
चांदूर रेल्वे तालुक्यात ७ लाखांचे बोगस HTBT कापूस बियाणे जप्त; तळेगाव दशासर पोलीस व कृषी विभागाची मोठी कारवाई!
शेतकऱ्यांची फसवणूक करणाऱ्या बोगस आणि प्रतिबंधित बियाणे विक्रेत्यांविरोधात अमरावती ग्रामीण पोलिसांनी मोठी मोहीम उघडली आहे. अमरावती जिल्हयातील चांदूर रेल्वे तालुक्यातील निमगव्हाण शिवारात तळेगाव दशासर पोलीस आणि कृषी विभागाच्या जिल्हास्तरीय भरारी पथकाने संयुक्तपणे छापा टाकून तब्बल ७ लाख १२ हजार ८०० रुपये किमतीचा प्रतिबंधित एचटीबीटी (HTBT) कपाशी बियाण्यांचा साठा जप्त केला आहे. याप्रप्रकरणी २१ वर्षीय मुख्य आरोपीला अटक करण्यात आली आहे.
नेमकी घटना काय?
HTBT (हर्बिसाईड टॉलेरंट बॅसिलस थुरींजियांसिस) हे जनुकीय बदल केलेले कापसाचे वाण पर्यावरणासाठी अत्यंत हानिकारक असल्याने केंद्र व राज्य शासनाने त्यावर पूर्णपणे बंदी घातली आहे. असे असतानाही काही विक्रेते शेतकऱ्यांची फसवणूक करत असल्याची माहिती अमरावती ग्रामीणचे पोलीस अधीक्षक श्री. निकेतन कदम यांना मिळाली होती. त्यांनी तातडीने जिल्ह्यातील सर्व ठाणेदारांना अशा बेकायदेशीर विक्रेत्यांवर कडक कारवाईचे आदेश दिले होते.

दिनांक १० जून २०२६ रोजी तळेगाव दशासर पोलीस स्टेशनचे ठाणेदार स.पो.नि. किरण औटे व त्यांचे पथक गस्तीवर असताना, त्यांना एका गोपनीय बातमीदाराकडून विश्वासू माहिती मिळाली. धामणगाव रेल्वे येथील रहिवासी असलेला शुभमसिंग बलजितसिंग चौधरी (वय २१ वर्षे) याने निमगव्हाण येथील राजकुमार व्यंकटराव पर्बत यांच्या शेतातील एका खोलीत बेकायदेशीर एचटीबीटी कपाशी बियाण्यांचा मोठा साठा विक्रीसाठी लपवून ठेवला आहे.
पोलीस आणि कृषी विभागाची संयुक्त धाड
माहितीची खातरजमा केल्यानंतर पोलिसांनी जिल्हा गुणवत्ता नियंत्रण अधिकारी (अमरावती) यांना तातडीने कारवाईत सहभागी होण्याचे आवाहन केले. कृषी विभागाचे अधिकारी घटनास्थळी पोहोचल्यानंतर, पोलीस आणि कृषी पथकाने पंचांसमक्ष संबंधित शेतातील खोलीवर छापा टाकला.

या छाप्यात खोलीची झडती घेतली असता, खालील नामांकित ब्रँड्सचे एकूण ४३२ बोगस बियाण्यांचे पॅकेट्स आढळून आले:
-
विराट ब्रँड: १५५ पॅकेट्स

-
ग्लायको गार्ड ब्रँड: १४० पॅकेट्स
-
महाराजा ब्रँड: ८१ पॅकेट्स

-
कोहिनूर ब्रँड: ५६ पॅकेट्स
जप्त एकूण साठा: ४३२ पॅकेट्स (प्रति पॅकेट किंमत रु. १६५०/-)
एकूण किंमत: रु. ७,१२,८००/-
आरोपीवर विविध कलमांखाली गुन्हा दाखल
चांदूर रेल्वे पंचायत समितीचे कृषी अधिकारी तथा गुण नियंत्रण निरीक्षक श्री. रवी महादेवराव राणे यांनी दिलेल्या फिर्यादीवरून, आरोपी शुभमसिंग बलजितसिंग चौधरी याच्याविरुद्ध तळेगाव दशासर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करून त्याला अटक करण्यात आली आहे.
आरोपीवर खालील कडक कायदेशीर कलमांन्वये गुन्हा नोंदवण्यात आला आहे:
-
भारतीय न्याय संहिता (BNS) कलम ३१८ (४), ३ (५)
-
बियाणे नियम १९६८ चे कलम ७ ते १५
-
बियाणे (नियंत्रण) आदेश १९८३ चे कलम ३, ९
-
बीज अधिनियम आणि पर्यावरण संरक्षण अधिनियम १९८६ चे कलम ७, ८, १५
-
अत्यावश्यक वस्तू अधिनियम १९५५ चे कलम ३, ७, ९
या अधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनात झाली कारवाई
ही धडक कारवाई अमरावती ग्रामीणचे पोलीस अधीक्षक श्री. निकेतन कदम, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी श्री. राहुल सातपुते, अप्पर पोलीस अधीक्षक श्री. दत्ता तोटेवाड, उपविभागीय पोलीस अधिकारी (चांदूर रेल्वे) श्री. अशोक थोरात, आणि तंत्र अधिकारी श्री. नितीन लोखंडे यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली.
तसेच, जिल्हास्तरीय भरारी पथक प्रमुख श्री. प्रवीण खर्चे व त्यांचे पथक, आणि तळेगाव दशासरचे ठाणेदार स.पो.नि. श्री. किरण औटे व त्यांच्या पोलीस अंमलदारांच्या पथकाने ही कारवाई यशस्वीरीत्या पूर्ण केली.
शेतकऱ्यांना प्रशासनाचे आवाहन
“एचटीबीटी कपाशीचे बियाणे हे पर्यावरण आणि मानवी आरोग्यासाठी अत्यंत घातक आहे. त्यामुळे केंद्र सरकारने याच्या विक्री व लागवडीवर बंदी घातली आहे. कोणत्याही शेतकऱ्याने अशा बोगस बियाण्यांची खरेदी किंवा लागवड करू नये. तसेच, अशा प्रतिबंधित बियाणांचा साठा, विक्री किंवा लागवड करताना कोणी आढळल्यास त्यांच्यावर कठोर कायदेशीर कारवाई केली जाईल.”
– पोलीस प्रशासन व कृषी विभाग, अमरावती.




