
अकोला येथील जनता भाजी बाजारात गुप्त माहितीच्या आधारे छापा टाकून अवैध गोवंशीय मांसाची विक्री करणाऱ्या आरोपीला रंगेहात पकडण्यात आले.
अकोला पोलिसांची मोठी कारवाई: ‘ऑपरेशन प्रहार’ अंतर्गत अवैध गोमांस विक्री करणाऱ्या आरोपीवर गुन्हा दाखल; १५,५०० रुपयांचा मुद्देमाल जप्त
अकोला:
अकोला पोलीस दलाच्या ‘ऑपरेशन प्रहार’ अंतर्गत सिटी कोतवाली पोलीस स्टेशनच्या डी.बी. पथकाने अवैध गोवंश मांस विक्री करणाऱ्या एका आरोपीविरुद्ध धडक कारवाई केली आहे. या कारवाईत पोलिसांनी सुमारे १५,५०० रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त केला असून आरोपीविरुद्ध कायदेशीर गुन्हा दाखल केला आहे. सदर यशस्वी कारवाई अकोला जिल्ह्याचे पोलीस अधीक्षकअरीचित चांडक, अपर पोलीस अधीक्षक बी. चंद्रकांत रेड्डी, आणि उपविभागीय पोलीस अधिकारी (शहर विभाग, अकोला) सुदर्शन पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली.

गुप्ताबातमीवरून जनता भाजी बाजारात छापा:
दिनांक १३ जुलै २०२६ रोजी पोलीस स्टेशन सिटी कोतवाली, अकोला येथील डी.बी. पथकाला एका गुप्त बातमीदाराकडून माहिती मिळाली होती. या माहितीच्या आधारे पथकाने अकोला येथील ‘जनता भाजी बाजार’ परिसरात अचानक छापा टाकला. या छाप्यात आरोपी शेख नाजीम शेख सुभान (वय ३८ वर्षे, रा. मस्तान चौकजवळ, अकबर प्लॉट, अकोट फाईल, अकोला) हा गोवंशीय प्राण्यांचे अवैध रित्या कत्तल केलेले मांस विक्रीसाठी स्वतःच्या ताब्यात बाळगून असताना रंगेहात मिळून आला.

१५,५०० रुपयांचा मुद्देमाल जप्त:
पोलिसांनी आरोपीकडून खालील मुद्देमाल जप्त केला आहे:

-
अंदाजे ५० किलो गोवंशीय प्राण्यांचे मांस (प्रति किलो ३०० रुपये दराने एकूण किंमत १५,००० रुपये)
-
मांस कापण्यासाठी वापरल्या जाणाऱ्या ०२ लोखंडी सुऱ्या (किंमत ५०० रुपये)

असा एकूण १५,५०० रुपये किमतीचा मुद्देमाल पोलिसांनी घटनास्थळावरून जप्त केला आहे.
कठोर कलमांखाली गुन्हा दाखल:
याप्रकरणी आरोपी शेख नाजीम शेख सुभान याच्याविरुद्ध भारतीय न्याय संहिता (BNS) कलम ३२५ सहकलम ५, ५ (क), ९, ९ (अ) महाराष्ट्र प्राणी संरक्षण अधिनियम १९७६ (सुधारणा २०१५ अन्वये) गुन्हा नोंद क्रमांक २५६/२०२६ अंतर्गत गुन्हा दाखल करून पुढील कायदेशीर कारवाई सुरू करण्यात आली आहे.
या पोलीस अधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनात झाली कारवाई:
या कारवाईत सिटी कोतवाली पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक संजय गवई, ग्रेड पोउपनि एजाज खान तसेच डी.बी. पथकाचे पोहवा अजय भटकर, पोहवा ख्वाजा शेख, पोकॉ मोहम्मद नदीम आणि पोकॉ अमोल गायकवाड यांनी महत्त्वपूर्ण भूमिका बजावली.




