
अकोला: एकसारख्या नंबरच्या दोन मोटारसायकल जप्त; स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई, आरोपी ताब्यात

एकच नंबर असलेल्या दोन मोटारसायकल स्थानिक गुन्हे शाखेने केल्या हस्तगत; आरोपी ताब्यात, स्थानिक गुन्हे शाखा, अकोला यांची कारवाई
अकोला (प्रतिनिधी): अकोला शहरातील पोस्ट ऑफिस परिसरातून चोरीस गेलेल्या मोटारसायकलचा छडा लावण्यात स्थानिक गुन्हे शाखेला (LCB) मोठे यश आले आहे. या कारवाईत पोलिसांनी एका संशयित आरोपीला अटक केली असून, त्याच्याकडून चोरीची गाडी आणि त्याच क्रमांकाची दुसरी अशा एकूण दोन मोटारसायकल्स जप्त केल्या आहेत.

नेमकी घटना काय?

अकोला येथील सुधीर कॉलनीचे रहिवासी संजय देविदास ठोंबरे (वय ५६ वर्षे) हे दि. १३ नोव्हेंबर २०२६ रोजी शासकीय कामानिमित्त अकोट येथे गेले होते. त्यापूर्वी त्यांनी आपली हिरव्या पट्ट्यांची काळ्या रंगाची स्प्लेंडर मोटारसायकल (क्रमांक MH 30 Z 3492) अकोला पोस्ट ऑफिस परिसरात उभी केली होती. सायंकाळी परत आल्यानंतर त्यांना आपली गाडी चोरीला गेल्याचे लक्षात आले. याप्रकरणी त्यांनी सिटी कोतवाली पोलीस ठाण्यात तक्रार दिली असता, पोलिसांनी भारतीय न्याय संहिता (BNS) गुन्हा दाखल केला होता.

सापळा रचून आरोपीला अटक
या गुन्ह्याचा समांतर तपास स्थानिक गुन्हे शाखेकडून सुरू होता. तपासादरम्यान गुप्त बातमीदाराकडून खात्रीशीर माहिती मिळाली की, चोरीस गेलेली दुचाकी अशोक वाटिका चौक परिसरात आहे. पोलिसांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेत संशयित आरोपी मंगेश कसनदास राठोड (वय २७ वर्षे, रा. जनुना, पोस्ट पिंजर, ता. बार्शीटाकळी, जि. अकोला) याला ताब्यात घेतले.

एकाच नंबरच्या दोन गाड्यांचा उलगडा
पोलिसांनी ताब्यात घेतलेल्या गाडीचा रंग, कंपनी, इंजिन आणि चॅसिस क्रमांकाची सखोल पडताळणी केली असता ती चोरीस गेलेलीच गाडी असल्याचे स्पष्ट झाले. अधिक तपासात मिळालेल्या माहितीनुसार, अगदी याच क्रमांकाची (MH 30 Z 3492) दुसरी एक मोटारसायकल मूर्तिजापूर येथे असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. पथकाने तात्काळ ती गाडी देखील हस्तगत केली आहे. अटक केलेला आरोपी आणि जप्त केलेला मुद्देमाल पुढील कायदेशीर कारवाईसाठी सिटी कोतवाली पोलिसांच्या स्वाधीन करण्यात आला आहे.

या पथकाने केली कारवाई
ही संपूर्ण कारवाई पोलीस अधीक्षक अर्चित चांडक (IPS) आणि प्रभारी अपर पोलीस अधीक्षक डॉ. निलेश पांडे यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडली. यामध्ये स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक नितीन लेव्हकर, सहाय्यक पोलीस निरीक्षक (API) गोपाल जाधव, पोलीस हवालदार रवींद्र खंडारे, किशोर सोनोने, महिंद्रा मलिये, वसीमउद्दीन, मंगेश इंगळे, स्वप्नील खेडकर, अन्सार आणि मनीष ठाकरे यांनी महत्त्वाची भूमिका बजावली.



