
वर्ध्यात हॉटेलवर छापा; देहविक्रय करणाऱ्या टोळीचा पर्दाफाश, एका आरोपीला अटक तर पीडित महिलेची सुटका
वर्धा: शहरातील भामटीपुरा चौक परिसरातील एका लॉजवर सुरू असलेल्या अनैतिक देहव्यापाराचा वर्धा पोलिसांच्या विशेष पथकाने पर्दाफाश केला आहे. अनैतिक मानवी वाहतूक प्रतिबंध कक्ष (AHTU) आणि स्थानिक गुन्हे शाखा (LCB) यांच्या संयुक्त पथकाने ८ जुलै रोजी संध्याकाळी ही धडक कारवाई केली. या कारवाईत एका आरोपीला अटक करण्यात आली असून, परराज्यातून आणलेल्या एका पीडित महिलेची सुटका करण्यात आली आहे. पोलिसांनी घटनास्थळावरून १८,२०० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे.
सचिन हरीश जाधव (वय ४५ वर्षे, रा. भामटीपुरा, वर्धा) असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे.

बनावट ग्राहकाच्या (पंटर) मदतीने रचला सापळा मिळालेल्या माहितीनुसार, वर्धा शहर पोलीस स्टेशनच्या हद्दीत असलेल्या ‘पवन लॉज’मध्ये आर्थिक फायद्यासाठी देहव्यापार चालवला जात असल्याची गुप्त माहिती अनैतिक मानवी वाहतूक प्रतिबंध कक्षाला मिळाली होती. या माहितीच्या आधारे पोलिसांनी गुरुवारी (८ जुलै) सायंकाळी सव्वाचार ते सात वाजेच्या दरम्यान या लॉजवर बनावट ग्राहक (पंटर) पाठवून सापळा रचला.
आरोपी सचिन जाधव हा स्वतःच्या आर्थिक फायद्यासाठी परराज्यातील महिलांना पैशांचे आमिष दाखवून वर्ध्यात बोलवायचा आणि त्यांच्याकडून देहव्यापार करून घ्यायचा. बनावट ग्राहकाच्या माध्यमातून खात्री पटताच पोलिसांनी लॉजवर धाड टाकली. यावेळी आरोपी पीडित महिलेकडून देहव्यापार करून घेताना रंगेहात पकडला गेला.

१८,२०० रुपयांचा मुद्देमाल जप्त पोलिसांनी घटनास्थळावरून ७,२०० रुपये रोख, ११,००० रुपये किमतीचे दोन मोबाईल फोन आणि इतर आक्षेपार्ह साहित्य असा एकूण १८,२०० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. पोलिसांच्या पथकाने पीडित महिलेची सुटका केली असून तिची रवानगी सुरक्षित ठिकाणी करण्यात आली आहे.
गुन्हा दाखल या प्रकरणी वर्धा शहर पोलीस ठाण्यात आरोपी सचिन जाधव याच्याविरुद्ध अनैतिक मानवी व्यापार प्रतिबंधक अधिनियम गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस करत आहेत.






