उमरेड पोलिसांची कारवाई; ४१० किलो प्रतिबंधित तंबाखूसह ११.४३ लाखांचा मुद्देमाल जप्त

महाराष्ट्रातील महत्वाच्या क्राईम संबंधी बातम्यांसाठी आम्हाला जॅाईन करा
Instagram Follow

४१०.८ किलो प्रतिबंधित सुगंधित तंबाखूसह वाहन जप्त; ११.४३ लाखांचा मुद्देमाल हस्तगत, आरोपी अटक

नागपूर जिल्ह्यातील उमरेड पोलिसांनी प्रतिबंधित सुगंधित तंबाखूविरोधात मोठी कारवाई करत ११ लाख ४३ हजार ५० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला असून एका आरोपीला अटक केली आहे.



पोलीस स्टेशन उमरेड यांना १७ जून २०२६ रोजी गोपनीय माहिती मिळाली होती की, ठोंबरा गावातील शेत परिसरात उभ्या असलेल्या एका वाहनात महाराष्ट्रात प्रतिबंधित असलेला सुगंधित तंबाखू साठवून ठेवण्यात आला आहे. या माहितीच्या आधारे पोलिसांनी तत्काळ घटनास्थळी धाव घेत पंचांसमक्ष तपासणी केली.

तपासणीदरम्यान महिंद्रा टीयूव्ही (क्र. एमएच-४७-क्यू-००९४) या वाहनामध्ये मोठ्या प्रमाणात प्रतिबंधित सुगंधित तंबाखू आढळून आला. यावेळी वाहनाचा चालक व मालक श्रीकांत रमेश झाडे (वय २४, रा. कावरा पेठ, उमरेड, जि. नागपूर) हा घटनास्थळी उपस्थित होता.



कारवाईदरम्यान पोलिसांनी ४१०.८ किलो प्रतिबंधित सुगंधित तंबाखू साठा, ज्याची किंमत २ लाख ४३ हजार ५० रुपये आहे, तसेच ९ लाख रुपये किमतीचे महिंद्रा टीयूव्ही वाहन जप्त केले. अशा प्रकारे एकूण ११ लाख ४३ हजार ५० रुपयांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला.

प्राथमिक तपासात आरोपी हा महाराष्ट्र शासनाने उत्पादन, विक्री, साठवणूक आणि वाहतुकीवर बंदी घातलेल्या सुगंधित तंबाखूची विक्री करण्याच्या उद्देशाने साठा करून वाहतूक करण्याच्या तयारीत असल्याचे निष्पन्न झाले आहे. हा तंबाखू मानवी आरोग्यास अपायकारक असल्याने त्यावर राज्यात बंदी आहे.



या प्रकरणी उमरेड पोलीस ठाण्यात भारतीय न्याय संहिता (BNS) २०२३ मधील कलम १२३, २२३, २७४, २७५ तसेच अन्न सुरक्षा व मानके अधिनियमांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला असून आरोपीला अटक करण्यात आली आहे. पुढील तपास उमरेड पोलीस करीत आहेत.









WP2Social Auto Publish Powered By : XYZScripts.com
error: Content is protected !!