
खंडाळा: माथाडी अन् स्क्रॅप कंत्राटासाठी कंपनी अधिकाऱ्याला मारहाण; खंडणीखोरांवर गुन्हा, एक ताब्यात
खंडाळा पोलीस ठाण्याच्या हद्दीतील औद्योगिक क्षेत्रात दहशत निर्माण करून बेकायदेशीर माथाडी काम आणि स्क्रॅपचे (भंगार) कॉन्ट्रॅक्ट मिळवण्यासाठी कंपनी प्रशासनाला धमकावून मारहाण करणाऱ्या खंडणीबहाद्दरांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सातारा जिल्ह्यातील खंडाळा तालुक्यातील शिवाजीनगर येथील ‘मेटाफोल्ड इंजिनिअरिंग प्रायव्हेट लिमिटेड’ कंपनीत ही खळबळजनक घटना घडली असून, पोलिसांनी या प्रकरणातील एका आरोपीला तात्काळ ताब्यात घेतले आहे.
नेमकी घटना काय?
शिवाजीनगर येथील मेटाफोल्ड इंजिनिअरिंग कंपनीत सध्या डेव्हलपमेंटचे (विस्तारीकरणाचे) काम सुरू आहे. दि. १३ जुलै २०२६ रोजी दुपारी १२:३१ वाजण्याच्या सुमारास कंपनीचे एच.आर. ॲडमिन (HR Admin) रामदास बबन भोसले (वय ६३ वर्ष) हे कंपनीच्या मेन गेटजवळ पाणी पिण्यासाठी बसले होते. त्याच वेळी एका काळ्या रंगाच्या स्विफ्ट कारमधून (क्रमांक MH 11 DU 1921) चार अनोळखी इसम कंपनीच्या आवारात आले. त्यांनी थेट काम सुरू असलेल्या ठिकाणी जाऊन तिथले क्रेन, डंपर आणि जेसीबीचे काम तात्काळ बंद पाडले. “काम बंद करा, नाहीतर आम्ही इथे तोडफोड करू,” अशी धमकी त्यांनी दिली.

कंत्राटासाठी थेट लाथाबुक्क्या आणि सळईने मारहाण
कंपनीचे अधिकारी रामदास भोसले यांनी काम बंद करण्याचे कारण विचारले असता, आरोपींनी “आम्हाला या कंपनीत लागणारे सर्व बांधकाम, माथाडी कामगार आणि स्क्रॅपचे कॉन्ट्रॅक्ट मिळाले पाहिजे,” अशी मागणी केली. त्यावर भोसले यांनी हा निर्णय कंपनी प्रशासनाचा असून आपल्या अधिकारात येत नसल्याचे सांगितले. यावरून संतप्त झालेल्या आरोपींनी “तू कंपनीचा मालक झाला आहेस का?” असे म्हणत भोसले यांच्या कानाखाली मारली. एवढ्यावरच न थांबता एका आरोपीने तेथेच पडलेली लोखंडी सळई उचलून भोसले यांच्या पाठीत मारली, तसेच दगड फेकून मारला. सुदैवाने भोसले यांनी तो दगड चुकवला. या राड्यानंतर चारही आरोपी तिथून पसार झाले.
नवीन कायद्यान्वये गुन्हा दाखल; एकाला बेड्या
याप्रकरणी कंपनीचे अधिकारी रामदास भोसले यांनी दिलेल्या तक्रारीवरून खंडाळा पोलीस ठाण्यात गुन्हा रजिस्टर नंबर १२५/२०२६ नुसार भारतीय न्याय संहिता (BNS) कलम ३०८(५), ११८(१), ११५(२), ३५२, ३५१(३), आणि ३(५) अन्वये खंडणी, मारहाण व दमदाटीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी तपासाची चक्रे फिरवत या गुन्ह्यातील एका आरोपीला तात्काळ ताब्यात घेतले असून, उर्वरित तीन फरार आरोपींचा शोध युद्धपातळीवर सुरू आहे. या गुन्ह्याचा पुढील तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक (API) श्री. संतोष मस्के करत आहेत.
पोलीस प्रशासनाचे आवाहन आणि उद्योजकांमध्ये समाधान
खंडाळा औद्योगिक वसाहतीमध्ये (MIDC) अशा प्रकारे गुंडगिरी करणाऱ्यांवर पोलिसांनी कडक पाऊल उचलल्यामुळे स्थानिक कंपनी मालक आणि उद्योजकांमध्ये समाधानाचे वातावरण आहे.

“खंडाळा पोलीस स्टेशन हद्दीत अशा प्रकारे कंपन्यांना बेकायदेशीर रित्या, माथाडी किंवा कंत्राटाच्या नावाखाली कोणी त्रास देत असेल किंवा धमकावत असेल, तर कंपनी प्रशासनाने न घाबरता थेट पोलिसांशी संपर्क साधावा. अशा खंडणीखोरांवर कठोर कारवाई केली जाईल.” श्री. धन्यकुमार गोडसे (उपविभागीय पोलीस अधिकारी, फलटण) व पोलीस निरीक्षक महेंद्र जगताप (खंडाळा पोलीस स्टेशन)





