
११ वर्षांपासून फरार नक्षल समर्थकाला गडचिरोली पोलिसांकडून अटक
गडचिरोली पोलिसांची मोठी कारवाई: ११ वर्षांपासून फरार असलेला नक्षल समर्थक अखेर जेरबंद
गडचिरोली: गडचिरोली जिल्ह्यातील माओवाद आता जवळजवळ संपुष्टात आला असून, गडचिरोली पोलीस दलाने माओवादविरोधी अभियानांतर्गत एक मोठे यश संपादन केले आहे. खून, खुनाचा प्रयत्न आणि शासकीय सेवकावर हल्ला यांसारख्या गंभीर गुन्ह्यांमध्ये गेल्या ११ वर्षांपासून फरार असलेल्या एका नक्षल समर्थक आरोपीला पोलिसांनी अत्यंत शिताफीने ताब्यात घेतले आहे. बापू व्यंकटी जनगम (रा. नडीकुडा) असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे.ही कारवाई १७ जून २०२६ रोजी पोलीस अधीक्षक श्री. एम. रमेश यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली.
कौटुंबिक भेटीसाठी गावात आला अन् पोलिसांच्या जाळ्यात अडकला

पोलीस अभिलेखावरील माहितीनुसार, आरोपी बापू जनगम हा ग्राम रक्षक दलाच्या (जी.आर.डी.) यादीत समाविष्ट असून, माओवाद्यांना मदत करणाऱ्या ‘जनमिलिशिया’ संघटनेशी तो संबंधित होता. दीर्घकाळापासून तो पोलिसांना चकवा देत फरार होता. दिनांक १७ जून रोजी पोलीस स्टेशन असरल्लीच्या पथकाला गोपनीय माहिती मिळाली की, आरोपी बापू जनगम हा आपल्या कुटुंबाला भेटण्यासाठी नडीकुडा गावात आला आहे. माहिती मिळताच पोलिसांनी तात्काळ नियोजनबद्ध आखणी करून नडीकुडा गावाला वेढा घातला आणि शोधमोहीम राबवली. दरम्यान, गावातील शेतशिवार परिसरात संशयास्पद रित्या वावरत असताना पोलिसांनी त्याला अत्यंत शिताफीने ताब्यात घेतले.
आरोपीवरील दाखल गंभीर गुन्हे

अटक करण्यात आलेल्या आरोपीविरुद्ध असरअल्ली पोलीस ठाण्यात अनेक गंभीर गुन्हे दाखल आहेत. यामध्ये प्रामुख्याने खालील गुन्ह्यांचा समावेश आहे:
-
खून (कलम ३०२ भादंवि): वर्ष २०१५ मधील खुनाच्या गुन्ह्यापासून (अप क्र. ०६/२०१५) आरोपी गेल्या ११ वर्षांपासून पोलिसांना गुंगारा देत होता. या गुन्ह्यातील सह-आरोपीला गडचिरोली सत्र न्यायालयाने आधीच जन्मठेपेची शिक्षा सुनावलेली आहे.

-
खुनाचा प्रयत्न (कलम ३०७ भादंवि): पोलीस आणि शासकीय यंत्रणेवर हल्ले करणे.
-
शासकीय सेवकांवर हल्ला व दुखापत करणे: (कलम ३५३, ३३२, ३३७, ३३८ भादंवि).

-
सदोष मनुष्यवध: (कलम ३०४ भादंवि).
तांत्रिक विश्लेषण, गुप्त माहिती आणि स्थानिक स्तरावरील खबऱ्यांच्या मदतीने पोलीस त्याच्या हालचालींवर बारीक लक्ष ठेवून होते, ज्यामुळे अखेर त्याला अटक करण्यात यश आले.
न्यायालयाने सुनावली कोठडी
अटक केलेल्या आरोपीला पोलिसांनी सन्माननीय न्यायालयासमोर हजर केले असता, न्यायालयाच्या आदेशानुसार त्याची न्यायालयीन कोठडीत रवानगी करण्यात आली आहे.
तपास पथक
सदर यशस्वी कारवाई पोलीस अधीक्षक श्री. एम. रमेश, अपर पोलीस अधीक्षक (अभियान) श्री. कार्तिक मधीरा, अपर पोलीस अधीक्षक (प्रशासन) श्री. गोकुल राज जी., अपर पोलीस अधीक्षक (अहेरी) श्री. हर्षवर्धन बी. जे., पोलीस उप-अधीक्षक (अभियान) श्री. विशाल नागरगोजे आणि सिरोंचाचे उपविभागीय पोलीस अधिकारी श्री. संदेश नाईक यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडली. यामध्ये पोस्टे असरअल्लीचे प्रभारी अधिकारी सपोनि. योगिराज जाधव, पोउपनि. प्रसाद पवार आणि पोलीस अंमलदारांच्या पथकाने थेट सहभाग घेतला.




