
मोकाट जनावरे सार्वजनिक रस्त्यावर सोडणाऱ्यांविरुद्ध वर्धा पोलिसांची धडक कारवाई; गुन्हे दाखल
वर्धा:
वर्धा शहरातील सार्वजनिक रस्ते, मुख्य चौक आणि रहदारीच्या ठिकाणी पाळीव जनावरे मोकाट सोडल्यामुळे वाहतुकीला अडथळा निर्माण होण्यासोबतच नागरिक, पादचारी आणि वाहनचालकांच्या जीवितास गंभीर धोका निर्माण होत असल्याच्या तक्रारी प्राप्त होत होत्या. या पार्श्वभूमीवर, वर्धा शहर पोलीस, रामनगर पोलीस ठाणे आणि जिल्हा वाहतूक शाखा यांच्या संयुक्त पथकाने विशेष मोहीम राबवून मोकाट जनावरांच्या मालकांवर कायदेशीर गुन्हे दाखल केले आहेत. वर्धा शहर पोलीस ठाण्याच्या हद्दीत अनेक रस्त्यांवर पाळीव जनावरे कोणत्याही देखरेखीविना अथवा नियंत्रणाशिवाय मोकाट फिरताना व रस्त्याच्या मधोमध बसलेली निदर्शनास आली. अचानक रस्त्यावर येणाऱ्या जनावरांमुळे अपघातांची शक्यता वाढली होती. तसेच तपासणीदरम्यान, पशुपालकांनी जनावरांना योग्य निवारा, अन्न व पाणी न देता त्यांना अत्यंत हलगजीपणाने व तहान-उपासमारीच्या स्थितीत सोडून दिल्याचे उघडकीस आले.

नोंदवण्यात आलेले कायदेशीर गुन्हे व कलमे
वर्धा जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक सौरभकुमार अग्रवाल यांच्या थेट आदेशानुसार या बेजबाबदार पशुपालकांवर खालील कायद्यांन्वये संयुक्त कारवाई करत गुन्हे नोंदवण्यात आले आहेत:

-
भारतीय न्याय संहिता (BNS), २०२३: कलम २८५ (सार्वजनिक मार्गात धोका किंवा अडथळा निर्माण करणे)
-
महाराष्ट्र पोलीस अधिनियम, १९५१: कलम ९०(ए)

-
प्राण्यांचा छळ प्रतिबंधक अधिनियम, १९६०: कलम ११(१)(h) व ११(१)(i) (प्राण्यांची उपासमार, छळ व दुर्लक्ष करणे)
कारवाई करणारे पोलीस पथक

ही धडक कारवाई पोलीस अधीक्षक सौरभकुमार अग्रवाल, अपर पोलीस अधीक्षक सदाशिव वाघमारे आणि उपविभागीय पोलीस अधिकारी सुनील महाडिक यांच्या मार्गदर्शनाखाली पूर्ण करण्यात आली.
-
पोलीस निरीक्षक विलास पाटील (जिल्हा वाहतूक शाखा)
-
पोलीस निरीक्षक नागेशकुमार चतरकर (वर्धा शहर पोलीस ठाणे)
-
पोलीस निरीक्षक पौर्णिमा राखोंडे (रामनगर पोलीस ठाणे)
यांच्या संयुक्त पथकाने ही कारवाई यशस्वीरीत्या पार पाडली.
वर्धा पोलिसांचे नागरिकांना आवाहन
“आपल्या मालकीची किंवा ताब्यातील पाळीव जनावरे सार्वजनिक रस्ते, चौक अथवा वाहतुकीच्या ठिकाणी मोकाट सोडू नयेत. जनावरांमुळे सार्वजनिक सुरक्षिततेला धोका निर्माण झाल्यास किंवा वाहतुकीत अडथळा आल्यास संबंधित मालकांवर यापुढेही कठोर कायदेशीर कारवाई केली जाईल.”
— पोलीस स्टेशन, वर्धा शहर (जिल्हा वर्धा)




