
कोहमारा व नवेगावबांध येथील हार्डवेअर दुकाने फोडणारा चोरटा जेरबंद; एलसीबीकडून ६.१६ लाखांचा मुद्देमाल हस्तगत
गोंदिया स्थानिक गुन्हे शाखेची धडाकेबाज कारवाई: घरफोडी करून तांब्याचे तार चोरणारा आरोपी अटकेत, ६.१६ लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त
कोहमारा (पोलीस ठाणे डुग्गीपार) आणि नवेगावबांध टी-पॉइंट येथील हार्डवेअर दुकाने फोडून तांब्याचे तार चोरणाऱ्या आरोपीच्या स्थानिक गुन्हे शाखा (LCB), गोंदिया यांनी मुसक्या आवळल्या आहेत. या कारवाईत आरोपीकडून ६,१६,००० रुपयांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे. कोहमारा येथील रहिवासी नंदकिशोर खुशाल कापगते (वय ३८) यांच्या दुकानाचे कुलूप तोडून ७ ऑगस्ट ते ८ ऑगस्ट २०२६ च्या रात्री १०० किलो तांब्याची तार (किंमत ५०,००० रुपये) व रोख रक्कम असा एकूण ६०,००० रुपयांचा ऐवज चोरीला गेला होता. कापगते यांच्या तक्रारीवरून डुग्गीपार पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदवण्यात आला होता

तपास आणि आरोपीची अटक
गोंदियाचे पोलीस अधीक्षक श्री गोरख भामरे यांच्या सूचनांनुसार, स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक श्री रेवचंद सिंगनजुडे यांच्या नेतृत्वाखाली विशेष पथक तयार करून तपास सुरू करण्यात आला.

तपासादरम्यान मिळालेल्या तांत्रिक व गोपनीय माहितीवरून आरोपी अविनाश विजय राघोर्ते (वय २९, रा. अर्जुनी पुनर्वसन/गिरोला, जि. भंडारा) याला भंडारा येथून ताब्यात घेण्यात आले. चौकशीदरम्यान त्याने आपल्या दोन साथीदारांच्या मदतीने पुढील दोन ठिकाणी चोरी केल्याची कबुली दिली:
-
कोहमारा (डुग्गीपार): ७-८ ऑगस्ट २०२६ दरम्यान तांब्याच्या तारांचे बंडल चोरले.

-
नवेगावबांध टी-पॉइंट (संजय हार्डवेअर): १४-१५ जून २०२६ दरम्यान तांब्याच्या तारांचे बंडल चोरले.
जप्त केलेला मुद्देमाल

-
तांब्याची तार: २१० किलो (किंमत रु. १,१६,०००)
-
कार: गुन्ह्यात वापरलेली पांढऱ्या रंगाची झायलो कार (किंमत रु. ५,००,०००)
-
एकूण जप्त मुद्देमाल: रु. ६,१६,०००
आरोपीला पुढील तपासासाठी डुग्गीपार पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले आहे. ही कारवाई पोलीस अधीक्षक गोरख भामरे, अप्पर पोलीस अधीक्षक अभय डोंगरे यांच्या मार्गदर्शनाखाली एलसीबी (LCB), डुग्गीपार पोलीस व सायबर सेलच्या पथकाने संयुक्तपणे पार पाडली.




