
नवीन कामठी पोलिसांची धडक कारवाई: घरफोडी व वाहनचोरीच्या गुन्ह्यांतील आरोपींना अटक
कामठी (नागपूर): नवीन कामठी पोलीस ठाण्याच्या हद्दीतील घरफोडी आणि वाहनचोरीच्या गुन्ह्याचा छडा लावण्यात पोलिसांच्या पथकाला यश आले आहे. या प्रकरणी पोलिसांनी दोन आरोपींना अटक केली असून, त्यांच्याकडून सोन्या-चांदीचे दागिने जप्त केले आहेत.
घरफोडीची घटना व गुन्हा नोंद: कामठी येथील ऑटो चौकाजवळील कुंभारे कॉलनी येथे राहणारे तक्रारदार आकाश अशोक जगजीत (वय ३४) हे १८ ऑगस्ट २०२६ रोजी संध्याकाळी ६:०० वाजता घराला कुलूप लावून कुटुंबासह तिरोडा (जि. गोंदिया) येथे नातेवाईकांकडे गेले होते. १९ ऑगस्ट २०२६ रोजी सकाळी १०:०० वाजेच्या दरम्यान अज्ञाताने त्यांच्या बंद घराचे कुलूप तोडून बेडरूममधील लोखंडी कपाटातून ३३,००० रुपये रोख आणि ३,४७,६५५ रुपये किमतीचे सोन्या-चांदीचे दागिने, असा एकूण ३,८०,६५५ रुपयांचा ऐवज चोरून नेला.

याप्रकरणी नवीन कामठी पोलीस ठाण्यात अज्ञात आरोपींविरुद्ध भारतीय न्याय संहिता (BNS) कलम ३०५(अ), ३३१(३) व ३३१(४) अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला होता.
तपासाची चक्रे आणि आरोपींची अटक: तपासादरम्यान मिळालेल्या गोपनीय माहिती व तांत्रिक विश्लेषणाच्या आधारे पोलिसांनी आरोपी बिलासपूर (छत्तीसगड) येथे असल्याचे निष्पन्न केले. पोलिसांनी बिलासपूर गाठून आशिष मनोहर मेश्राम (वय ३२, रा. कुंभारे कॉलनी, कामठी, ह.मु. बिलासपूर) याला ताब्यात घेतले. चौकशीदरम्यान त्याने त्याचा साथीदार बादल रवि नगरारे (वय २८, रा. कुंभारे कॉलनी, कामठी) याच्यासह संगनमत करून ही घरफोडी केल्याची कबुली दिली.

मुद्देमाल जप्ती व पुढील तपास:
-
आरोपी आशिष मेश्राम याच्याकडून ५७,७५६ रुपये किमतीचे सोन्या-चांदीचे दागिने जप्त करण्यात आले आहेत.

-
अधिक चौकशीत आरोपीने तिरोडा पोलीस ठाण्याच्या (जि. गोंदिया) हद्दीत एक वाहनचोरी केल्याचेही मान्य केले.
या धडक कारवाईमुळे पोलिसांनी एक घरफोडी आणि एक वाहनचोरी असे २ गुन्हे उघडकीस आणले असून दोन्ही आरोपींना अटक केली आहे.

तपास पथक:
ही कारवाई पोलीस उप आयुक्त (परि. क्र. ६) रमेश धुमाळ, सहाय्यक पोलीस आयुक्त (कामठी विभाग) अंकुश खेडकर, आणि वरिष्ठ पोलीस निरीक्षक महेश आंधळे यांच्या मार्गदर्शनाखाली पोउपनि. योगेश नालटे, अक्षय झगडे, सफौ. किशोर महंत, पोअं. विवेक गोरसेटवार, सुरज ठाकूर, आशिष बागडे व तुषार मोरे यांनी पार पाडली.




