तुमसर रोड देव्हाडी येथील ७ दुकाने फोडणारे अट्टल चोरटे २४ तासांत गजाआड

महाराष्ट्रातील महत्वाच्या क्राईम संबंधी बातम्यांसाठी आम्हाला जॅाईन करा
Instagram Follow

तुमसर पोलीस ठाण्याच्या हद्दीत एकाच रात्री सात दुकाने फोडून धुमाकूळ घालणाऱ्या आंतरजिल्हा चोरट्यांच्या टोळीला जेरबंद करण्यात पोलिसांना मोठे यश आले आहे. तुमसर पोलिसांनी स्थानिक नागरिकांच्या सतर्कतेमुळे आणि मदतीने अवघ्या २४ तासांच्या आत या अट्टल आरोपींना बेड्या ठोकल्या आहेत. आरोपींकडून चोरीला गेलेला सर्व रोख मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.

तळेगाव दशासर येथील बोगस बियाणे कारवाईच्या फोटो धडकेनंतर  अमरावती ग्रामीण पोलिसांप्रमाणेच आता भंडारा पोलिसांनीही गुन्हेगारांवर कडक जरब बसवली आहे.



एकाच रात्री ७ दुकानांवर डल्ला

मिळालेल्या माहितीनुसार, तुमसर रोड येथील देव्हाडी रेल्वे स्थानक परिसर आणि गांधी वॉर्ड देव्हाडी चौक या भागात अज्ञात चोरांनी धुमाकूळ घातला होता. चोरट्यांनी दुकानांचे शटर एका बाजूने वाकवून आत प्रवेश करण्याची एकच पद्धत (Modus Operandi) वापरली होती.

  • गांधी वॉर्ड देव्हाडी चौक: येथील सौ. प्रमिला किसन सोनवाने (वय ५० वर्ष) यांच्या चहा-पानाच्या टपरीचे शटर वाकवून गल्ल्यातील ५,००० रुपये रोख आणि शेजारील रामू बंधाटे यांच्या दुकानातून ३०० रुपये रोख, अशी एकूण ५,३०० रुपयांची चोरी झाली. याच चौकातील इतर तीन दुकानांचे शटर वाकवून चोरी करण्याचा प्रयत्न केला गेला.



  • रेल्वे स्टेशन परिसर: येथील शहारे यांच्या ‘साईबाबा उपहारगृह’मधून १,२०0 रुपये रोख (चिल्लर) आणि शेजारील ‘कावळे ट्रेडर्स’ या दुकानातून ५,००० रुपये रोख, अशी एकूण ६,२00 रुपयांची रोख रक्कम लंपास करण्यात आली होती.

या घटनेमुळे व्यापारी वर्गात प्रचंड खळबळ उडाली होती. याप्रकरणी तुमसर पोलीस ठाण्यात अप. क्र. ७४८/२०२६ आणि ७४९/२०२६ अंतर्गत भारतीय न्याय संहिता (BNS) २०२३ च्या कलम ३३१ (३), ३३१ (४) आणि ३०५ (अ) नुसार गुन्हे दाखल करण्यात आले होते.



स्थानिकांच्या मदतीने २४ तासांत आरोपी जेरबंद

गुन्ह्याचे गांभीर्य ओळखून तुमसर पोलिसांनी तात्काळ तपासाची चक्रे फिरवली. पोलीस हवालदार शिवाजी कनोजिया, पोलीस शिपाई निखिल बिसने आणि डी.बी. (गुन्हे शोध) पथकाने घटनास्थळाची बारकाईने पाहणी केली. स्थानिक रहिवाशांनी दिलेल्या महत्त्वपूर्ण माहितीच्या आधारे पोलिसांनी रेल्वे स्थानक तुमसर परिसरातून संशयास्पद स्थितीत असलेल्या दोन आरोपींना ताब्यात घेतले.

अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे: १. करण कन्हैय्या दुर्गा (वय २४ वर्षे), रा. कामठी, जि. नागपूर. २. एक विधी संघर्ष बालक (वय १७ वर्षे १० महिने), रा. कामठी, जि. नागपूर.



आरोपींना पोलीस ठाण्यात आणून पोलिसी खाक्या दाखवताच त्यांनी गुन्ह्याची कबुली दिली. पोलिसांनी त्यांच्याकडून चोरीला गेलेली सर्व नगदी रक्कम हस्तगत केली आहे. या गुन्ह्याचा पुढील तपास स.पो.नि. आकाश कुमार साखरे करत आहेत.

या अधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनात झाली कारवाई

ही यशस्वी कामगिरी भंडारा जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक श्री. नूरुल हसन, अपर पोलीस अधीक्षक श्री. निलेश मोरे, सहाय्यक पोलीस अधीक्षक (तुमसर) श्री. मयंक माधव, आणि तुमसरचे पोलीस निरीक्षक श्री. सुभाष बारसे यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली.

तसेच तपासात सपोनि आकाश कुमार साखरे यांच्यासह डी.बी. पथकाचे अंमलदार पोलीस शिपाई गिरीपुंजे, बावने, दमाहे आणि झंझाड यांनी अत्यंत महत्त्वाची भूमिका बजावली. पोलिसांच्या या तत्पर कामगिरीमुळे देव्हाडी परिसरातील व्यापाऱ्यांनी सुटकेचा श्वास सोडला असून पोलिसांचे कौतुक होत आहे.







WP2Social Auto Publish Powered By : XYZScripts.com
error: Content is protected !!