कॉपर वायर-ट्रान्सफॉर्मर चोरी प्रकरण उघड; 26 गुन्ह्यांची उकल, 20 लाखांचा मुद्देमाल जप्त

महाराष्ट्रातील महत्वाच्या क्राईम संबंधी बातम्यांसाठी आम्हाला जॅाईन करा
Instagram Follow

कॉपर वायर व ट्रान्सफॉर्मर चोरी करणारी टोळी गजाआड; 26 गुन्ह्यांची उकल, 20.22 लाखांचा मुद्देमाल जप्त

सातारा जिल्ह्यातील बोरगाव पोलीस ठाण्याच्या हद्दीत गेल्या दोन महिन्यांपासून शेतीपंपांच्या कॉपर वायर व डी.पी. (ट्रान्सफॉर्मर) चोरीच्या घटना वारंवार घडत होत्या. या वाढत्या घटनांची गंभीर दखल घेत पोलीस अधीक्षक निखील पिंगळे, अपर पोलीस अधीक्षक वैशाली कडुकर आणि उपविभागीय पोलीस अधिकारी राजीव नवले यांनी स्थानिक गुन्हे शाखा व बोरगाव पोलिसांना आरोपींचा शोध घेऊन कठोर कारवाई करण्याचे निर्देश दिले होते.ही उल्लेखनीय कारवाई स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक विश्वजीत घोडके, प्रभारी सहाय्यक पोलीस निरीक्षक प्रशांत हुले, पोलीस उपनिरीक्षक एम. ई. पाटील, एस. एम. बसवंत तसेच बोरगाव पोलीस ठाणे व स्थानिक गुन्हे शाखेतील अधिकारी व कर्मचाऱ्यांच्या संयुक्त प्रयत्नातून करण्यात आली.



यानुसार बोरगाव पोलीस ठाण्याचे प्रभारी सहाय्यक पोलीस निरीक्षक प्रशांत हुले, पोलीस उपनिरीक्षक एम. ई. पाटील, बोरगाव डी.बी. पथक तसेच स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने घटनास्थळांची पाहणी करून सखोल तपास सुरू केला. गोपनीय माहितीदारांकडून मिळालेली माहिती, सायबर विश्लेषण आणि तांत्रिक तपासाच्या आधारे पोलिसांनी पाच संशयितांना ताब्यात घेतले.

अटक करण्यात आलेल्या आरोपींमध्ये हर्षद सुनिल जाधव (वय 23, रा. सासपडे), स्वप्नील संजय मगर (वय 21, रा. ढोरोशी), विकास वाल्मिक कदम (वय 23, रा. मरळोशी), विवेक विजय लादे (वय 23, रा. सासपडे) आणि शेखर चंद्रकांत सावंत (रा. निवडे, ता. पाटण) यांचा समावेश आहे. चौकशीत त्यांनी मुख्य आरोपी सागर चंद्रकांत मोरे (रा. भुडकेवाडी, ता. पाटण) व इतर साथीदारांसह संगनमत करून विविध ठिकाणी चोरी केल्याची कबुली दिली.



तपासादरम्यान आरोपींनी बोरगाव, कोरेगाव, सातारा तालुका, सातारा शहर, भुईंज आणि उंब्रज पोलीस ठाण्यांच्या हद्दीत एकूण 26 ठिकाणी कॉपर वायर व ट्रान्सफॉर्मर चोरी केल्याचे उघड झाले. पोलिसांनी आरोपींकडून चोरीसाठी वापरण्यात आलेली एक पिकअप, चार मोटारसायकली, पाच मोबाईल फोन, चोरीसाठी लागणारे साहित्य, चोरीचा मुद्देमाल तसेच रोख रक्कम असा एकूण 20 लाख 22 हजार 482 रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे.

या कारवाईमुळे बोरगाव पोलीस ठाण्यातील 5, कोरेगावमधील 10, सातारा तालुक्यातील 5, सातारा शहरातील 2, भुईंजमधील 3 आणि उंब्रजमधील 1 अशा एकूण 26 गुन्ह्यांची उकल करण्यात पोलिसांना यश आले आहे.









WP2Social Auto Publish Powered By : XYZScripts.com
error: Content is protected !!