पथ्रोट पोलिसांची मोठी कारवाई: देशी कट्ट्यासह एका युवकाला अटक, दुसरा आरोपी फरार

महाराष्ट्रातील महत्वाच्या क्राईम संबंधी बातम्यांसाठी आम्हाला जॅाईन करा
Instagram Follow

अमरावती: सोशल मीडिया किंवा इतर माध्यमांतून शस्त्रांसह फोटो व व्हिडिओ व्हायरल करून भाईगिरी व दहशत निर्माण करणाऱ्यांवर अमरावती ग्रामीणचे पोलीस अधीक्षक निकेतन कदम यांनी कठोर कारवाई करण्याचे निर्देश दिले आहेत. या पार्श्वभूमीवर, अमरावती ग्रामीणमधील पथ्रोट पोलीस ठाण्याच्या पथकाने मोठी कारवाई करत एका २४ वर्षीय युवकाला देशी कट्ट्यासह ताब्यात घेतले आहे. सदर कारवाई पोलीस अधीक्षक निकेतन कदम, अपर पोलीस अधीक्षक दत्ता तोटेवाड, उपविभागीय पोलीस अधिकारी सतीश कुलकर्णी यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली.

दिनांक ९ जुलै २०२६ रोजी पथ्रोट पोलिसांना त्यांच्या विश्वसनीय बातमीदाराकडून माहिती मिळाली की, कासपूर (ता. अचलपूर, जि. अमरावती) येथील रहिवासी अनिकेत रवींद्र महाजन (वय २४ वर्षे) हा आपल्या घरात बेकायदेशीरपणे देशी कट्टा बाळगून आहे. या माहितीच्या आधारे पोलिसांनी पंचांसह कासपूर येथील अनिकेतच्या घरावर छापा टाकला.



२३ हजारांचा मुद्देमाल जप्त

पोलिसांनी आरोपी अनिकेत महाजन याच्या घराची झडती घेतली असता, त्याच्या घरातून खालील मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे:



  • देशी बनावटीचे पिस्तूल आणि २ मॅगझिन (किंमत अंदाजे २०,००० रुपये)

  • ३ नग जिवंत काडतुसे (राऊंड) (किंमत अंदाजे ३,००० रुपये)



अमरावतीमधील दुसऱ्या आरोपीचे नाव समोर पोलिसांनी अनिकेतला ताब्यात घेऊन चौकशी केली असता, त्याने हा देशी कट्टा विपुल भानुदास ठाकरे (रा. अर्जुन नगर, अमरावती) याच्याकडून विकत घेतल्याची कबुली दिली.

याप्रकरणी पथ्रोट पोलीस ठाण्यात दोन्ही आरोपींविरुद्ध अपराध क्रमांक २२७/२०२६ कलम ३, २५ शस्त्र अधिनियम (Arms Act) आणि सहकलम १३५ मपोका अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मुख्य आरोपी अनिकेत महाजन सध्या पोलीस कोठडीत असून, फरार आरोपी विपुल ठाकरे याचा पोलीस शोध घेत आहेत.



नागरिकांना पोलिसांचे आवाहन पथ्रोट परिसरामध्ये कोणीही चोरून-लपून अवैध धंदे करत असेल, बेकायदेशीर शस्त्र बाळगत असेल किंवा इंस्टाग्राम व इतर सोशल मीडियावर भाईगिरीचे व्हिडिओ प्रसारित करत असेल, तर त्याची माहिती तातडीने पथ्रोट पोलिसांना द्यावी, असे आवाहन ठाणेदार अभय चौथनकर यांनी केले आहे. माहिती देणाऱ्याचे नाव पूर्णपणे गोपनीय ठेवले जाईल, असेही पोलिसांनी स्पष्ट केले आहे.

कारवाई करणारे पोलीस पथक

या मोहिमेत पथ्रोट पोलीस ठाण्याचे ठाणेदार सहाय्यक पोलीस निरीक्षक अभय चौथनकर, पो. उपनिरीक्षक ज्ञानेश्वर सिडाम, सपोउपनी प्यारेलाल जवंजाळ, चालक विजय आसोलकर, उमेश उघडे, योगेश बोदुले, महिला पो. हे. कॉ. अपर्णा लोहाट, रुपेश शिंगणे आणि विवेक ठाकरे यांनी सहभाग घेतला.







WP2Social Auto Publish Powered By : XYZScripts.com
error: Content is protected !!