
हिंगणघाट येथे सेंट्रो कारने आलेल्या चोरट्याला अटक; १.५५ लाखांचा मुद्देमाल जप्त
हिंगणघाट (वर्धा):
हिंगणघाट पोलीस स्टेशनच्या गुन्हे प्रकटीकरण पथकाने (DB Team) बकरी चोरी प्रकरणी धडक कारवाई करत एका आरोपीला अटक केली आहे. आरोपीकडून चोरीत वापरलेली सेंट्रो कार, कटर आणि रोख रकमेसह एकूण १,५५,८३० रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.

घटनेचा संक्षिप्त वृत्तांत:
चिकमोह (ता. हिंगणघाट, जि. वर्धा) येथील तक्रारदार श्रीकांत संजय सोरटे (वय २५ वर्ष) यांनी दिलेल्या तक्रारीनुसार, ११ ऑगस्ट २०२६ च्या रात्री १२.०० वाजताच्या सुमारास त्यांनी त्यांच्या मालकीच्या ११ बकऱ्या घराच्या अंगणात बांधल्या होत्या. १२ ऑगस्ट रोजी पहाटे ४.०० वाजेच्या सुमारास अचानक पाऊस आल्याने ते बकऱ्या कोठ्यात बांधण्यासाठी बाहेर आले.

त्यावेळी अंगणात बांधलेल्या ११ बकऱ्यांपैकी एक मोठी काळ्या रंगाची बकरी (किंमत ₹७,०००) आणि एक काळ्या-पांढऱ्या रंगाची पाट (किंमत ₹२,०००) अशा एकूण ₹९,००० किमतीच्या दोन बकऱ्यांची दावण कापून अज्ञात चोराने पळवून नेल्याचे निदर्शनास आले. या तक्रारीवरून हिंगणघाट पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद (अप. क्र. १३१०/२०२६, कलम ३०३ (२) बी.एन.एस.) करून तपासाला सुरुवात करण्यात आली.
CCTV आणि तांत्रिक तपासाने आरोपी गळात:

गुन्ह्याचे गांभीर्य लक्षात घेऊन हिंगणघाट पोलीस ठाण्याच्या गुन्हे प्रकटीकरण पथकाने तपासचक्रे वेगाने फिरवली. परिसरातील CCTV कॅमेऱ्यांचे फुटेज आणि तांत्रिक बाबींच्या विश्लेषणावरून चोरीसाठी वापरण्यात आलेल्या वाहनाची ओळख पटवण्यात पोलिसांना यश आले.
तपासाच्या आधारे पोलिसांनी आरोपी सैय्यद तौफिक सैय्यद तन्वीर (वय ३६ वर्ष, रा. कलम चौक, कुरेशीपुरा, यवतमाळ) याला ताब्यात घेऊन अटक केली.

जप्त केलेला मुद्देमाल: आरोपीच्या ताब्यातून खालील मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे:
-
चारचाकी वाहन: वापरती हुंडाई सेंट्रो झिंग (सिल्वर रंग, क्र. MH-32 C-1749) – किंमत ₹१,५०,०००/-
-
साहित्य: बकऱ्यांचे दावे कापण्यासाठी वापरलेले कटर – किंमत ₹३०/-
-
नगदी रक्कम: चोरीच्या बकऱ्या विकून मिळालेल्या रकमेपैकी उर्वरित ₹५,८००/-
-
एकूण जप्ती: ₹१,५५,८३०/-
पोलीस पथकाची कामगिरी:
सदरची कारवाई वर्ध्याचे पोलीस अधीक्षक सौरभ कुमार अग्रवाल, अपर पोलीस अधीक्षक सदाशिव वाघमारे, उपविभागीय पोलीस अधिकारी सुशिल कुमार नायक यांच्या मार्गदर्शनात आणि ठाणेदार अनिल राऊत (पो. नी. हिंगणघाट) यांच्या सूचनेनुसार करण्यात आली.
तसेच गुन्हे शोध पथकाचे पोलीस हवालदार श्रीकांत खडसे, दिनेश तुमाने आणि पोलीस अमलबजावणी कर्मचारी प्रमोद जाधव, राजू ढगे यांनी ही यशस्वी कारवाई पार पाडली.




