१ लाखांचा मुद्देमाल जप्त!
पुणे: गणेशोत्सवाच्या आनंदात विसर्जन मिरवणुकीदरम्यान पुणे शहरात एक खळबळजनक घटना घडली होती. गर्दीचा फायदा घेऊन भाविकांच्या अंगावरील सोन्याचे दागिने लुटणाऱ्या उत्तर प्रदेशातील एका आंतरराज्यीय कुख्यात टोळीचा फरासखाना पोलिसांनी यशस्वी पर्दाफाश केला आहे. या कारवाईत पोलिसांनी मुख्य आरोपीला अटक करून तब्बल २१ लाख रुपयांहून अधिकचा मुद्देमाल जप्त केला असून, एकाच वेळी तब्बल १३ गुन्हे उघडकीस आणले आहेत.

नेमकी घटना काय घडली?
२५ सप्टेंबर २०२६ रोजी रात्री साडेदहा ते सव्वाअकराच्या सुमारास, छत्रपती शिवाजी महाराज रोडवरील बेलबाग चौकाजवळ (बुधवार चौक, पुणे) एक संतापजनक प्रकार समोर आला. फिर्यादी सागर प्रकाश कोमटी आणि त्यांचे मित्र विक्रांत शिंदे हे दोघे गणेशोत्सव विसर्जन मिरवणूक पाहत गर्दीत उभे होते.

त्याच वेळी ६ अज्ञात इसमांनी त्यांना अचानक वेढा घातला. आरोपींनी त्यांना धक्काबुक्की व मारहाण करत चॉकुचा धाक दाखवला. त्यानंतर त्यांच्या खिशातील सॅमसंग कंपनीचा मोबाईल फोन आणि गळ्यातील ३८.३२० ग्रॅम वजनाची सोन्याची चैन (किंमत १,२१,४७६ रुपये) असा एकूण १,४६,४७६ रुपयांचा ऐवज बळचोरीने हिसकावून पळ काढला. याप्रकरणी फरासखाना पोलीस ठाण्यात तात्काळ जबरी चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला होता.

पोलिसांची चक्रे आणि खबऱ्यामार्फत तपास
गुन्ह्याचे गांभीर्य लक्षात घेऊन पुणे शहर पोलीस आयुक्त अमितेश कुमार, सहपोलीस आयुक्त संजय दराडे आणि पोलीस उपायुक्त कृषिकेश रावले यांच्या मार्गदर्शनाखाली फरासखाना पोलीस ठाण्याच्या तपास पथकाने युद्धपातळीवर तपास सुरू केला.
तपास पथकातील पोलीस अंमलदार गजानन सोनुने व चेतन होळकर यांना मिळालेल्या खात्रीशीर खबऱ्यावरून समजले की, हा गुन्हा उत्तर प्रदेशातील शामली जिल्ह्यातील एका सराईत टोळीने केला आहे. या माहितीच्या आधारे पोलिसांनी उत्तर प्रदेशमधील शामली जिल्ह्यातील इस्लामपूर घसौली येथील मूळ रहिवासी असलेल्या विजयपाल कवर सैन (वय ३४) या मुख्य आरोपीस जेरबंद केले. पोलिसांनी त्याची कसून चौकशी केली असता, त्याने आपल्या इतर ५ साथीदारांच्या मदतीने हा गुन्हा केल्याची कबुली दिली.

उत्तर प्रदेशपर्यंत धाड आणि २१ लाखांचा मुद्देमाल जप्त
फरासखाना पोलीस ठाण्याचे सहायक पोलीस निरीक्षक अनिल सुरवसे आणि त्यांच्या पथकाने थेट उत्तर प्रदेश गाठले. पोलिसांनी कसून शोध घेऊन आरोपींकडून खालीलप्रमाणे तब्बल २१,२१,१००/- रुपये किमतीचा मुद्देमाल हस्तगत केला:
-
१३९.७२० ग्रॅम वजनाचे सोन्याचे दागिने

-
फिर्यादीचा चोरीस गेलेला मोबाईल फोन
-
१ धारदार चाकू
-
१ लोखंडी कटर
१३ गुन्हे उघडकीस; गुन्हे करण्याची नवी पद्धत
या कारवाईमुळे केवळ हा एकच गुन्हा नव्हे, तर फरासखाना पोलीस ठाण्याकडील दाखल गुन्ह्यासह इतर १२ गुन्हे असे एकूण चैन चोरी आणि मंगळसूत्र चोरीचे १३ गंभीर गुन्हे उघडकीस आले आहेत.
चोरीची मोडस ऑपरेंडी: हे आरोपी उत्तर प्रदेशातील शामली येथील असून ते विशेषतः गर्दीची ठिकाणे, यात्रा किंवा मोठे उत्सव गाठतात. गर्दीचा पुरेपूर फायदा घेऊन ते भाविकाला चहूबाजूने घेरतात आणि हातातील लोखंडी कटरच्या साहाय्याने गळ्यातील सोन्याचे दागिने क्षणार्धात अलगद कापून पोबारा करतात.
पोलिसांचे यश
सदरची अत्यंत कौतुकास्पद कामगिरी पोलीस आयुक्त अमितेश कुमार, सहपोलीस आयुक्त संजय दराडे, अपर पोलीस आयुक्त राजेश बनसोडे, पोलीस उपायुक्त कृषिकेश रावले आणि सहायक पोलीस आयुक्त सचिन हिरे यांच्या मार्गदर्शनाखाली; फरासखाना पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक संदीप देशमाने, गुन्हे निरीक्षक (श्रीप्रकाश मुळे, राजेश महाला), सहा. पोलीस निरीक्षक अनिल सुरवसे, उप-निरीक्षक राजेंद्र पाटोळे तसेच तपास पथकातील सर्व अंमलदारांनी पार पाडली आहे.




