
जन्मदात्या बापानेच ८ दिवसाच्या चिमुकलीच्या तोंडात तंबाखू कोंबून केली हत्या, कारण..
जळगाव : जळगाव जिल्ह्यातील हरिनगर तांडा (ता. जामनेर) येथे एक धक्कादायक घटना घडली आहे. जन्मदात्या पित्यानेच आपल्या ८ दिवसांच्या चिमुकलीची निघृण हत्या केली आहे. आधी दोन मुली असताना तिसरीही मुलगीच झाल्याने नराधम बापाने पोटच्या मुलीची हत्या केली. आठ दिवसांच्या चिमुरडीच्या तोंडात तंबाखू कोंबून आरोपीने तिची हत्या केली आणि मृतदेहाची परस्पर विल्हेवाट लावली. आशा कर्मचाऱ्याच्या सतर्कतेमुळे हा प्रकार उघडकीस आला. पोलिसांनी आरोपीला अटक केली आहे.
गोकुळ गोटीराम जाधव (वय ३०) असे या नराधम पित्याचे नाव आहे. आरोग्य विभागाचे पथक व पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार जामनेर तालुक्यातील वाकोदजवळ हरिनगर तांडा येथील गोकुळ जाधव याला दोन मुली आहेत. २ सप्टेंबर रोजी त्याच्या पत्नीची प्रसूती झाली व त्याला तिसरीही मुलगीच झाली. आरोपीने रविवारी (१० सप्टेंबर) रोजी चिमुकलीची हत्या केली.


या नवजात बालिकेची नोंद करण्यासाठी आशा सेविका गोकुळच्या घरी गेल्यानंतर चिमुरडी तिथे नव्हती. याची माहिती आशा सेविकेने वरिष्ठांना दिली. वैद्यकीय अधिकारी डॉ. संदीप कुमावत यांनी मंगळवारी गावाला भेट दिली. गोकुळने सुरुवातील चिमुरडीचा आजारपणाने मृत्यू झाल्याचे सांगितले. मात्र नंतर त्याच्याकडे अधिक चौकशी केल्यानंतर त्याने पोटच्या मुलीची हत्या केल्याचा गुन्हा कबूल केला. आरोपीने रविवारी रात्री चिमुरडीच्या तोंडात तंबाखू दिली व तिला झोळीत झोपविले. यात तिचा मृत्यू झाला. त्यानंतर रात्रीच चिमुरडीचा मृतदेह फर्दापूर ते वाकोद रस्त्यावर खड्डा खोदून पुरला. त्या वरून आरोपीविरुद्ध खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला.



