परभणीत देशी दारू दुकानात दरोडा टाकणारे दोन आरोपी अहिल्यानगरमध्ये जेरबंद; १ लाख ८० हजारांचा मुद्देमाल जप्त!

महाराष्ट्रातील महत्वाच्या क्राईम संबंधी बातम्यांसाठी आम्हाला जॅाईन करा
Instagram Follow


परभणीत ९ तासांत उघडकीस आली जबरी चोरी! देशी दारू दुकानात चाकूचा धाक दाखवून १ लाख १८ हजारांची लूट करणाऱ्या दोन आरोपींना अहिल्यानगरमधून जेरबंद

  • स्थानिक गुन्हे शाखेची धडाकेबाज कामगिरी; १ लाख ८० हजार रुपयांचा मुद्देमाल हस्तगत

परभणी :-



परभणी शहरातील रेल्वे स्टेशन परिसरातील एका देशी दारूच्या दुकानात चाकूचा धाक दाखवून १ लाख १८ हजार ५०० रुपयांची रोकड लांबवणाऱ्या दोघा अट्टल गुन्हेगारांना परभणी स्थानिक गुन्हे शाखेने (LCB) अवघ्या ०८ तासांच्या आत गजाआड केले आहे. पोलिसांनी आरोपींच्या म्होरक्यांसह पुण्यात पळून जाण्याच्या तयारीत असलेल्या दोघांना अहिल्यानगर (अहमदनगर) बायपासवरून शिताफीने ताब्यात घेतले असून त्यांच्याकडून गुन्ह्यातील १ लाख रुपयांची रोकड आणि ८० हजार रुपयांची मोटारसायकल असा एकूण १ लाख ८० हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.



काय आहे नेमकी घटना?

दिनांक १३ नोव्हेंबर २०२६ रोजी रात्री ७ वाजण्याच्या सुमारास रेल्वे स्टेशन समोरील निशांत जैस्वाल यांच्या मालकीच्या देशी दारूच्या दुकानात दोन अज्ञात इसम अचानक घुसले. त्यांनी दुकानाच्या मॅनेजरला जीवे मारण्याची धमकी देत चाकूचा धाक दाखवून जबर मारहाण केली. त्यानंतर दुकानाच्या काऊंटरवर ठेवलेले १,१८,५००/- रुपये बळरीने चोरून पळ काढला होता.



या प्रकरणी निशांत जैस्वाल यांच्या तक्रारीवरून नवा मोंढा पोलीस ठाण्यात भारतीय न्याय संहितेच्या (BNS) कलम ३०९(४), ३०९(६), ३११ आणि ३(५) नुसार जबरी चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला होता. गुन्ह्याचे गांभीर्य पाहता पोलीस अधीक्षक पंकज कुमावत यांनी तातडीने तपासाचे आदेश दिले होते.

गोपनीय बातमीदाराकडून सुगावा आणि अवघ्या ०८ तासांत पाठलाग

गुन्ह्याचा तपास सुरू असताना स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाला गोपनीय बातमीदाराकडून माहिती मिळाली की, सदर जबरी चोरी करणारे आरोपी (१) शेख शोएब उर्फ रईस (रा. दर्गा रोड, परभणी) आणि (२) बालाजी उर्फ मुगडाळ बाळ्या नामदेव साळवे (रा. अण्णाभाऊ साठे नगर, परभणी) हे आहेत. तसेच हे दोन्ही आरोपी गुन्हा करून पुण्याकडे पळून जात असल्याची पक्की माहिती पोलिसांना मिळाली.



माहिती मिळताच स्थानिक गुन्हे शाखेचे पथक तातडीने आरोपींच्या मागे रवाना झाले. १४ नोव्हेंबर २०२६ रोजी अहिल्यानगर बायपास रोडवर वर्णनानुसार दोन इसम संशयास्पद हालचालीत दिसून आल्यानंतर पोलिसांनी त्यांना तात्काळ ताब्यात घेतले.



पोलिसांची कसून चौकशी आणि जप्ती

ताब्यात घेतल्यानंतर पोलिसांनी त्यांना खाकीचा हिसका दाखवत पोलिसी खाक्या दाखवताच त्यांनी गुन्ह्याची कबुली दिली. चोरी केलेल्या रकमेपैकी १ लाख रुपये त्यांच्याकडे मिळून आले, तर उर्वरित रक्कम त्यांनी खाण्यापिण्यात आणि प्रवासाच्या तिकिटामध्ये खर्च केल्याचे सांगितले. तसेच, गुन्ह्यात वापरलेली बजाज पल्सर मोटारसायकल आरोपीच्या भावाने पोलीस अधीक्षक कार्यालयात आणून हजर केली. पोलिसांनी दोन पंचांसमक्ष खालीलप्रमाणे मुद्देमाल जप्त केला:

  1. नगदी रक्कम: १,००,०००/- रुपये

  2. वाहन: एक जुनी वापरती बजाज कंपनीची लाल-काळ्या रंगाची पल्सर मोटारसायकल (क्र. एमएच २२ बीडी ४३४२) – किंमत ८०,०००/- रुपये

  • एकूण जप्त मुद्देमाल: १,८०,०००/- रुपये

पोलिसांचे पथक

सदरची यशस्वी कारवाई परभणीचे पोलीस अधीक्षक  पंकज कुमावत, अपर पोलीस अधीक्षक  तानाजी चिखले यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक गजेंद्र सरोदे, पोलीस उपनिरीक्षक चंदनसिंह परिहार, श्रेणी पोलीस उपनिरीक्षक मधुकर चटे, पोलीस अंमलदार सुग्रीव केंद्रे, निलेश भुजबळ, रंगनाथ दुधाटे, गजानन क्षीरसागर, हनुमान ढगे तसेच कोतवाली पोलीस ठाणे (अहिल्यानगर) येथील पोलीस अंमलदार शिरीष तरडे यांच्या पथकाने पार पाडली. गुन्ह्याचा पुढील तपास नवा मोंढा पोलीस करीत आहेत.





WP2Social Auto Publish Powered By : XYZScripts.com
error: Content is protected !!