
अवैध जुगारावर पोलिसांचा दणका; 11 लाखांचा मुद्देमाल जप्त
मोर्शी पोलिसांची अवैध जुगार अड्ड्यावर धाड; 11 लाखांहून अधिक मुद्देमाल जप्त, 12 जण ताब्यात
अमरावती ग्रामीण जिल्ह्यातील मोर्शी पोलीसांनी अवैध जुगार व्यवसायाविरोधात मोठी कारवाई करत जुगार अड्ड्यावर धाड टाकून 12 जणांना ताब्यात घेतले आहे. या कारवाईत रोख रक्कम, चारचाकी वाहन, मोटारसायकली, मोबाईल फोन आणि जुगार साहित्य असा एकूण 11 लाख 20 हजार 750 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.ही कारवाई पोलीस अधीक्षक निकेतन कदम, अपर पोलीस अधीक्षक दत्ता तोटेवाड आणि उपविभागीय पोलीस अधिकारी यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडली. पोलीस निरीक्षक राहुल आटवले यांच्या नेतृत्वाखालील पथकातील अधिकारी व कर्मचाऱ्यांनी ही यशस्वी कारवाई केली.

अमरावती ग्रामीणचे पोलीस अधीक्षक निकेतन कदम यांनी जिल्ह्यातील अवैध धंद्यांवर कठोर कारवाई करण्याचे आदेश दिले होते. त्यानुसार मोर्शी पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक राहुल आटवले यांच्या नेतृत्वाखाली विशेष पथक कार्यरत होते. दरम्यान, ग्राम उडखेड परिसरातील शेतशिवारात काही व्यक्ती मोठ्या प्रमाणात जुगार खेळत असल्याची गोपनीय माहिती पोलिसांना मिळाली.
माहितीची खातरजमा करून पोलिसांनी संबंधित ठिकाणी अचानक छापा टाकला. पोलिसांची चाहूल लागताच काही जणांनी पळून जाण्याचा प्रयत्न केला, मात्र पोलिसांनी वेढा घालून 12 जणांना रंगेहात पकडले. घटनास्थळी जुगारासाठी वापरण्यात येणारे साहित्य तसेच रोख रक्कम आढळून आली.

या कारवाईत पोलिसांनी 20 मोटारसायकली, एक चारचाकी वाहन, 9 मोबाईल फोन, रोख 48 हजार 850 रुपये तसेच पत्त्यांचे बॉक्स आणि इतर जुगार साहित्य जप्त केले. जप्त करण्यात आलेल्या मुद्देमालाची एकूण किंमत 11 लाख 20 हजार 750 रुपये इतकी आहे.
अटक करण्यात आलेल्या आरोपींमध्ये यश अनिल वागाडे, आकाश दीपक खराळे, विशाल बलराम धुबे, चिरंजीव बजरंगसिंग गहवाल, परवेज शेख, महेश रमेशराव बनाईत, मोहम्मद शेहबाज शेख, शेख समीर शेख सलीम, अब्दुल नदिम, अब्दुल एजाज, ताहेर खान हुसेन खान आणि अनिल गुलाबराव पाटील यांचा समावेश आहे.

या प्रकरणी सर्व आरोपींविरुद्ध महाराष्ट्र जुगार प्रतिबंधक कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास मोर्शी पोलीस स्टेशनकडून सुरू आहे.
अवैध जुगार, दारू विक्री आणि इतर बेकायदेशीर धंद्यांविरोधात अशाच प्रकारच्या कठोर कारवाया पुढेही सुरू राहतील, असा इशारा पोलिसांनी दिला आहे





