मोठी कारवाई: गडचिरोलीत माओवाद्यांचा शस्त्रनिर्मिती कारखाना उद्ध्वस्त, ५-६ टन वजनाची लेथ मशीन नष्ट

महाराष्ट्रातील महत्वाच्या क्राईम संबंधी बातम्यांसाठी आम्हाला जॅाईन करा
Instagram Follow

गडचिरोली पोलीस आणि सीआरपीएफची मोठी कारवाई: माओवाद्यांचा शस्त्रनिर्मिती कारखाना उद्ध्वस्त, ५ ते ६ टन वजनाची लेथ मशीन व इतर साहित्य नष्ट

गडचिरोली: गडचिरोली जिल्हा पोलीस दल आणि केंद्रीय राखीव पोलीस दलाच्या (CRPF) जवानांनी नक्षलवाद्यांविरोधात एक मोठी आणि अत्यंत प्रभावी कारवाई केली आहे. महाराष्ट्र आणि छत्तीसगडच्या सीमेवरील बालबेडा जंगल परिसरात माओवाद्यांनी जमिनीत पुरून ठेवलेले प्रचंड प्रमाणात शस्त्रनिर्मितीचे साहित्य आणि स्फोटके शोधून काढून ती जागीच नष्ट करण्यात सुरक्षा दलांना मोठे यश आले आहे.ही अत्यंत महत्त्वाची कारवाई पोलीस अधीक्षक एम. रमेश यांच्या आदेशाने आणि अपर पोलीस अधीक्षक (अभियान) श्री. कार्तिक मधिरा, अपर पोलीस अधीक्षक (प्रशासन)  गोकुल राज जी., तसेच पोलीस उप-अधीक्षक (अभियान)  विशाल नागरगोजे यांच्या देखरेखीखाली करण्यात आली होती.



गोपनीय माहितीच्या आधारे विशेष मोहीम

सुरक्षा दलांना धोका पोहोचवण्याच्या आणि घातपाती कारवाया करण्याच्या उद्देशाने माओवादी दुर्गम जंगलाचा फायदा घेऊन मोठ्या प्रमाणात शस्त्र आणि स्फोटक साहित्याची निर्मिती करत असत आणि ते जमिनीत लपवून ठेवत असत. नक्षल सप्ताह किंवा निवडणुकांच्या काळात सुरक्षा दलांवर हल्ले करण्यासाठी या साहित्याचा वापर केला जाणार होता.

महाराष्ट्र-छत्तीसगड सीमेवरील बालबेडा जंगलात असे साहित्य लपवले असल्याची गोपनीय माहिती गडचिरोली पोलिसांना मिळाली. या माहितीच्या आधारे गडचिरोलीचे पोलीस अधीक्षक श्री. एम. रमेश यांच्या मार्गदर्शनाखाली २६ जून २०२६ रोजी विशेष अभियान पथक (C-60) गडचिरोली व प्राणहिता यांच्या संयुक्त ६ तुकड्या, बीडीडीएस (BDDS) चे १ पथक आणि सीआरपीएफचे पथक शोध मोहिमेसाठी रवाना करण्यात आले होते.



हस्तगत आणि नष्ट करण्यात आलेले माओवादी साहित्य

२७ जून २०२६ रोजी जवानांनी बालबेडा जंगल परिसराला वेढा देऊन बीडीडीएस (बॉम्ब शोधक व नाशक) पथकाच्या साहाय्याने कसून तपासणी केली. या शोधमोहिमेदरम्यान जमिनीत पुरलेले खालील साहित्य हाती लागले:

  • लेथ मशीन: ५ ते ६ टन वजनाची १ नग लेथ मशीन (शस्त्र निर्मितीसाठी वापरली जाणारी).



  • क्लेमोर आणि बिजीएल पाईप्स: १५० नग.

  • १२ बोअर पाईप: २२० नग.



  • रायफल रॉड मेटल पट्टी: २० नग.

हे सर्व साहित्य अत्यंत धोकादायक असल्याने वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनाखाली पथकातील जवानांनी घटनास्थळावरच (जागीच) नष्ट केले. यापूर्वीही २३ आणि २७ मे २०२६ रोजी अशाच प्रकारची यशस्वी कारवाई करण्यात आली होती.

वरिष्ठ अधिकाऱ्यांचे कौतुक

गडचिरोली जिल्ह्यातील माओवाद आता पूर्णपणे संपण्याच्या मार्गावर असून, ही चळवळ जवळजवळ संपुष्टात आली आहे.विशेष अभियान पथक, इंट सेल आणि बीडीडीएसच्या जवानांनी यशस्वीरित्या पार पाडली. या धडक कारवाईबद्दल पोलीस अधीक्षक  एम. रमेश यांनी मोहिमेत सहभागी असलेल्या सर्व जवानांचे विशेष कौतुक केले आहे







WP2Social Auto Publish Powered By : XYZScripts.com
error: Content is protected !!