
वर्धा पोलीस मुख्यालयात ‘पोलिस स्मृति दिन’ संपन्न; १५४ हुतात्म्यांना आदरांजली

वर्धा:-
आज दिनांक २१ ऑक्टोबर २०२६ रोजी वर्धा येथील पोलीस मुख्यालय परिसरात ‘पोलिस स्मृति दिन’ अत्यंत सन्मानपूर्वक आणि वातावरणात पाळण्यात आला. या कार्यक्रमाचे मुख्य अतिथी म्हणून पुलगाव येथील कॅम्पाचे ब्रिगेडियर प्रशांत कुमार सि.ए.डि हे उपस्थित होते.


कार्यक्रम आणि मानवंदना:
-
कार्यक्रमाची सुरुवात सकाळी ८:३० वाजता बँड पथकाच्या धून वाजवून करण्यात आली.

-
त्यानंतर वर्धा जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक सौरभ कुमार अग्रवाल यांनी पोलीस स्मृति दिवसाची पार्श्वभूमी आणि त्याचे महत्त्व उपस्थितांना समजावून सांगितले.

-
सन २०२५ या वर्षभरात देशभरात आपले कर्तव्य बजावताना शहीद झालेल्या विविध राज्यांतील एकूण १५४ पोलीस अधिकारी व जवानांना याप्रसंगी मानवंदना देण्यात आली. तसेच कर्तव्य बजावताना प्राण अर्पण केलेल्या या सर्व शहीद जवानांच्या नावांचे वाचन करण्यात आले.
हुतात्म्यांना अंतिम सलामी:
मुख्य अतिथी ब्रिगेडियर प्रशांत कुमार आणि पोलीस अधीक्षक सौरभ कुमार अग्रवाल यांच्या हस्ते स्मारक स्थळावर पुष्पचक्र अर्पण करून हुतात्मा जवानांना भावपूर्ण आदरांजली वाहण्यात आली. याशिवाय मानवंदना, शस्त्र सलामी, तीन राऊंड फायरची कारवाई, दहा सेकंदांचे मौन आणि बिगुल वादन करून हुतात्म्यांना अंतिम सलामी देण्यात आली.

शहीद जवानांच्या परिवाराचा सन्मान:
या कार्यक्रमात गडचिरोली येथे कार्यरत असताना शहीद झालेले पोलीस अंमलदार दिलीप इवनाथे आणि वर्धा जिल्ह्यातील पोलीस अंमलदार गौरव खरवडे यांच्या कुटुंबीयांचा विशेष सत्कार करण्यात आला.
-
शहीद दिलीप इवनाथे यांच्या पत्नी श्रीमती अनिता दिलीप इवनाथे

शहीद गौरव खरवडे यांच्या आई श्रीमती नंदाबाई नथूजी खरवडे
यांना महाराष्ट्र पोलीस महासंचालक कार्यालयातून प्राप्त झालेले प्रमाणपत्र, शाल आणि रोपटे देऊन सन्मानित करण्यात आले.
उपस्थिती:
या महत्त्वाच्या कार्यक्रमास अपर पोलीस अधीक्षक सदाशिव वाघमारे, जिल्ह्यातील विविध उपविभागांचे व शाखेचे वरिष्ठ पोलीस अधिकारी, तसेच होमगार्ड आणि राज्य राखीव पोलीस दलाचे पोलीस अंमलदार मोठ्या संख्येने उपस्थित होते.




