ही कारवाई पोलीस अधीक्षक निकेश खाटमोडे-पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली, अपर पोलीस अधीक्षक लता फड, उपविभागीय पोलीस अधिकारी नवदीप अग्रवाल, पोलीस निरीक्षक प्रदीप परदेशी, पोलीस उपनिरीक्षक निलेश जाधव तसेच स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने अथक परिश्रम घेऊन यशस्वीरीत्या पार पाडली.
मिळालेल्या माहितीनुसार, 1 जून 2026 रोजी फिर्यादी सुबोध परमेश्वर खंदारे (रा. कोणाटी, ता. सिंदखेडराजा, जि. बुलढाणा) यांनी मालेगाव पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली होती. त्यांनी दिलेल्या तक्रारीनुसार, रात्रीच्या वेळी त्यांच्या जवळील 50 हजार रुपये रोख रक्कम तसेच दोन मोबाईल फोन अज्ञात चोरट्याने चोरून नेले होते. या प्रकरणी मालेगाव पोलीस ठाण्यात गुन्हा क्रमांक 379/2026 अंतर्गत भारतीय न्याय संहिता कलम 303(2) नुसार गुन्हा दाखल करण्यात आला.
गुन्ह्याची माहिती मिळताच स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक प्रदीप परदेशी यांनी तातडीने विशेष पथक तयार करून तपासाला सुरुवात केली. घटनास्थळ परिसरातील साक्षीदारांची चौकशी, गोपनीय माहितीदारांकडून मिळालेली माहिती आणि तांत्रिक विश्लेषणाच्या आधारे संशयित आरोपीची ओळख पटविण्यात आली.
तपासादरम्यान आरोपी हा मध्य प्रदेशातील रहिवासी असल्याचे निष्पन्न झाले. मात्र तो ट्रक चालक असल्याने सतत वेगवेगळ्या ठिकाणी फिरत असल्यामुळे त्याचा शोध घेणे आव्हानात्मक ठरत होते. स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने तब्बल 15 दिवस तांत्रिक माहितीच्या आधारे आरोपीच्या हालचालींवर लक्ष ठेवले. दरम्यान आरोपी चंद्रपूर येथे ट्रक घेऊन येणार असल्याची खात्रीलायक माहिती मिळाल्यानंतर पथक तातडीने चंद्रपूरला रवाना झाले.
चंद्रपूर येथे सापळा रचून पोलिसांनी नितेश सुखेंद्र पांडे (रा. पिपराहा, जि. सिंधी, मध्य प्रदेश) याला ताब्यात घेतले. चौकशीदरम्यान आरोपीने चोरीची कबुली दिली. त्याच्याकडून चोरीतील 36 हजार रुपये रोख रक्कम, 14 हजार रुपये किमतीचा आयफोन आणि 10 हजार रुपये किमतीचा आयक्यू कंपनीचा मोबाईल असा एकूण 60 हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.
सध्या आरोपीकडे आणखी कोणत्या चोरीच्या घटनांबाबत माहिती आहे का, याचा तपास सुरू असून त्याने इतर ठिकाणीही अशा प्रकारचे गुन्हे केले आहेत का याची चौकशी केली जात आहे.