
पुणे: डी.जे.चा दणदणाट भोवला; पोलीस आयुक्तांच्या आदेशाचे उल्लंघन केल्याने मंडळाचे पदाधिकारी व डी.जे. मालकाला कोर्टाकडून शिक्षा!
पुणे:
पुणे शहरातील खडक पोलीस स्टेशनच्या हद्दीत पोलीस आयुक्तांचे आदेश आणि ध्वनीप्रदूषणाचे नियम धाब्यावर बसवून उच्च आवाजात डी.जे. (DJ) साऊंड सिस्टीम वाजवणाऱ्या एका मंडळाचे अध्यक्ष, उपाध्यक्ष आणि डी.जे. चालकाला न्यायालयाने दोषी ठरवत शिक्षा सुनावली आहे. खडक पोलिसांनी दाखवलेल्या या तत्परतेमुळे विनापरवाना व आवाजाची मर्यादा ओलांडणाऱ्या डी.जे. चालकांचे चांगलेच धाबे दणाणले आहेत.

काय आहे संपूर्ण घटना?
दिनांक २६ ऑगस्ट २०२६ रोजी खडक पोलीस स्टेशनच्या हद्दीतील लोहियानगर कमानीजवळ ‘अल मदिना यंग बॉईज’ या मंडळाने आयोजित मिरवणुकीदरम्यान सार्वजनिक रस्त्यावर नागरिकांना त्रास होईल अशा प्रकारे गर्दी जमवली होती. सर्वोच्च न्यायालय आणि राज्य शासनाने घालून दिलेल्या डेसिबल मर्यादेपेक्षा अत्यंत जास्त आवाजात डी.जे. साऊंड सिस्टीम वाजवून परिसरात मोठा उपद्रव निर्माण केला गेला होता.

कारवाई झालेल्या आरोपींची नावे:
१. वाहिद कासम मणियार (अध्यक्ष – अल मदिना यंग बॉईज, रा. लोहियानगर, पुणे)

२. जायेद मजीद शेख (उपाध्यक्ष – अल मदिना यंग बॉईज, रा. लोहियानगर, पुणे)
३. प्रकाश कृष्णात अस्वले (डी.जे. साऊंड सिस्टीम मालक/चालक, रा. सार्वेडे बुद्रुक, ता. कागल, जि. कोल्हापूर)

पोलीस इशारा देऊनही दुर्लक्ष:
मिरवणुकीदरम्यान खडक पोलीस स्टेशनच्या अधिकाऱ्यांनी आरोपींना पुणे पोलीस आयुक्तांच्या आदेशाची लेखी माहिती देऊन भारतीय नागरिक सुरक्षा संहिता (BNSS) नुसार नोटीस बजावली होती. तसेच साऊंड सिस्टीमचा आवाज कमी करण्याबाबत वारंवार सूचना दिल्या होत्या. मात्र, पोलिसांनी दिलेल्या इशाऱ्यांकडे पूर्णपणे दुर्लक्ष करत आरोपींनी जोरात गाणी वाजवून परिसरात गोंगाट चालूच ठेवला.
२४ तासांत दोषारोपपत्र व कोर्टाचा निकाल:
नियम मोडल्याचे स्पष्ट दिसताच खडक पोलिसांनी सरकारतर्फे स्वतः फिर्यादी होऊन तिघांविरुद्ध भारतीय न्याय संहिता अन्वये गुन्हा नोंदवला. पोलिसांनी अत्यंत वेगाने तपास करत अवघ्या २४ तासांच्या आत प्रथमवर्ग न्यायदंडाधिकारी (कोर्ट नं. ६, शिवाजीनगर, पुणे) यांच्या न्यायालयात दोषारोपपत्र (Chargesheet) दाखल केले.
सादर पुरावे आणि पोलिसांची मजबूत बाजू पाहून न्यायालयाने ३ सप्टेंबर २०२६ रोजी अल मदिना यंग बॉईजचे अध्यक्ष वाहिद मणियार, उपाध्यक्ष जायेद शेख आणि डी.जे. मालक प्रकाश अस्वले या तिघांनाही दोषी ठरवत शिक्षा सुनावली आहे.
पोलीस पथक:
ही धडक कारवाई पुणे शहर पोलीस आयुक्त अमितेश कुमार, पोलीस सह आयुक्त संजय दराडे, अपर पोलीस आयुक्त राजेश बनसोडे, पोलीस उप-आयुक्त कृषिकेश रावले आणि सहाय्यक पोलीस आयुक्त सचिन हिरे यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक धनंजय पिंगळे, पोलीस निरीक्षक शर्मिला सुतार, समाधान पवार, सपोनि अमोल वळसंग, पोउपनि स्वप्नील बनकर, पोलीस हवालदार राजाराम गाढवे, पोलीस अंमलदार भूषण चव्हाण व कल्याण घोरपडे यांच्या पथकाने केली.




