अकोला पोलिसांची धडक कारवाई: ४ लाख २० हजारांचे सोने-चांदी जप्त, आरोपीला अटक!

महाराष्ट्रातील महत्वाच्या क्राईम संबंधी बातम्यांसाठी आम्हाला जॅाईन करा
Instagram Follow

अकोला पोलिसांची मोठी कारवाई! अकोलखेड घरफोडीचा छडा; ४ लाख २० हजारांच्या मुद्देमालासह सराईत चोरट्याला अटक

अकोला: अकोला जिल्ह्यातील घरफोडी आणि चोरीच्या गुन्ह्यांना आळा घालण्यासाठी अकोल्याचे माननीय पोलीस अधीक्षक श्री. अनिकेत चांदक यांनी विशेष मोहीम हाती घेतली आहे. त्यांच्या आदेशानुसार स्थानिक गुन्हे शाखेने (LCB) धडक कारवाई करत अकोट ग्रामीण पोलीस ठाण्याच्या हद्दीतील अकोलखेड येथील धाडसी घरफोडीचा छडा लावला आहे. या कारवाईत ४,२०,६००/- रुपये किमतीच्या सोने आणि चांदीच्या लगडीसह एका सराईत चोरट्याला जेरबंद करण्यात आले आहे.ही धडक कारवाई पोलीस अधीक्षक श्री. अनिकेत चांदक, अपर पोलीस अधीक्षक श्री. बी. चंद्रकांत रेड्डी, आणि पो.नि. श्री. नितीन लेव्हरकर (स्थागुशा अकोला) यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली. 



नेमकी घटना काय होती?

अकोट तालुक्यातील अकोलखेड येथील रहिवासी फिर्यादी देवानंद मधुकर फरकाडे यांच्या तक्रारीनुसार, दिनांक १० जून २०२६ रोजी सकाळी ६:०० ते संध्याकाळी ५:०० च्या दरम्यान अज्ञात चोरट्याने त्यांच्या बंद घराच्या खिडकीचे लोखंडी ग्रिल आणि प्लायवूड काढून आत प्रवेश केला होता. चोरट्याने घरातील बेडरुममधील लोखंडी कपाटाचे कुलूप तोडून आतील सोन्याची नथ, पेन्डल, डोरले, अंगठ्या, कानातले टॉप्स आणि चांदीच्या तोरड्या असा मौल्यवान ऐवज चोरून नेला होता. या प्रकरणी अकोट ग्रामीण पोलीस ठाण्यात अज्ञात आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला होता.

अशी झाली आरोपीला अटक

पोलीस अधीक्षक श्री. अनिकेत चांदक यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेने समांतर तपास सुरू केला. तपासादरम्यान गोपनीय बातमीदाराकडून मिळालेल्या माहितीच्या आधारे, हा गुन्हा चोहट्टा बाजार (ता. अकोट) येथील सराईत गुन्हेगार रवी उर्फ नारायण रामदास डाबेराव (वय ३६ वर्षे, रा. गणेश नगर, चोहट्टा बाजार) याने केल्याचे समोर आले.



स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने चोहट्टा बाजार पोलीस चौकीचे अंमलदार विनोद गोलाईत यांच्या मदतीने अत्यंत शिताफीने सापळा रचून आरोपीला ताब्यात घेतले.

४ लाख २० हजारांचा मुद्देमाल जप्त

आरोपीची कसून चौकशी केली असता, त्याने गुन्ह्याची कबुली दिली. चोरलेल्या दागिन्यांची विल्हेवाट लावण्यासाठी त्याने ते वितळवले होते. पोलिसांनी त्याच्याकडून खालील मुद्देमाल जप्त केला आहे:



  • सोन्याची लगड: २६.२४० ग्राम वजनाची पिवळ्या धातूची (सोन्याची) लगड (किंमत अंदाजे ४,०४,०००/- रुपये).

  • चांदीचा गोळा: ६४ ग्राम वजनाचा चांदीचा गोळा (किंमत अंदाजे १६,६००/- रुपये).



एकूण जप्त मुद्देमाल: ४,२०,६००/- रुपये.

पुढील कारवाई: अटक करण्यात आलेला आरोपी आणि जप्त केलेला मुद्देमाल पुढील कायदेशीर तपासासाठी अकोट ग्रामीण पोलिसांच्या स्वाधीन करण्यात आला आहे.

या पथकाने केली यशस्वी कारवाई

 यामध्ये सपोनि आशिष देशमुख, गोपाल जाधव, पोउपनि माजीद पठाण, तसेच पोलीस अंमलदार शेख हसन, रवि खंडारे, अब्दुल माजीद, वसीमोद्दीन, महेंद्र मलीये, किशोर सोनुने, स्वप्नील खेडकर, सुलतान पठाण, श्रीकांत पातोंड, अमोल दिपके, देवानंद खरात आणि विनोद गोलाईत यांनी महत्त्वपूर्ण भूमिका बजावली.







WP2Social Auto Publish Powered By : XYZScripts.com
error: Content is protected !!