अकोल्यात १२ वा धोकादायक गुन्हेगार एमपीडीए कायद्यान्वये १ वर्षासाठी स्थानबद्ध

महाराष्ट्रातील महत्वाच्या क्राईम संबंधी बातम्यांसाठी आम्हाला जॅाईन करा
Instagram Follow

अकोल्यात सराईत गुन्हेगार एमपीडीए कायद्यान्वये एक वर्षासाठी स्थानबद्ध; जिल्हाधिकाऱ्यांचे कडक पाऊल

अकोला, दि. १० ऑक्टोबर २०२६ :

अकोला जिल्ह्यात गुन्हेगारी कारवायांना पायबंद घालण्यासाठी जिल्हा प्रशासनाने आणि पोलिसांनी कठोर भूमिका घेतली आहे. अकोला शहरातील रमाइवाडी, अशोक नगर, नायगाव आणि अकोट फाइल परिसरात दहशत माजवणाऱ्या १२ व्या धोकादायक इसमावर ‘एमपीडीए’ (MPDA) कायद्यान्वये धडक कारवाई करण्यात आली आहे. अजमत शहा उर्फ अश्शु रहमत शहा (वय २४ वर्षे) असे या कुख्यात गुंडाचे नाव असून, त्याला एक वर्षाकरिता जिल्हा कारागृहात स्थानबद्ध करण्यात आले आहे.



काय आहेत गुन्हे?

कुख्यात गुंड अजमत शहा याच्यावर यापूर्वी अनेक गंभीर गुन्हे दाखल आहेत. यामध्ये घातक हत्यारांनी किंवा साधानांनी इच्छापूर्वक दुखापत करणे, चोरी करणे, गुराढोरे चोरी करणे, फौजदारीपात्र धाकधपटशा देणे, शांतताभंग घडवून आणण्याच्या उद्देशाने अपमान करणे तसेच बेकायदेशीर शस्त्र बाळगणे यांसारख्या गुन्ह्यांचा समावेश आहे. त्याच्या या गुन्हेगारी कृत्यांमुळे परिसरातील नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण होते.

वारंवार प्रतिबंधक कारवाईनंतरही सुधारणा नाही

आरोपीवर यापूर्वी विविध कलमान्वये प्रतिबंधक कारवाई करण्यात आली होती. परंतु, या कारवाईचा त्याच्यावर काडीमात्रही परिणाम झालेला नव्हता. तो पोलिसांच्या प्रतिबंधक कारवाईला अजिबात जुमानत नसल्यामुळे त्याच्याविरुद्ध प्रशासनाने अधिक गंभीर दखल घेतली.



एमपीडीए अंतर्गत कारवाईचा बडगा

सराईत गुंडाच्या वाढत्या गुन्हेगारी वृत्तीला आळा घालण्यासाठी पोलीस अधीक्षक, अकोला यांनी त्याला एमपीडीए कायद्यान्वये स्थानबद्ध करण्याबाबतचा प्रस्ताव जिल्हाधिकाऱ्यांकडे सादर केला होता. या प्रस्तावाची जिल्हाधिकारी श्रीमती वर्षा मीना यांनी सखोल पडताळणी केली. तसेच स्वतःच्या स्रोतांद्वारे माहिती मिळवून, सदर कुख्यात गुंड हा अत्यंत धोकादायक व्यक्ती असल्याची खात्री पटल्यानंतर, त्याला एक वर्षाकरिता अकोला जिल्हा कारागृहात स्थानबद्ध ठेवण्याचे आदेश १० ऑक्टोबर २०२६ रोजी पारित केले. जिल्हाधिकाऱ्यांचे आदेश प्राप्त होताच पोलिसांनी तात्काळ कारवाई करत त्यास ताब्यात घेतले आणि कारागृहात डांबले.

पोलीस प्रशासनाचा सज्जड इशारा

सदर महत्त्वाची कारवाई पोलीस अधीक्षक  अर्चित चांडक यांच्या मार्गदर्शनाखाली अपर पोलीस अधीक्षक बी.चंद्रकांत रेड्डी, उपविभागीय पोलीस अधिकारी सुदर्शन पाटील, स्थानिक गुन्हे शाखा आणि पोलीस स्टेशन अकोट फाइल येथील पोलीस निरीक्षक नितीन लेहर्कर, पोलीस उपनिरीक्षक माजिद पठाण, ज्ञानेश्वर सैरिसे, पोकॉ. उदय शुक्ला, पोलीस निरीक्षक शेख रहीम व पोलीस अंमलदार प्रशांत इंगळे, हर्षल श्रीवास, इम्रान शहा आणि अब्दुल अमीर यांच्या पथकाने यशस्वीरीत्या पार पाडली.



या कारवाईनंतर जिल्हा पोलीस अधीक्षक अर्चित चांडक यांनी स्पष्ट इशारा दिला आहे की, “अकोला जिल्ह्यात आगामी उत्सवांमधे कायदा व सुव्यवस्था अबाधित राखून शांतता राहावी, यासाठी अशा प्रकारचे गुन्हे करणारे व कारवाईस न जुमानणाऱ्या सराईत गुन्हेगारांवर एमपीडीए व इतर प्रचलित कायद्यान्वये कठोर कारवाई केली जाईल.”









WP2Social Auto Publish Powered By : XYZScripts.com
error: Content is protected !!