
हँडलर्स जेरबंद: २.८७ कोटींची शेअर ट्रेडिंग फसवणूक उघड

-
नागपूरमधील एका नागरिकाला इन्स्टाग्राम जाहिरात व टेलिग्राम ग्रुपद्वारे बनावट ‘FTMO’ शेअर ट्रेडिंग प्लॅटफॉर्मवर भरघोस नफ्याचे आमिष दाखवून ३३ वेगवेगळ्या व्यवहारांद्वारे तब्बल ₹२,८७,२९,०००/- ची मोठी फसवणूक केली गेली होती.
-
पोलिसांची धडक कारवाई:

-
तांत्रिक तपासाच्या आधारे पोलिसांनी १५ ऑक्टोबर २०२६ रोजी बीड (पाटोदा) येथील काकासाहेब मोहन दरुंडे याला अटक केली. तो बनावट कंपन्यांची कॉर्पोरेट बँक खाती हाताळून ती सायबर गुन्हेगारांना पुरवण्याचे मोठे जाळे चालवत होता.

-
यानंतर मुंबईतील बोरीवली परिसरात सलग ६ दिवस सापळा रचून पोलिसांनी ३० ऑक्टोबर २०२६ रोजी भूपेंद्र महावीर जैन (वय ३२) आणि योगेश पारसमला जैन (वय ३७) या दोन मुख्य आरोपींना “झोमॅटो पार्सल आले आहे” असे सांगून अत्यंत क्लृप्तीने घराबाहेर बोलावले आणि जेरबंद केले.

-
-
अडकवणारे पुरावे व जप्त मुद्देमाल: ज्या आरबीएल (RBL) कॉर्पोरेट खात्यातून फसवणुकीची रक्कम अवघ्या २४ सेकंदांत ३९ व्यवहारांतून ३८ खात्यांत पसार केली गेली, त्याच खात्याचे इंटरनेट बँकिंग हाताळले गेलेले मोबाईल सिमकार्ड व हँडसेट आरोपींकडे सापडला. तसेच ₹१० लाख किमतीचे सायबर फसवणुकीचे साहित्य (२६ बँकांच्या चेकबुक किट, ११ मोबाईल, ११ डेबिट कार्ड, ३ डीएससी टोकन्स, २ लॅपटॉप, आधार-पॅन कार्डे आणि कंपन्यांचे रबरी शिक्के) जप्त करण्यात आले.
-
आंतरराष्ट्रीय कनेक्शन: या गुन्हेगारांचे थेट हाँगकाँग आणि दुबई येथील सायबर फसवणूक नेटवर्कशी संबंध असल्याचे निष्पन्न झाले आहे. या प्रकरणात फिर्यादीस ५० लाख रुपये परत मिळवून देण्याची कायदेशीर प्रक्रिया न्यायालयात प्रलंबित आहे.

२. AI व्हॉईस क्लोनिंगचा वापर करून ५० लाखांची फसवणूक; इंदूरमधून एक जण अटकेत
-
थोडक्यात वृत्त: फिर्यादी श्री. निखिल निर्मलकुमार नखत यांच्या वडिलांना व्हॉट्सॲपवर समाजातील एका प्रतिष्ठित व्यक्तीचा फोटो ठेवून आणि AI व्हॉईस क्लोनिंग (आवाज हुबेहुब नक्कल करण्याचे तंत्रज्ञान) द्वारे ते अडचणीत असल्याचे भासवून ₹५०,००,०००/- ची रोकड उकळण्यात आली.
-
पोलिसांची कारवाई: सीसीटीव्ही फुटेज आणि मोबाईल लोकेशनच्या तांत्रिक विश्लेषणावरून इंदूर (मध्य प्रदेश) येथील नेतराम श्रीराम चडार (वय २९) या आरोपीला २८ ऑक्टोबर २०२६ रोजी अटक करण्यात आली.

-
जप्त मुद्देमाल: आरोपीकडून गुन्ह्यात वापरलेले अंदाजे ₹५६,०००/- किमतीचे २ मोबाईल जप्त करण्यात आले आहेत.
३. NIA अधिकारी बनून ‘डिजिटल अरेस्ट’द्वारे १ कोटींहून अधिकची वसुली; मुंबईतून दोघांना बेड्या
-
थोडक्यात वृत्त: नागपूरमधील दिनदयाळ नगर येथे राहणारे फिर्यादी प्रबिरकुमार तालुकदार यांना २४ मार्च ते २४ एप्रिल २०२६ दरम्यान अनोळखी क्रमांकावरून फोन करून, प्रदीप जयस्वाल व विश्वास नागरे पाटील अशी नावे सांगत एनआयए (NIA) अधिकारी असल्याचा बनाव रचण्यात आला. मनीलाँड्रिंग व दहशतवाद्यांसोबत संबंध असल्याचे भीतीदायक कारण सांगत व्हॉट्सॲप व्हिडिओ कॉलद्वारे त्यांना ‘डिजिटल अरेस्ट’ करून ₹१,०४,००,०००/- वेगवेगळ्या बँक खात्यांवर आरटीजीएस (RTGS) करायला भाग पाडले.
-
पोलिसांची कारवाई: तांत्रिक तपासाच्या आधारे मुंबईतून दिनेश अंबाभाई रावरीया (वय ३२, सांताक्रूझ वेस्ट) आणि अरविंद कानजी गाला (वय ४५, ताडदेव रोड) या दोघांना ३१ ऑक्टोबर २०२६ रोजी अटक करण्यात आली.
-
मुद्देमाल व परतावा: त्यांच्याकडून ५८,००० रुपयांचे २ मोबाईल जप्त करण्यात आले असून, या प्रकरणात तत्परता दाखवत फिर्यादीस ₹८,५०,०००/- इतकी रक्कम परत मिळवून देण्यात आली आहे.
४. बनावट लेटरहेडद्वारे युनियन बँकेची ९.५० लाखांची फसवणूक; कानपूरचा आरोपी अटकेत
-
थोडक्यात वृत्त: जरीपटका येथील युनियन बँकेचे व्यवस्थापक श्री. यतिंद्र शचींद्र त्रिपाठी यांना २ सप्टेंबर २०२६ रोजी अनमोल यादव नावाच्या व्यक्तीने फोन करून आपण ‘उन्नती मोटर्स’चा कर्मचारी असल्याचे खोटे सांगितले. तसेच उन्नती मोटर्सचे बनावट लेटरहेड व्हॉट्सॲपवर पाठवून त्यांच्याकडून ₹९,५०,०००/- आरटीजीएस द्वारे ट्रान्सफर करून घेत फसवणूक केली.
-
पोलिसांची कारवाई: सीसीटीव्ही फुटेज व तांत्रिक तपासाच्या जोरावर कानपूर (उत्तर प्रदेश) येथील दुर्गाकुमार भगत बहादुर (वय ३६) यास २९ ऑक्टोबर २०२६ रोजी अटक करण्यात आली.
-
परतावा: न्यायालयाच्या माध्यमातून या प्रकरणात फिर्यादीस ₹९,००,०००/- ची रक्कम यशस्वीपणे परत करण्यात आली आहे.
कारवाई करणारे मार्गदर्शन व पथक:
वरील सर्व चारही गुन्ह्यांचा यशस्वी व यशस्वी तपास नागपूर शहरचे पोलीस आयुक्त विश्वास नांगरे पाटील, सहपोलीस आयुक्त नविनचंद्र रेड्डी, अपर पोलीस आयुक्त (गुन्हे) राजेन्द्र दाभाडे, पोलीस उपायुक्त (सायबर) श्रीमती महक स्वामी व सहायक पोलीस आयुक्त शिवप्रसाद पारवे यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक सतीश आडे, सुधीर बोरकुटे आणि सायबर पोलीस ठाण्याच्या इतर अधिकारी व अंमलदारांच्या पथकाने पार पाडला आहे.



