
अमरावतीत तडीपार आरोपी अटकेत; देशी कट्टा व काडतुसे जप्त
सराईत तडीपार आरोपीकडून देशी कट्टा व जिवंत काडतुसे जप्त; अमरावती गुन्हे शाखेची कारवाई
अमरावती शहर गुन्हे शाखेने अवैधरित्या शस्त्र बाळगणाऱ्या एका सराईत तडीपार आरोपीला अटक करून त्याच्याकडून एक देशी कट्टा (पिस्तूल) आणि दोन जिवंत काडतुसे जप्त केली आहेत. या कारवाईत एकूण ३७ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.

पोलीस आयुक्त राकेश ओला यांच्या निर्देशानुसार शहरातील अवैध शस्त्रधारकांविरुद्ध विशेष मोहीम राबविण्यात येत आहे. त्याअंतर्गत गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक अतुल वरे व पोलीस निरीक्षक दिनेश दहातोंडे यांच्या मार्गदर्शनाखालील पथकाला गुप्त माहिती मिळाली की, नागपुरी गेट पोलीस ठाण्याच्या हद्दीतील तडीपार आरोपी एहसान खान हा देशी बनावटीचा कट्टा बाळगून फेजरपुरा परिसरात फिरत आहे.
मिळालेल्या माहितीच्या आधारे गुन्हे शाखेच्या पथकाने आशियाना क्लब परिसरात सापळा रचून संशयिताला ताब्यात घेतले. त्याची झडती घेतली असता त्याच्याकडून एक देशी कट्टा (पिस्तूल) आणि दोन जिवंत काडतुसे आढळून आली. पोलिसांनी तात्काळ ही शस्त्रे जप्त केली. चौकशीत आरोपीने ही शस्त्रे रेहान खान अयुब खान उर्फ ‘रेहान बंदूक’ याच्याकडून घेतल्याची कबुली दिली.

अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव एहसान खान हसन खान (वय २५, रा. गुलिस्ता नगर, अमरावती) असे असून तो सराईत गुन्हेगार आहे. त्याच्यावर यापूर्वीही गंभीर गुन्हे दाखल आहेत. तसेच त्याला अमरावती शहर व ग्रामीण जिल्ह्यातून दोन वर्षांसाठी तडीपार करण्यात आले होते. तरीही कोणतीही परवानगी न घेता तो शहरात फिरत असल्याचे निष्पन्न झाले.
या प्रकरणात फेजरपुरा पोलीस ठाण्यात शस्त्र कायदा (Arms Act) कलम 3/25 तसेच महाराष्ट्र पोलीस अधिनियमातील संबंधित कलमांन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. रेहान खान हा फरार असून त्याचा शोध सुरू आहे.

पोलिसांनी आरोपीकडून एक देशी कट्टा (किंमत अंदाजे ३५ हजार रुपये) आणि दोन जिवंत काडतुसे (किंमत २ हजार रुपये) असा एकूण ३७ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे.
ही कारवाई पोलीस आयुक्त राकेश ओला, पोलीस उपायुक्त यशवंत सोळंके, पोलीस उपायुक्त श्याम घुगे, पोलीस उपायुक्त रमेश धुमाळ तसेच गुन्हे शाखेतील वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे शाखेच्या विशेष पथकाने यशस्वीरित्या पार पाडली





