
नागपूर गुन्हेशाखेची कारवाई: दुचाकी चोरी प्रकरणी तीन अल्पवयीन ताब्यात, मुद्देमाल जप्त

कोराडी मंदिर परिसरातून दुचाकी चोरणारी तीन विधीसंघर्षग्रस्त बालके गुन्हेशाखेच्या जाळ्यात; ५० हजारांची स्प्लेंडर जप्त
नागपूर: कोराडी पोलीस ठाण्याच्या हद्दीतील देवी मंदिर परिसरातून दुचाकी चोरणाऱ्या तीन विधीसंघर्षग्रस्त बालकांना नागपूर गुन्हेशाखेच्या वाहन चोरी विरोधी पथकाने सापळा रचून ताब्यात घेतले आहे. या कारवाईत पोलिसांनी चोरीस गेलेली ५० हजार रुपये किमतीची हिरो होंडा स्प्लेंडर दुचाकी जप्त केली आहे. खापरखेडा येथील ढोरे ले-आऊट (अण्णा मोडजवळ, प्लॉट नं. १९४७) येथे राहणारे तक्रारदार मोहित सुभाष मित्तल (वय ४१) हे दिनांक १४ ऑक्टोबर २०२५ रोजी रात्री १०.०० ते ११.४५ वाजेच्या दरम्यान कोराडी येथील देवी मंदिरात दर्शनासाठी गेले होते. त्यांनी आपली हिरो होंडा स्प्लेंडर दुचाकी (क्र. एम.एच. ४० बी.एक्स. ८७६६, अंदाजे किंमत ५०,००० रुपये) मंदिर परिसरातील पार्किंगमध्ये लॉक करून उभी केली होती. मात्र, दर्शन घेऊन परत आल्यानंतर त्यांना आपली दुचाकी जागेवर दिसली नाही. अज्ञात चोरट्याने वाहन चोरून नेल्याची खात्री पटल्यानंतर मित्तल यांनी कोराडी पोलीस ठाण्यात धाव घेऊन तक्रार नोंदवली. त्यानुसार पोलिसांनी अज्ञात आरोपीविरुद्ध भारतीय न्याय संहिता (BNS) कलम ३०३(२) अन्वये गुन्हा दाखल केला होता.

तांत्रिक तपास आणि सापळा:

सदर गुन्ह्याचा समांतर तपास गुन्हेशाखेच्या वाहन चोरी विरोधी पथकाकडून सुरू होता. तपासादरम्यान पथकातील अधिकारी व अंमलदारांनी तांत्रिक कौशल्याचा वापर करत या चोरीत तीन अल्पवयीन मुलांचा सहभाग असल्याचे निष्पन्न केले. खात्रीशीर गोपनीय माहिती मिळताच पोलिसांनी सापळा रचून तिघांनाही ताब्यात घेतले. पंचासमक्ष त्यांची नाव व पत्त्याची चौकशी केली असता, ते तिघेही विधीसंघर्षग्रस्त बालक असल्याचे स्पष्ट झाले.

गुन्ह्याची कबुली आणि पुढील कार्यवाही:
पोलिसांनी विश्वासात घेऊन विचारपूस केली असता, तिन्ही विधीसंघर्षग्रस्त बालकांनी कोराडी मंदिर परिसरातून ही दुचाकी चोरल्याची कबुली दिली. त्यांच्या ताब्यातून चोरी गेलेली ५० हजार रुपये किमतीची स्प्लेंडर दुचाकी जप्त करण्यात आली आहे. जप्त केलेला मुद्देमाल आणि तिन्ही विधीसंघर्षग्रस्त बालकांना पुढील कायदेशीर कारवाईसाठी कोराडी पोलिसांच्या स्वाधीन करण्यात आले असून, या प्रकरणाचा पुढील तपास सुरू आहे.

या पथकाने केली कारवाई:
सदरची ही यशस्वी कारवाई पोलीस आयुक्त नागपूर शहर विश्वास नांगरे पाटील, अपर पोलीस आयुक्त (गुन्हे) नविचंद्र रेड्डी, उप आयुक्त (डिटेक्टिव्ह) दीपक अग्रवाल आणि सहाय्यक पोलीस आयुक्त (गुन्हेशाखा) वैभव जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक पप्पू कादरी, पोलीस हवालदार रोशन तिवारी, नितीन वर्मा आणि अजय शुक्ला यांच्या पथकाने यशस्वीरीत्या पार पाडली.




