
पाचपावली पोलिसांची कामगिरी एम.डी. पावडर बाळगणाऱ्या आरोपीस अटक.

पाचपावली पोलिसांची मोठी कारवाई: १६.९४ ग्रॅम एम.डी. पावडरसह तरुणाला अटक; १.०१ लाखांचा मुद्देमाल जप्त
नागपूर: पाचपावली पोलीस ठाण्याच्या पथकाने मध्यरात्री केलेल्या गस्तीदरम्यान आशीनगर परिसरातून १६.९४ ग्रॅम एम.डी. पावडर बाळगणाऱ्या एका तरुणाला ताब्यात घेऊन अटक केली आहे. आरोपीकडून रोख रक्कम, एम.डी. पावडर आणि मोबाईल फोन असा एकूण १,०१,०८०/- रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला असून, या प्रकरणातील एका फरार साथीदाराचा शोध सुरू आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, दिनांक २१.११.२०२६ रोजी मध्यरात्री ०१.३५ वा. ते ०२.५५ वा. दरम्यान पाचपावली पोलिसांचे पथक पेट्रोलिंग करीत होते. त्यावेळी पाचपावली पोलीस ठाण्याच्या हद्दीतील आशीनगर येथील सलीम स्पोर्ट्स ग्राउंडमध्ये एक तरुण पोलिसांना पाहून पळून जात असल्याचे निदर्शनास आले. पोलिसांनी तत्काळ पंचासमक्ष सापळा रचून त्याला ताब्यात घेतले.

तपासातील निष्कर्ष व गुन्ह्याची नोंद

चौकशीदरम्यान त्याने आपले नाव साहिल अहमद फहेमउद्दीन मल्लीक (वय २४ वर्षे, रा. नं. ६४६, आशीनगर, पाचपावली, नागपूर) असे सांगितले. त्याच्याकडे अंमली पदार्थ असल्याच्या दाट संशयावरून एनडीपीएस कायद्यातील तरतुदींचे पालन करत पंचासमक्ष त्याची अंगझडती घेण्यात आली. या झडतीत त्याच्या पॅन्टच्या उजव्या खिशात झिपब्लॉक पन्नीमध्ये १६.९४ ग्रॅम एम.डी. पावडर मिळून आली. पोलिसांनी घटनास्थळावरून रोख १,३८०/- रुपये, एम.डी. पावडर व मोबाईल फोन असा एकूण १,०१,०८०/- रुपयांचा मुद्देमाल जप्त केला.
पुढील चौकशीत अटक केलेल्या आरोपीने हे एम.डी. पावडर त्याचा साथीदार पाहिजे आरोपी सोहेल मल्लीक उर्फ मायाभाई (रा. टेका वस्ती, पाचपावली) याने विक्रीसाठी आणून दिल्याची कबुली दिली. स्वतःच्या आर्थिक फायद्यासाठी आरोपी हा अमली पदार्थ विक्री करण्याच्या उद्देशाने बाळगत असल्याचे स्पष्ट झाले आहे.

याप्रकरणी आरोपीविरुद्ध कलम अन्वये पाचपावली पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून, आरोपीला अटक करण्यात आली आहे. फरार साथीदार आरोपीचा शोध व पुढील तपास पोलीस करीत आहेत.
कारवाई करणारे पथक व मार्गदर्शन

ही यशस्वी कारवाई पोलीस आयुक्त विश्वास नांगरे पाटील, सह पोलीस आयुक्त नविनचंद्र रेड्डी, यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस श्रीमती विनीता शाहु (अपर पोलीस आयुक्त, उत्तर विभाग, नागपूर शहर), राहुल मदने (पोलीस उप आयुक्त, परि. क्र. ३) आणि शिवप्रसाद पारवे (सहा. पोलीस आयुक्त, लकडगंज विभाग) यांच्या मार्गदर्शनाखाली वपोनि. जितेंद्र बोबडे, पोनि. गुन्हे, पोउपनि. नरेश पंडीत, पोहवा. दिलीप पवार, प्रकाश पखान, अंकुश राठोड, वासुदेव जयपूरकर, पोअं. आशिष बावनकर व अतुल फरताडे यांनी केली.


